कधीकाळी मजूर असणारा हा लॉटरी किंग आज सगळ्याच राजकीय पार्ट्यांना खिश्यात ठेवतो.
घर जाळून कोळश्याचा व्यापार करण्याचा प्रकार म्हणजे लॉटरी घेऊन करोडपती होण्याचं स्वप्न बघणं. करोडपतींपेक्षा रोडपतीच झालेले तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिले असतील. पण याला अपवाद ठरलाय तब्बल ७००० कोटींचा मालक असलेला कोइम्बतूरचा मार्टिन सँटियागो. ‘लॉटरी किंग ऑफ इंडिया’ या नावाने ओळखला जाणाऱ्या या शेठचा पॅटर्न मात्र थोडा वेगळाय. हा लॉटरी विकत घेत नाही तर ती लोकांना विकतो.
लॉटरी बिझनेसमध्ये येण्यापूर्वी पोटापाण्यासाठी मार्टिननं कोइम्बतुरवरून थेट म्यानमारचं रंगूनच गाठलं होतं.
तिथंच मोलमजुरी करताना मार्टिनला लॉटरीचा नाद लागला. पण भाऊंचा आकडा काय कधी लागलाच नाही.
मग मार्टिननं आता स्वतःचच लॉटरीचं दुकान थाटलं. हा व्यवसाय थोडा फार चालल्यानंतर मार्टिनभाऊ परतले आपल्या मायदेशी आणि तामिळनाडूमध्ये त्याने आपला धंदा चालू केला.
आता इथून पुढे मार्टिन कसा लॉटरी व्यवसायाचाच बाप झाला त्याआधी भारतातील लॉटरी व्यवसाय कसा चालतो ते बघा.
भारतात सगळ्या लॉटरी राज्य सरकारं चालवतात.
त्यातही २८ पैकी १३ राज्यांमध्ये लॉटरी कायदेशीर आहे. बाकीच्या ठिकाणी लॉटरीवर बंदी घालण्यात आलीय. आपल्या महाराष्ट्रात लॉटरी कायदेशीर आहे . केरळ आणि पुर्वउत्तेरकडील छोट्या राज्यांसाठी लॉटरी हा राज्यांच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन आहे.
१९६७ मध्ये लॉटरी विक्रीतून नुसत्या १४ लाखांचा नफा मिळवणाऱ्या केरळने २०१९-२० मध्ये १७६३ कोटींचा नफा काढला होता.
आता पुन्हा येऊया मार्टिन भाऊंच्या लॉटरी बिझनेसकडं. १९८८ मध्ये तामिळनाडू राज्यामध्ये चालू केलेला त्याचा लॉटरीचा धंदा लवकरच केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये पसरला. सरकारी लॉटऱ्यांच्या वितरणाचं काम मार्टिनची कंपनी करत असायची. राजकीय पक्षात ओळखी काढायची आणि त्यातून धंदा वाढवायचा हि मार्टिनची सरळ सोप्पी स्ट्रॅटेजि.
तामिळनाडूमध्ये डीएमके या करुणानिधींच्या पक्षाच्या जवळ जाण्यासाठी मार्टिनभाऊंनी करुणानिधी यांनी लिहलेला एक सिनेमा २०११ मध्ये २० करोड घालून बनवला होता.
पुढे जयललितांनी सत्तेत आल्यानंतर डीएमके समर्थकांवर कारवाई करण्यास सुरवात केली त्यात मार्टिनशेठचा पण नंबर होता.जयललितांनी एका घोटाळयासाठी मार्टिनशेठला २०१२ मध्ये जेलमध्ये टाकलं होता. आता मात्र मार्टिन भाऊनीं वेगळीच चाल खेळली. मी करुणानिधीच्या जवळ नाही हे दाखवण्यासाठी शेठनी आपल्या बायकोलाच करुणानिधींच्या मुलीवर केस टाकायला सांगितलं होतं.
राजकारण्यांना जवळ करण्यात मार्टिनभाऊ पहिल्यापासूनच माहीर होते.
एकदा काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी मार्टिनशेठसाठी कोर्टात हजर झाले होते.
त्यामुळे मार्टिन हा काँग्रेस हायकमांडच्या जवळचा असल्याचा आरोप कम्युनिस्ट पार्टीनी केला होता. या आरोपामुळे सिंघविंना एक मोठा ग्राहक सोडावा लागला होता. पण जेव्हा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट) च्या देशाभिमानी या मुखपत्राला २ करोड देणगी दिल्याचं समोर आलं तेव्हा कम्युनिस्ट चांगलेच तोंडावर पडले होते.
राजकारण्यांना मॅनेज करण्याचं धोरण भाऊंनी पुर्वउत्तेरकडील राज्यात चालूच ठेवलं. २००३ मध्ये तामिळनाडू सरकारने लॉटरीवर बंदी आणल्यानंतर मिझोराम, सिक्कीम या राज्यांमध्ये मार्टिनशेठनि आपला धंदा नेला. तिथंही जवळपास सारखंच.
सिक्कीममध्ये तर राज्य सरकारला ४५०० कोटी रुपयांचा चुना लावल्याचा आरोप मार्टिनवर लागला होता.
या प्रकरणात सीबीआयने मार्टिनवर ३२ केस ठोकल्या होत्या. मात्र नेहमीप्रमाणे मार्टिन जामिनावर जेलच्या बाहेर. एवढंच काय तर भूतान, नेपाळ या देशातील लॉटरी बिझनेसमध्ये आज फक्त मार्टिनभाऊंचाच दबदबा आहे.
राजकारणाची हवा कोणत्या बाजूने चालली आहे याचा मार्टिनशेठला अगदी अचूक अंदाज. २०१४ मध्ये मोदी लाट येणार हे त्याने बरोबर ओळखलं होतं.
इंधिया जननायका काटची या मार्टिनच्या बायकोच्या पक्षानं २०१४ मध्ये तामिळनाडू मध्ये बीजेपी बरोबर युती केली होती.
मार्टिनची बायको लिमा हिच्याबरोबर प्रचाराच्या दरम्यान स्टेजवर दिसल्याने मोदींवर बरीच टीका झाली होती.
२०२१ मध्ये इलेक्टोरल प्रुडंट फंडला दिलेल्या देणगीमुळे मार्टिनशेठ पुन्हा न्युजमध्ये आहेत. या फुंडातून राजकीय पार्ट्याना देणग्या देण्यात येतात.
याच फंडातील २४५ कोटीमधले १०० कोटी मार्टिनच्या फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्विसेस या कंपनीने दिले आहेत. या फंडातले २०९ कोटी भाजपाला देण्यात आलेत.
त्यामुळे आता भाजप गोत्यात येणार का ते काय माहित नाही मात्र मार्टिनशेठ आता जगातल्या सगळ्यात मोठ्या पार्टीलाच खिश्यात घालयला निघालेत एवढं नक्की.