विश्वचषकाचं यजमानपद मिळविण्यासाठी पुतीन यांनी ‘फिफा’ला लाच दिली होती..?

यावर्षीच्या फुटबॉल  वर्ल्ड कपची रंगतदार सुरुवात काल-परवा रशियामध्ये  झाली. ‘वर्ल्ड कप’ २ दिवसांपूर्वी सुरू झाला असला तरी, ‘वर्ल्ड कप’च्या आयोजनामागचा ‘ड्रामा’ २०१० ​मध्येच सुरू झाला होता. २०१८​ च्या फिफा ‘वर्ल्ड कप’स्पर्धेचं यजमानपद मिळवण्यासाठीच्या स्पर्धेत एका बाजूला इंग्लंड संपूर्ण पश्चिम युरोपला सोबत घेऊन उभा होता तर त्यांच्या विरोधात दंड थोपटले होते  स्वतः रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी.

कोण होते दावेदार…?

२०१८​ वर्ल्ड कपच्या आयोजनाची संधी मिळावी अशी मागणी इंग्लंड , रशिया , बेल्जियम – नेदरलँड ( संयुक्तिक ) आणि पोर्तुगाल – स्पेन ( संयुक्तिक ) अशा सहा देशांनी केली होती. पूर्ण युरोपातून विशेषतः इंग्लडकडून,  रशियाला स्पर्धेचं यजमानपद मिळू नये यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत होते. इंग्लंडच्या या प्रयत्नांना अमेरिकेचाही पाठींबा होता. परंतु १०​ डिसेंबर २०१०​ या दिवशी फिफाने यजमानपदासाठीचा निकाल जाहीर केला आणि अगदी एकतर्फी म्हणता येतील एवढी मते मिळवून रशियाने २०१८​ च आयोजनपद जिंकलं. एका अर्थाने पुतीन यांनी इंग्लंड आणि अमेरिकेला दिलेली ही धोबीपछाड होती.

वादाचं नेमकं कारण काय..?

खरा वाद सुरु झाला तो या निर्णयानंतरच. स्पर्धेचे यजमानपद आपल्याला मिळावे यासाठी रशियाने फिफाच्या अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप इंग्लंडकडून करण्यात आला. या कालावधीत ज्या काही घटना घडत होत्या त्याचा आढावा घेतल्यास इंग्लंडच्या या आरोपात बऱ्यापैकी तथ्य असल्याचं जाणवतं.

sepp
सेप ब्लॅटर 

स्वित्झर्लंडचे ‘सेप ब्लॅटर’ यांच्यावर त्यावेळी फिफाच्या अध्यक्षपदाची धुरा होती.  हे तेच सेप ब्लॅटर होते, ज्यांच्यावर यापूर्वी २०१४ च यजमानपद ब्राझीलला देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप झाला होता. ज्या दिवशी २०१८ ​विश्वचषकाच्या यजमानपदाचा निकाल जाहीर होणार होता त्यादिवशी फिफाच्या झुरीक येथील मुख्यालयात यजमानपदाच्या शर्यतीत असणाऱ्या सहा पैकी पाच देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित होते आणि अनुपस्थित असणाऱ्या एकमेव राष्ट्रप्रमुखाचं नांव  होतं व्लादिमिर पुतिन. इतक्या महत्वाचा निर्णय जाहीर होत असताना पुतीन यांची अनुपस्थिती अनेक प्रश्नांना जन्म देणारी होती. आपल्या विरोधात राजकारण करणाऱ्या लोकांसोबत पुतीन यांना व्यासपीठावर यायचं नव्हतं किंवा त्यांना १०० % खात्री होती की  या निकाल आपल्याच बाजूने लागणार म्हणून….?

बुट नसल्याने पात्र असूनही भारतीय संघाला वर्ल्डकपसाठी प्रवेश नाकारण्यात आला होता?

अजून एका घटनेनं इंग्लंडच्या आरोपांना पुष्टी मिळते. ती घटना अशी की फिफावर झालेल्या लाचखोरीच्या  आरोपानंतर या प्रकरणाची चौकशी  सुरु झाली. अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची झडती घेण्यात आली. ज्यावेळी रशियन अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली त्यावेळी असं आढळून आलं की  यजमानपदाच्या बोलीच्या प्रक्रीयेवेळी रशियाकडून जे संगणक वापरण्यात आले होते ते सगळे नष्ट करण्यात आले होते. शेवटी चौकशी पूर्ण झाली आणि कुठलाही सबळ पुरावा हाती न लागल्याने हे प्रकरण  थंड बस्त्यात गेलं. असं असलं तरी सेप ब्लॅटर यांची एकूणच वादग्रस्त कराकीर्द कारकीर्, पुतीन यांच्या राजकारणाची पद्धत आणि वरील घडलेल्या घटना बघता या प्रक्रियेत भ्रष्टाचार झालाच नव्हता, असं म्हणणं खुपंच भोळसटपणाचं ठरेल.

