उंदीर यही जमाएंगे !!

तर सध्या उंदरांचे दिवस आहेत. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचा उल्लेख उंदीर असा करून नितीन गडकरी यांनी त्यांचा कडक शब्दात समाचार घेतला. पण पक्षांतर केलेल्या कुणी नेत्याने साधी नाराजी किंवा खंतसुद्धा व्यक्त केली नाही. आधी कुंपणावरचे सरडे म्हणायचे पक्षांतर करणाऱ्याना. आता गडकरींनी नवीन शब्द दिलाय. उंदीर. मराठी भाषा समृध्द होतेय. महाराष्ट्र हळू हळू होईल. पण आपल्याला राजकारणाशी काय करायचंय?

नेत्यांचा विषय सोडा. त्यांचं ते बघून घेतील. आपण खऱ्या उंदरांविषयी बोलू. कारण तिकडे गणपती बप्पा चिंतेत आहेत. कारण आता मिरवणुकीत घोषणा ऐकू येईल

“अर्धा लाडू चंद्रावरगणपती बप्पा उंदरावर.”

एकूण गणेश उत्सव उत्साहात आहे. फक्त गणपतीपुढचे उंदीर जरा नाराज दिसताहेत. आपण गणपतीच्या पायाशी आहोत ते काही फक्त मोदक मिळावेत म्हणून नाही असा खुलासा करायची वेळ त्यांच्यावर आलीय. एक उंदीर तर मंडळाच्या जुन्या कार्यकर्त्याला म्हणाला की आमची नवीन भरती असल्यासारखे काय पाहतायआम्ही पूर्वीपासून इथेच आहोत. असो.

आपण भारतीय लोक उत्सवप्रिय आहोत. प्रत्येक प्राण्याला सन्मानाने वागवतो. आता गणपतीत उंदरांना पण मान मिळेल. काही ठिकाणी तर उंदराच्या कानात आपल्या मनातली इच्छा सांगतात म्हणे. परवाच तिकडे झारखंड सरकारने अडीच हजार कोटी रुपयाच्या कालव्याचे उद्घाटन केले होते. आणि अवघ्या बारा तासात कालवा उध्वस्त झाला. या विक्रमाची दखल फारशी कुणी घेतली नाही. सरकारने सांगितले की नुकसान उंदरांमुळे झालं. महाराष्ट्रात जे काही काळापूर्वी खेकड्यांनी करून दाखवलं ते झारखंडमध्ये उंदरांनी करून दाखवलं.

खेकडे आणि उंदीर जास्त कर्तृत्ववान असतात हे धरणकालवे आणि राजकीय पक्षांच्या भरतीत सिध्द होतय. अर्थात उंदरांचे काही दोष आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत. उंदीर त्याच्या सोयीसाठी नवीन नवीन बीळ तयार करतो. पण त्याच्या बिळांसाठी तो चांगल्या चांगल्या इमारतींचा पाया ठिसूळ करू शकतो. उंदरांमुळे साथीचे रोग पसरतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उंदीर शेतकऱ्याचा नंबर एकचा शत्रू असतो. कुठे कुठे कुणा कुणाच्या पायाशी उंदीर दिसतील. पण एकट्या गणपतीच्या पायाशी असलेला उंदीर सोडला तर बाकी सगळ्या उंदरांचा बंदोबस्त करायला पाहिजे.

माहिती म्हणून सांगतोपूर्वी सरकार उंदीर पकडायचे पैसे द्यायचं लोकांना. पण आता मंदी असल्याने हे काम पण सरकारने सुरु केल्याचं ऐकिवात आहे.

पण आपणही सावध असावं. सणासुदीचे दिवस आहेत. गोडधोड केलेलं असेल. आणि हो हिंदुत्वाचा आणि गणपतीचा संबंध आहे. पण हिंदुत्वाचा आणि उंदरांचा काही संबंध नाही. रामाला सेतू बांधायला माकड कामी आले होते. उंदीर नाही. त्यामुळे उद्या मंदिर बांधायला उंदीर कामी येतील असं कुणी म्हणालं तर विश्वास ठेवायचा नाही. यंदा राज्यात लोकशाहीचा उत्सव जोरदार साजरा होणार नेहमीप्रमाणे. तोपर्यंत गणेशचतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा!

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.