सरदार पटेलांची घराणेशाही

सरदारांना जाऊन ऐंशी वर्षे होत आली आणि सगळे पक्ष, सगळे नेते स्वतःला त्यांचे खरे वारसदार आहे सिद्ध करण्याच्या स्पर्धेत गुंतले आहेत. आज सरदार पटेलांच्या जयंती निम्मित्त भारताच्या पंतप्रधानानी त्यांच्या १८२ मीटर उंचीच्या पुतळ्याचे आज अनावरण केले. या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अनेक मंत्री संत्री रथी महारथी हजर होते. या दरम्यान कोपऱ्यात एक बातमी होती,

“सरदार पटेलांचे कुटुंबीय या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार नाहीत.”

जेव्हा आजकाल प्रत्येक नेता प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या सरदारांच्या वारशाचा फायदा उठवत आहे तेव्हा त्यांचे खरे वारसदार राजकारणापासून अलिप्तच आहेत.

म्हणूनच सरदार पटेलांची घराणेशाही आपल्याला माहितीच पाहीजे.

सरदार पटेलांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बरी असल्यामुळे त्यांना व त्यांच्या भावंडाना शिक्षण घेता आले. शिक्षणातून आलेल्या व्यापक दृष्टीमुळे वल्लभभाई आणि विठ्ठलभाई या दोन भावंडानी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. महात्मा गांधीच्या मार्गदर्शनाखाली खाली काँग्रेस पक्षातून राष्ट्रीय चळवळीमध्ये ते सहभागी झाले.

महात्मा गांधीचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारया या दोन्ही भावापैकी विठ्ठलभाई पटेल यांनी एकदा कॉंग्रेस सोडली होती. १९२३साली गांधीजींच्या असहकार आंदोलन मागे घेण्याच्या कृतीच्या निषेधार्थ मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास वगैरे कॉंग्रेस नेत्यांनी स्वतःचा “स्वराज पार्टी” नावाचा पक्ष सुरु केला. विठ्ठलभाई पटेल या पक्षात सामील झाले. पण एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे नेहरूंचे चिरंजीव जवाहरलाल नेहरू किंवा विठ्ठलभाई पटेलांचे धाकटे बंधू वल्लभभाई यांनी कॉंग्रेस सोडली नाही.

स्वराज पक्षाच्या धोरणाप्रमाणे विठ्ठलभाई पटेल यांनी तत्कालीन केंद्रीय विधानसभा निवडणूक लढवली आणि दिल्ली पार्लमेंट मध्ये खासदार म्हणून पोहचले. पुढे स्वराज पक्षाचा प्रयोग विसर्जित करून हि सर्व मंडळी काँग्रेस मध्ये परत आली.

वल्लभभाई यांची जेष्ठ कन्या म्हणजे मणीबेन पटेल.

मणीबेन कायम वडिलांच्या सावलीप्रमाणे सोबत असायची. स्वातंत्र्य लढ्यातील अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला होता आणि याबद्दल कित्येकदा ब्रिटीश कारावासाची शिक्षा सुद्धा मणीबेन यांना भोगावी लागली होती. वल्लभभाई पटेलांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्या वैयक्तिक सहायकाची भूमिका मणीबेनकडे होती. याकाळात त्यांनी लिहिलेली डायरी सरदारांच्या अनेक भूमिका त्यांचे व नेहरू, गांधी यांच्याशी असलेले संबंध यावर प्रकाश टाकणारी आहे.

सरदारांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे असलेला काँग्रेस फंडचा सगळा पैसा त्यांनी एकूण एक हिशोब करून पक्षाला परत केला.

मणीबेन पटेल १९५२च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत खेडा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या. गुजरात राज्य कॉंग्रेस च्या त्या उपाध्यक्षादेखील होत्या.

Screen Shot 2018 10 31 at 4.19.16 PM

दह्याभाई पटेल हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे चिरंजीव. मणीबेनहून धाकटे. असं म्हणतात की त्यांना सरदार पटेलांनी दिल्लीच्या राजकारणापासून दूर राहण्यास बजावले होते. १९३९ पासून मुंबई महानगरपालिकेमध्ये ते कॉंग्रेसचे प्रतिनिधित्व करायचे. काही वर्ष मुंबईच्या महापौर पदीसुद्धा दह्याभाई पटेल विराजमान होते. पण त्यांना राष्ट्रीय राजकारणात येण्याचे वेध लागले.

त्यांनी पक्षाकडून तिकीट सुद्धा मागितले होते, पण त्यांच्या म्हणण्यानुसार नेहरूनी त्यांना तिकीट दिले नाही.

अखेर दह्याभाईनी गुजरात अस्मितेसाठी स्थापन झालेल्या महागुजरात जनता परिषदेकडून त्यांनी निवडणूक लढवली. मणीबेन यांनी त्यांना काँग्रेस न सोडण्याबद्दल अनेकदा विनवून बघितले पण दह्याभाईनी त्यांचे ऐकले नाही. पुढे ते राज्यसभेचे खासदार बनले.

दह्याभाई यांच्या पत्नी भानुमती पटेल यांना स्वतंत्रता पार्टीने लोकसभेसाठी उभे केले. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवाराकडून भानुमती यांचा लाजिरवाणा पराभव झाला. त्यांना आपले डिपॉसिट देखील वाचवता आले नाही.

या दरम्यानच्या काळात मणीबेन अजूनही कॉंग्रेसच्या खासदार होत्या. आधी लोकसभा आणि नंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. सत्तरच्या दशकात मात्र जेव्हा इंदिरा गांधीनी कॉंग्रेस फोडून स्वतःची काँग्रेस स्थापन केली तेव्हा त्या जुन्या काँग्रेसशी प्रमाणिक राहिल्या. आणिबाणी ला मणीबेन यांनी जोरदार विरोध केला होता. त्याकाळात भारतीय लोकदलाकडून त्या परत खासदार सव्वा लाखाच्या जबरदस्त मार्जिनने खासदार म्हणून निवडून आल्या.

मणीबेन या कायम गांधीवादी राहिल्या. स्वतः विणलेल्या खादीची साडी त्यांनी आयुष्यभर वापरली. मणीबेन जीवनभर अविवाहित राहिल्या. दह्याभाई यांची दोन्ही मुले विपिन आणि गौतम राजकारणापासून दूर राहिले. गौतम पटेल आपल्या पत्नी व मुलासह सध्या अमेरिकेत आहेत. सरदार पटेलांच्या नावाचा होत असलेल्या गैरवापराबद्दल त्यांनी कायम खंत व्यक्त केली आहे. यामुळेच की काय पण त्यांच्या विशालकाय पुतळ्याच्या अनावरणास उपस्थित राहण्यास त्यांनी  नकार कळवला.

राजकारणाचा वापर आपल्या सात पिढीच्या सोयीसाठी करण्याच्या भारतीय मानसिकतेमध्ये सरदार पटेल यांच्या घराण्याचे वेगळेपण विशेष उठून दिसते.

हे ही वाच भिडू –

Leave A Reply

Your email address will not be published.