विश्वचषकाच्या आयोजानासाठी एवढी खटाटोप का..?

आता आपल्या मनात एक  प्रश्न सहज उपस्थित होऊ शकतो की एका स्पर्धेच्या  यजमानपदासाठी एवढी धडपड करायची गरजच  काय…? याचं मुख्य कारण म्हणजे युरोपातील बहुतांश देशातील लोकांचं फुटबॉलप्रती असणारं वेड. युरोपातील अनेक देशांमध्ये फुटबॉल अक्षरशः जगला जातो. त्यामुळे युरोपियन राजकारणात देखील फुटबॉलला अत्यंत महत्व आहे. अलीकडच्या काळात शीतयुद्धानंतर प्रथमच रशियाची प्रतिमा जगभरात खराब झालेली आहे. बहुतेक या प्रतिमेतून बाहेर येण्याचा मार्ग पुतीन यांना खेळाच्या मैदानात दिसलेला असावा. त्यामुळे फक्त फुटबॉलच नाही तर २०१३ मध्ये जागतिक विद्यापीठ चॅम्पियनशिप, २०१४ च्या हिवाळी ऑलंपिकचं यजमानपद मिळवून या स्पर्धांचं आयोजन देखील रशियाने यशस्वीपणे केलं.

जागतिक स्तरावरून रशियाला विरोध का झाला..?

२०१० ते २०१८ या आठ वर्षात जागतिक राजकारणात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. रशियाचं  युक्रेनवरील आक्रमण, मलेशियाचे प्रवासी विमान MH – १७ च्या अपघातामागे रशियाचा हात असण्याचा संशय आणि रशियाचा सीरियामधील वाढता हस्तक्षेप या कारणांमुळे जगभरातून रशियाला विरोध वाढू लागला. यामुळेच  रशियाकडून वर्ल्ड कपचे आयोजन काढून घेण्यात यावे मागणी देखील झाली. २०१६ च्या अमेरीकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रशियाचा हस्तक्षेप उघड झाल्यानंतर तर अमेरिकेने देखील रशियामध्ये खेळण्यास नकार दिला होता. परंतु अमेरिकेचा संघ ‘वर्ल्ड कप’साठी पात्रच न होऊ शकल्याने हा वाद तिथेच थांबला.

कोल्हापूरपेक्षाही छोटा देश फुटबॉल विश्वचषकासाठी पात्र ठरलाय…!!! 

इंग्लंडने प्रखर विरोधाची भूमिका का घेतली…?

जागतिक स्तरावरून विरोध असला तरी रशियाला विश्वचषकाचे यजमानपद मिळाल्याने सर्वात जास्त दुखावला गेला होता तो म्हणजे इंग्लंड. याचं महत्वाचं कारण म्हणजे या विश्वचषकाच्या आयोजनासाठी त्यांची दावेदारी प्रबळ होती. शिवाय फुटबॉलची मातृभूमी असलेल्या इंग्लंडला १९६६ नंतर विश्वचषकाचे आयोजनपच मिळालेलं नाही. आणि यावर्षीच्या विश्वचषकाच्या आयोजनपदाची मिळू शकणारी संधी रशियामुळे हिरावली गेली होती. त्यामुळे इंग्लंडने सुरुवातीपासूनच रशियाचा प्रखर विरोध केला होता.

२०१८ च्या मार्चमधील एका प्रकरणानंतर तर इंग्लंडचा हा विरोध अजून तीव्र झाला होता. प्रकरण असं की इंग्लंडमध्ये वास्तव्यास असणारा रशियाचा माजी गुप्तहेर ‘सर्गेई स्क्रिपाल’वर रशियाशी गद्दारी केल्याचा आरोप आहे. मध्यंतरी सर्गेई आणि त्याची मुलगी ‘युलिया स्क्रिपाल’ या दोघांवर त्यांच्या राहत्या घराजवळ विषप्रयोग करून त्यांची हत्या घडविण्याचा प्रयत्न झाला होता. यामागे देखील रशियाचा हात असल्याची इंग्लडला खात्री आहे. त्यामुळेच इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी रशियामधील ‘वर्ल्ड कप’ अन्यत्र हलवला नाही तर इंग्लंड या  स्पर्धेवर  बहिष्कार टाकेल, अशी घोषणा देखील केली होती. आपल्या या भुमिकेवर जरी त्या कायम राहिल्या नसल्या तरी  इंग्लंडच्या राजघराण्यातील व्यक्तींनी आणि ब्रिटीश संसदेतील मंत्र्यांनी ‘वर्ल्ड कप’साठी रशियामध्ये जाऊ नये असं आवाहन मात्र करण्यात आलंय.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.