रस्त्यावर भिक मागणाऱ्या ४५० अनाथ पोरांसाठी या पोलीसाने शाळा सुरू केलेय.

शिक्षण ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर शिक्षण हा सगळ्याचा अधिकार आहे. सध्या शिक्षणासाठी एकीकडे देशभरात नावाजलेल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मोर्चा काढावा लागतोय. त्याच्यावर पोलिसांकडून अमानुष पद्धतीने लाठीचार्ज केला जातोय. तर दुसरीकडं एक पोलिस असंख्य गरिब मुलांमध्ये शिक्षणाचं बीज रोवतोय. त्यांच्यामध्ये उज्ज्वल भारताचं भविष्य बघतोय. त्यामुळे या पोलिसांनी गरिब मुलांना शिकण्यासाठी मोफत शाळा सुरू केली आहे.

या पोलिसाचं नाव आहे धर्मवीर जाखड.

धर्मवीर जाखड मुळचे राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील.  2011 मध्ये ते राजस्थान पोलिसमध्ये भरती झाले. पोलिस म्हणून नोकरी करत असतांना ते पेट्रोलिंगसाठी अनेक ठिकाणी फिरायचे. त्यावेळी अनेक भागात कचरा वेचणारे मुलं-मुली त्यांना दिसायचे. एक दिवस त्यांनी या मुलांची विचारपूस केली. त्यावेळेस त्यातल्या अनेक मुलांनी सांगितलं की, आम्हाला कोणीच नाहीये, आम्ही अनाथ आहोत. त्यामुळे हे काम आम्हाला करावं लागतं.

सुरूवातीला हे मुलं खोटं बोलत आहेत, असं धर्मवीर यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी त्याच्या वस्तीत जाऊन विचारपुस केली. तेव्हा खरंच यांना कोणीच नाही यांची जाणिव झाली.

जर आपण या मुलांना आत्ता काही मदत केली नाही तर या मुलांना आयुष्यभर कचराच वेचायला लागेल नाहीतर चुकीच्या मार्गावर जायला लागेल. धर्मवीर यांना या मुलांची चिंता वाटायला लागली. यांच्यासाठी काहीतरी करायला हवं, याचा सतत ते विचार करायला लागले. याच विचारातून त्यांनी चुरूमध्ये 2016 साली या मुलांसाठी शाळा सुरू केली.

त्या शाळेला अपनी पाठशाला असं नाव दिलं.

सुरूवातीला ते रोज दोन स्वत या मुलांना शिकवायला लागले. हळुहऴु मुलं वाढत गेली. लोकांची मदत मिळत गेली. सध्या या शाळात तब्बल 450 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. धर्मवीर यांच्यासोबत दोन महिला काँन्स्टेबल सुद्धा त्यांना मदत करत आहेत.

इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंत या शाळेत मुलांना शिकवलं जातंय. सध्या 5 वी पर्यंत 360 विद्यार्थी आहेत. तर 6 ते 7 वीचे 90 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

त्यांना आणण्यासाठी आणि घरी सोडण्यासाठी सध्या एका गाडीची व्यवस्थाही केलेली आहे.

धर्मवीर सांगतात, या भागात उत्तर प्रदेश आणि बिहार भागातील अनेक कुटुंब कामासाठी येतात. त्याच्या मुलांनी शिकावं यासाठी आम्ही पुढाकार घेतोत. त्यांना इथं शिक्षण देतोत. तसंच इथून पुन्हा त्यांच्या भागात गेल्यानंतर या मुलाचं शिक्षण सुरू ठेवा, अशी ताकीदही देतोत. कारण जर देशात बदल हवा असेल तर त्यासाठी शिक्षण हे महत्वाचं आहे, असं धर्मवीर याचं म्हणणं आहे.

मात्र, सध्या शिक्षण घेणाऱ्य़ा काही विद्यार्थ्यांना आम्ही कचरा उचलण्याची परवानगी दिलेली आहे. कारण जर त्यांनी कचरा उचलला नाहीतर त्यांचे आई-वडिल त्यांना शाळेत पाठवत नाहीत. मात्र कचरा वेचत जरी असले तरी ते सध्या शाळेत येतात शिक्षण घेतात हे आमच्यासाठी महत्वाचं आहे.

धर्मवीर यांना एकट्याला ही शाळा चालवणं अवघड आहे. कारण एका महिन्याचा खर्च लाखभर रूपये येतो. त्यामुळे ते डोनेशन घेतात. जिल्हा प्रशासनही त्यांना सध्या मोठ्या प्रमाणात मदत करत आहे.

धर्मवीर यांच्यामुळे अनेक मुलांना जगण्याच्या आणि उज्ज्वल भविष्याचा मार्ग मिळाला आहे. तसंच सगळ्या जगाला खाकी वर्दीतला देवमाणूस दिसला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.