फक्त युपीतली गंतवणूक वाढवण्यासाठी नाही तर या कारणांसाठी योगी आदित्यनाथ मुंबईत आलेत

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा असलेले योगी आदित्यनाथ हे २ दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अनेक भेटीगाठी घेणार आहेत. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींसह ते महाराष्ट्रातील व्यावसायिकांनाही भेटणार आहेत. याशिवाय आदित्यनाथ हे मुंबईमध्ये रोड शो सुद्धा करणार आहेत.

योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात फिल्म सिटी बनवण्यासाठी सुरू केलेल प्रयत्न आणि हा दौरा हे समीकरणही या निमित्तानं चर्चेत आलंय. महत्त्वाचं म्हणजे या दौऱ्याला आदित्यनाथ यांच्यासोबत अभिनेते आणि खासदार असलेले रवी किशन हे सुद्धा आहेत. त्यामुळे, हा दौरा फिल्म सिटी उभारण्याबाबतचा पाहणी दौरा असल्याचंही बोललं जातंय.

योगींच्या भेटीगाठी:

योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची भेट घेतलीये.

या झाल्या राजकीय भेटीगाठी पण खऱ्या चर्चा आहेत त्या योगींच्या इतर भेटीगाठींच्या.

राजकीय भेटीगाठींशिवाय योगी आदित्यनाथ यांच्या बॉलिवूडमधल्या दिग्गजांशी भेटीगाठी निश्चित आहेत. शिवाय, आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, पिरामल एंटरप्राइझ लिमिटेडचे अध्यक्ष अजय पिरामल, जेएसडब्ल्यू ग्रुपचे एमडी सज्जन जिंदाल, टोरेंट पॉवरचे एमडी जिनल मेहता आणि हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांच्यासारख्या दिग्गज व्यावसायिकांच्या भेटीगाठीही ठरलेल्या आहेत.

आता बॉलिवूडच्या दिग्गजांशी योगींची भेट ही योगींचं स्वप्न असलेल्या उत्तर प्रदेशातल्या फिल्म सिटीशी जोडली जोडली जातेय.

२०२० साली योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधल्या नोएडात  फिल्म सिटी उभी करण्यात येईल अशी घोषणा केलेली. आतापर्यंत त्या फिल्म सिटीच्या निर्मीतीला सुरूवात झालेली नाही. त्यातच आज योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन बॉलिवूड स्टार अक्षय कुमारची भेट घेतली. त्यामुळे, मुंबईतली फिल्म सिटी नोयडाला शिफ्ट केली जाणार का? असा एक संशय व्यक्त केला जात होता.

मुंबईतली फिल्मसिटी नेणार नाही असं आता स्वत: योगी आदित्यनाथ यांनीच स्पष्ट केलंय.

या विषयावर योगी आदित्यनाथ यांनी बोलताना भुमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,

“मुंबईतील फिल्मसिटी घेऊन जाण्याचा आमचा कोणताही विचार नाही. मात्र आम्ही आमची स्वत:ची फिल्मसिटी उभारत आहोत.”

याशिवाय, नोएडामधली फिल्म सिटी अधिक भव्य दिव्य असणार असंही त्यांनी म्हटलंय.

उद्योगपतींची भेट नियोजित असल्यामुळं राज्यातले उद्योग नेण्याचा आरोप.

महाराष्ट्रात उभे राहणार हे नियोजीत झालेले उद्योग मागच्या काही दिवसांपुर्वी राज्यातून बाहेर गेले. वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस यांसारखे मोठे उद्योग राज्यातून बाहेर गेल्यापासून विरोधकांकडून सरकारवर या मुद्यावरून सतत टीका केली गेली. आता योगी आदित्यनाथ मुंबईच्या दौऱ्यावर असताना मोठ-मोठ्या उद्योगपतींची भेट घेणार आहेत.

शिवाय फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात युपीमध्ये होणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटसाठी ते ७ बड्या उद्योजकांना आमंत्रण देणार आहेत.

