घर एक पक्ष अनेक : कोणा-कोणाच्या घरात आत्तापर्यन्त हा फॉर्म्युला चालला आहे.

भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे या भाजपच्या खासदार असल्यामुळे त्याही राजीनामा देऊन पक्ष सोडणार का?

असा प्रश्न विचारला जात होता मात्र त्या भाजपमध्येच थांबल्याने १ घर २ पक्ष हा फार्म्युला पुन्हा चर्चेत आला आहे.

एकाच घरात राहणारे एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये आणि सुनबाई भाजपमध्ये अशी खडसे कुटुंबीयांची सद्य स्थिती आहे. बर इथे खडसेंवर टिका करावी तर विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीतच असून रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये आहेत. अशा वेळी काय करावं. थोडक्यात काय तर हे काही महाराष्ट्रात पहिल्यांदाच झालय असं अजिबात नाही.

यापूर्वीही घरातील १-२ सदस्य एका पक्षात आणि बाकीचे सदस्य दुसऱ्या पक्षात अस झालेल आहे.

कोण कोण आहेत असे कुटुंबीय ?

१) यात सगळ्यात टॉपला नंबर लागतो तो कोल्हापूरचा : 

 महाडिक कुटुंबीय

२०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या काळात महाडिक कुटुंबियांच्या घरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि ताराराणी आघाडी असे ३ पक्ष आणि एक स्थानिक आघाडी होती.

महादेवराव उर्फ आप्पा महाडिक हे २०१४ मध्ये काँग्रेस काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार होते. तर त्याचवेळी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुतण्या धनंजय महाडिक राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोल्हापूरचे खासदार झाले. पुढे २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला.

२०१४ च्या लोकसभेनंतर ६ महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महादेवराव महाडिक यांनी आपला मुलगा अमल महाडिक यांना भाजपकडून आमदार बनविले.

म्हणजे याकाळात ते काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार होते, पुतण्या राष्ट्रवादीचे खासदार होते आणि दोघेही प्रचार मात्र भाजपच्या उमेदवाराचा करत होते.

पुढे शौमिका महाडिक यांना भाजपकडूनच जिल्हा परिषद सदस्य बनविण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली.

तर २०१५ ला महाडिक काका – पुतण्याने कोल्हापूरच्या महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करून आपल्याच म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांविरोधात ताराराणी आघाडी स्थापन केली. म्हणजे आमदार काँग्रेसचे आणि काम भाजपसोबत.  

एकूणच महादेवराव महाडिक यांनी काँग्रेस सोडल्याने ते सध्या अपक्ष आहेत. तर पुतण्या, मुलगा आणि सून हे भाजपमध्ये आहेत.

डी.वाय. पाटील कुटुंबीय

पदमश्री डॉ. डी. वाय. पाटील हे जवळपास १९५७ पासून काँग्रेसमध्ये होते. मात्र २०१८ च्या डिसेंबरमध्ये लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर त्यांचे पुत्र सतेज पाटील विधानपरिषदेचे आणि नातू ऋतुराज पाटील हे सध्या काँग्रेसकडून विधानसभेचे आमदार आहेत.

वडील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर मुलगा आणि नातू काँग्रेसमध्ये आहेत.

आमदार चंद्रकांत जाधव

कोल्हापूर उत्तरमधून चंद्रकांत जाधव हे काँग्रेसचे आमदार आहेत. २०१९ मध्ये ते केवळ २० दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये आले होते. तर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव आणि भाऊ संभाजी जाधव हे कोल्हापूर महानगर पालिकेमध्ये भाजप-ताराराणी आघाडीचे विद्यमान नगरसेविक आहेत.

