यांना सांगितलं पंतप्रधान व्हा ! आणि यांनी नको म्हणत पळ काढला !!! 

ग्रामपंचायत सदस्याची इच्छा काय असते ? सरपंच व्हायचं. नगरसेवकाची इच्छा काय असते. नगराध्यक्ष व्हायचं. जिल्हा परिषद सदस्याची इच्छा काय असते ? आमदार व्हायच.. 

आमदाराला मुख्यमंत्री, खासदाराला मंत्री आणि केंद्रिय मंत्र्याला पंतप्रधान. असा काय तो चढता क्रम असतो. म्हणजे इच्छा असते म्हणून राजकारण चालतं.म्हणून सत्तेची स्वप्न पडतात म्हणूनच खुर्ची पाहीजे असते. आणि तिही सतत वरच्या क्रमांकावर जाणारी. 

पण तुम्हाला कोणी सांगितल असे दोन दिग्गज भारताच्या राजकारणात होवून गेलेत ज्यांनी पंतप्रधान पदाची ऑफर धुडकावून लावलेय ? तर पटल का ? 

पण चक्क पंतप्रधान पदाची ऑफर धुडकावणारे दोन दिग्गज नेते भारतात होवून गेलेत. पहिले शंकर दयाल शर्मा आणि दूसरे व्ही. पी. सिंग.  

शंकर दयाल शर्मा –  

१९९१ च्या लोकसभांचा निकाल हाती आला. कॉंग्रेसला दमदार यश मिळालं पण ते यश पहायला राजीव गांधी नव्हते. राजीव गांधीची निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हत्या करण्यात आली. सत्ता आली मात्र पंतप्रधान कोण होणार हा गहन प्रश्न कॉंग्रेसपुढे उभा राहिला होता. 

कॉंग्रेस कमिटी हा निर्णय घेणार होती पण तो नावापुरता. सर्व सुत्र गांधी घराण्याच्या निष्ठा परंपरेनुसार सोनिया गांधी यांच्या हातात आली होती. सोनिया गांधी राजकारणात नवख्या होत्या. पक्ष नेतृत्वाची जबाबदारी कोणावर सोपवायची यावर सोनिया गांधी यांनी गांधी घराण्याचे अतिशय निकटवर्ती राहिलेल्या पी.एन. हक्सर यांचा सल्ला घेतला. 

हक्सर यांनी गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या तत्कालीन उप-राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा याचं नांव सोनिया गांधी यांना सुचवलं. सोनिया गांधी यांनी देखील या नावावर आपली सहमती दर्शविली. या सगळ्या घडामोडीनंतर सोनिया गांधी यांचा निरोप शर्मा यांच्यापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी अरुणा असफ अली यांच्यावर सोपविण्यात आली. अरुणा असफ अली यांनी ज्यावेळी शर्मा यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी शर्मा ते अतिशय विनम्रपणे म्हणाले, 

“एवढ्या महत्वपूर्ण जबाबदारीसाठी आपल्या नावाचा विचार झाल्याने आपल्याला सन्मानित झाल्यासारखं वाटतंय. परंतु सध्या आपलं वय झालंय आणि बऱ्याचवेळा तब्येत देखील ठीक नसते. आशा परिस्थितीत एवढी महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वीकारणं योग्य होणार नाही. त्यामुळे या जबाबदारीसाठी पक्षाने दुसऱ्या कुठल्यातरी व्यक्तीची निवड करावी” 

चालून आलेल्या पंतप्रधानपदाची ऑफर शंकर दयाल शर्मा यांनी तितक्याच विनम्रपणे नाकारली. त्यानंतरच्या वर्षभरात मात्र ते राष्ट्रपती म्हणून निवडून आले. 

व्ही. पी. सिंग –  

पंतप्रधानपद नाकारल्याचा असाच एक किस्सा १९९६ सालचा देखील आहे. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी याचं १३ दिवसाचं सरकार पडलं होतं. देशाच्या राजकीय इतिहासात असं प्रथमच घडलं होतं की एखाद्या प्रधानमंत्र्याचं सरकार इतक्या कमी कालावधीत कोसळलं होतं. पुरेसं संख्याबळ सोबत नसताना अटल बिहारी वाजपेयी यांनी सरकार तर स्थापन केलं होतं, परंतु लोकसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक समर्थन जुळविण्यात अपयश आल्याने विश्वासमत प्रस्तावावरील मतदानापूर्वीच अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

वाजपेयींचं १३ दिवसाचं सरकार कोसळलं आणि देशात १३ वेगवेगळ्या पक्षांच्या आघाडीचं सरकार स्थापन होऊन एच.डी. देवेगौडा देशाचे पंतप्रधान झाले. परंतु एच.डी. देवेगौडा हे देखील पंतप्रधानपदासाठी ‘संयुक्त मोर्चा’ची पहिली पसंती नव्हते. एच.डी. देवेगौडा संयुक्त मोर्चाचे नेते म्हणून समोर येण्याची कहाणी देखील अशीच रंजक आहे.

काँग्रेसच्या विनाशर्त पाठींब्यावर संयुक्त मोर्चाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाल्यानंतर संयुक्त मोर्चासमोर देखील प्रश्न होता तो नेता निवडीचा. एका नावावर सर्वांचंच एकमत होतं. ते नांव म्हणजे देशाचे पूर्व प्रधानमंत्री विश्वनाथ प्रताप सिंग. परंतु व्ही.पी. सिंग स्वतः मात्र पुन्हा पंतप्रधान बनण्यास उत्सुक नव्हते. त्यांनी स्पष्टपणे आपला नकार कळवला होता. व्ही.पी. सिंग यांनी नकार कळविल्यानंतर देखील संयुक्त मोर्चाची नेतेमंडळी व्ही.पी. सिंग यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करत होती. त्यामुळेच त्यांचा होकार मिळविण्यासाठी संयुक्त मोर्चातील नेते त्यांच्या घरी गेले. व्ही.पी. सिंग यांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांना चहापाण्यासाठी विचारलं आणि आपल्या नकारावर ठाम राहिले.

संयुक्त मोर्चाची नेतेमंडळी आपला आग्रह सोडायला तयारच नाहीत असं ज्यावेळी व्ही.पी. सिंग यांच्या लक्षात आलं त्यावेळी ते घराच्या मागच्या दरवाज्यातून आपल्या गाडीत बसून दिल्लीच्या आजूबाजूच्या रस्त्यावर फेरफटका मारायला निघून गेले. जवळपास दुपारच्या ४ वाजेपर्यंत संयुक्त मोर्चाची मंडळी व्ही.पी. सिंग यांची वाट बघत राहिले परंतु ते काही आले नाही. शेवटी व्ही.पी. सिंग यांनी फोन करून कळवलं की कृपया आपली वाट बघू नये. आपण नेतेपद स्वीकारण्यास इच्छुक नाही. माजी पंतप्रधान देवेगौडा आणि इंदर कुमार गुजराल यांनीच एका मुलाखतीदरम्यान हा किस्सा सांगितलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.