त्यामुळे, विरोधकांकडून पुन्हा एकदा राज्यातले उद्योग बाहेर नेण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातंय.

नाना पटोले यांनी यासंदर्भात आरोप केलेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात राज्य सरकारवर आणि भाजपवर टीका केलीये. ते म्हणाले,

“आता उरलेले उद्योग उत्तर प्रदेशच्या घशात घालण्यासाठी खोके सरकारने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी पायघड्या घातल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचा हा कुटील हेतू जनतेने लक्षात घ्यावा.”

राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी “गोरखपूरला मुंबईची बरोबरी करायला हजारो वर्ष लागतील.” अशा शब्दांत टीका केलीये.

तर, मुंबईमध्ये आज योगी आदित्यनाथ यांचा रोड शो होणार आहे त्यावरूनही टीकेला सुरूवात झालीये.

दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या योगी आदित्यनाथ यांचा आज मुंबईमध्ये रोड शो होणार आहे. त्यामुळे मुंबईत योगींच्या रोड शोची गरज काय असाही प्रश्न उपस्थित होतोय.

संजय राऊतांनी या रोड शो वरून सवाल उपस्थित केलाय.

“योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या विकासासाठी मुंबईतील उद्योगपतींना भेटायला आले असतील, तर त्याला आमचा आक्षेप नाही. मात्र, ते गुंतवणुकीसाठी रोड शो करणार असतील, तर ते आश्चर्यजनक आहे. या रोड शो ची गरज काय?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय.

हा रोड शो खरंतर भाजपकडून राजकीय शक्ती प्रदर्शनासाठी केला जातोय अशाही चर्चा सुरू आहेत.

मुंबई महानगर पालिकेच्या प्रचाराची पुर्वतयारी?

मुंबईत सध्या शिवसेनेची ताकद विभागली गेलीये. त्यामुळे शिवसेनेकडे असलेली हिंदुत्ववादी मतं मिळवण्यासाठी भाजपने देशातील आपला सर्वात आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा मैदानात उतरवला असू शकतो. याशिवाय उत्तर भारतीय मतं मिळवण्यासाठीही योगींच्या रोड शोची मदत होऊ शकते. त्यामुळे हे सगळं लक्षात घेता भाजपकडून मुंबई महानगर पालिका निवडणुकीची पुर्वतयारी म्हणून योगी आदित्यनाथ यांचा रोड शो आयोजित केला असल्याच्या चर्चा आहेत.

योगींचा दौरा आणखी काय सांगतो?

योगी आदित्यनाथ यांचा आज मुंबईत रोड शो असला तरीही येत्या काळाते देशभरातल्या ७ मोठ्या शहरात रोड शो करणार आहेत. आता, या रोड शोचं कारण उत्तर प्रदेशातली गुंतवणूक वाढवण्यासाठीचे प्रयत्न असं देण्यात आलं असलं तरी, प्रश्न पुन्हा तोच उभा राहतोय की, गुंतवणूक आणण्यासाठी रोड शो कशासाठी हवेत?

योगींची राष्ट्रीय राजकारणात एंट्री?

सोबतच एका वेगळ्याच चर्चेला सुरूवात झालीये. ती चर्चा म्हणजे, आता योगी आदित्यनाथ यांना भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या रांगेत बसवायला भाजपने सुरूवात केलीये. या चर्चा खऱ्या असतील तर, भाजपकडून २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीलाही सुरूवात झालीये हे नक्की.

या दौऱ्यातून महाराष्ट्राला काय मिळालं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि योगी आदित्यनाथ यांची भेट झाली त्यावेळी शिंदेंनी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची मागणी त्यांच्याकडे केली, त्याला आदित्यनाथ यांनी तत्वतः मान्यता दिली आहे.

ही तत्वत: मिळालेली मान्यता येवढी एकच गोष्ट योगींच्या दौऱ्यातून महाराष्ट्राला मिळालीये, असं सध्या सांगितलं जातंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.