 कवठे महांकाळचे शेंडगे कुटुंबीय

भाजपने २००९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश शेंडगे यांना जत मतदारसंघातून उमेदवारी दिली. ते निवडून आले. तर राष्ट्रवादीने रमेश शेंडगे यांना विधान परिषदेची आमदारकी दिली. पुढे एका महामंडळाचे अध्यक्षपदही त्यांना दिले. तर त्यांचे आणखी एक बंधु विलास शेंडगे काँग्रेसमघ्ये सक्रीय झाले.

२०१४ च्या निवडणुकीत भाजपने प्रकाश शेंडगे यांना उमेदवारी नाकारली. तर रमेश शेंडगे यांचा विधान परिषदेचा कालावधी संपला होता. यानंतर प्रकाश शेंडगे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवली. त्यानंतर काही तासातच राष्ट्रवादीतुन रमेश शेंडगे भाजपमध्ये दाखल झाले होते.

इंदापूरचे हर्षवर्धन पाटील 

हर्षवर्धन पाटील हे २०१४ ला काँग्रेस पक्षातर्फे विधानसभेला उभे होते. पण पराभूत झाले. यानंतर २०१९ पर्यंत ते काँग्रेसमध्येच होते. पण त्यानंतर तिकीट न मिळाल्याच्या कारणावरून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

तर २०१९ मध्ये त्यांची मुलगी अंकिता पाटील या काँग्रेस पक्षाकडून पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. अद्यापही त्या काँग्रेसमध्येच आहेत. त्यामुळे सध्या वडील भाजपमध्ये आणि मुलगी काँग्रेसमध्ये असं आहे.

 सोलापूरचे मोहिते पाटील घराणे.

विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे जुने आणि बडे नेते. माढाचे खासदार असलेले मोहिते पाटील यांच्या मुलाला म्हणजे रणजितसिंह यांना २०१९ची लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा होती. मात्र पवारांनी तिकीट न दिल्याने त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला तर वडील राष्ट्रवादीमध्येच राहिले.

२०२०मध्ये रणजितसिंह हे भाजपचे विधानपरिषदेचे सदस्य झाले. तर वडील अद्यापही राष्ट्रवादीमध्येच असल्याचे स्वतः सांगतात 

 अहमदनगरचे विखे पाटील घराणे. 

राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय याने मार्च २०१९ मध्ये लोकसभेच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी ते काँग्रेस पक्षाचे आमदार आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. पुढे एप्रिलमध्ये त्यांनी विरोधी पक्षाचा राजीनामा दिला लोकसभेला सुजय विखे पाटील यांचा भाजप-शिवसेनाच प्रचार चालू केला. निवडून आले त्याही वेळी ते काँग्रेसचे आमदार होते.

जून मध्ये काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झाले. तर त्यांच्या पत्नी शालिनी विखे पाटील या मात्र डिसेंबर २०१९ पर्यंत म्हणजे लोकसभेनंतर जवळपास ६ महिना काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. त्या आजही काँग्रेसमध्येच आहेत.

 पारनेरचे आमदार निलेश लंके

पारनेरचे निलेश लंके हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. तर त्यांच्या पत्नी राणी लंके या २०१७ पासून नगरच्या सुपा जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. 

विचारधारा, पक्षनिष्ठा, राजकीय भूमिका या गोष्टींना तिलांजली देत सध्या पक्षबदल सहज घडून येतात. मात्र हि जर उदाहरण पहिली तर सगळी अलीकडची दिसून येतात, आमच्या मेंदूला ताण देऊन आम्ही अलीकडचीच उदाहरणे घेतली आहे.

बर आत्ता तुम्ही म्हणाल, ठाकरे कुटूंबाच काय. राज ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा मुंडे कुटूंबाच काय धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे.

तर भिडूंनो इथे समावेश करत असताना आम्ही वैचारिक पातळ्यांवर एकच पण फक्त सोयीसाठी वेग वेगळ्या पक्षात असणाऱ्या नेत्यांचा समावेश केला आहे. तुमच्या डोक्यात अजून नावे आली तर कमेंट करुन सांगत चला. शेवटी काय तर यादी वाढली पाहीजे. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.