पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात “जातपंचायत” ही न्यायव्यवस्थेपेक्षा मोठ्ठी ठरत आहे का?

७ फेब्रुवारी २०२१. मूळची बीड जिल्ह्यातील परळीमधील रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण या २२ वर्षीय मुलीने पुण्यातील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. फेसबुक, इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असलेली पूजा १ महिन्यापूर्वी स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी पुण्यात आली होती.

तिच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियात अनेक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या, या ऑडिओ क्लिपमध्ये बंजारा भाषेतील २ पुरुष व्यक्तिंचे संभाषण होते. सुरुवातीला यातील एक आवाज शिवसेनेच्या विदर्भातील मंत्र्यांचा असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे या मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून तरूणीने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपाच्या महिला आघाडीने केला.

मग हा मंत्री कोण अशी चर्चा सुरू झाली, थेट राठेड यांचे नाव कोणी घेत नव्हते, पण चित्रा वाघ यांनी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं आणि त्यांची अडचण झाली. यानंतर दुसरा आवाज हा पूजाचा मित्र अरुण राठोड याचा असल्याचा दावा करण्यात आला. मात्र तो आवाज त्याचा नाही असा दावा अरुणच्या गावकऱ्यांनी केला.

आता हे दोन्ही आवाज बंजारा भाषेतील असल्यानं आणि पूजा चव्हाण, मंत्री संजय राठोड हे दोघेही बंजारा समाजातील असल्यानं यात जातीची एंट्री झाली.

या सगळ्यामध्ये बंजारा समाजची भूमिका काय होती?

बंजारा समाज या सगळ्यामध्ये संजय राठोड यांच्या मागे भक्कम उभा असल्याचं दिसून आलं. या प्रकरणात त्यांचं नाव मुद्दाम अडकवण्यात येत असून ऑडिओ क्लिपच्या नावाखाली राठोड आणि बंजारा समाजाला बदनाम केलं जात असल्याचा आरोप समाजाकडून करण्यात आला.

तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्री राठोड यांचा राजीनामा घेऊ नये अशी मागणी करण्यात आली.

यानंतर १४ फेब्रुवारी रोजी या प्रश्नावर वाशिममधील पोहरादेवी संस्थान इथे समाजाची महत्वाची बैठक पार पडली. पोहरादेवी हे संस्थान बंजारा समाजाची काशी समजली जाते.

बैठकीला बंजारा समाजाचे धर्मगुरू स्वर्गीय रामराव महाराज यांचे धर्मपिठाधिश्वर बाबूसिंग महाराज, सेवालाल महाराज ट्रस्टचे अध्यक्ष कबिरदास महाराज, जितेंद्र महाराज आणि बंजारा समाजाचे अध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत संजय राठोड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर विरोधकांनी आमच्या समाजाची बदनामी केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करू असा इशारा देखील समाजाकडून देण्यात आला. पुसद इथं संजय राठोड यांना समर्थन देणार तसा मोर्चा देखील काढण्यात आला.

ही सगळी बैठक एक म्हणजे एक प्रकारची जात पंचायत असल्याचं सांगण्यात आलं, जिथं संपूर्ण समाजाने संजय राठोड यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेण्यात आला.

पण बंजारा समाजात जात पंचायत आजही अस्तित्वात आहे का?

तर हो, https://goarbanjara.com या बंजारा समाजच्या अधिकृत वेबसाइटवरनुसार, बंजारा समाज हा स्वतंत्र बोलीभाषा बोलणारा, स्वतंत्र जातपंचायत असणारा, संपूर्ण भारत देशामध्ये एकच वेशभूषा असणारा समाज आहे. असा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच अलीकडेच धुळे तालुक्यातील खोरदड तांडा इथं अंतर्गत वादातून इथल्या बंजारा जातपंचायतीने ५ कुटुंबांना समाजातून बहिष्कृत केलं होतं.

आता मुळ प्रश्न असा की ही जात पंचायत महत्वाची ठरत आहे का?

पुजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर ते मागच्या १०  ते १२ दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ झाले होता. त्यानंतर ते थेट आता आज पोहरादेवी संस्थानामध्ये सर्वांसमोर आले आहेत.

मात्र राठोड हे एका घटनात्मक संस्थेचे सदस्य आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे ते पहिल्यांदा लोकांना उत्तरदायी आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पोलिस, विधानसभा, न्यायसंस्था, मंत्रिमंडळ बैठक किंवा अगदी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणं अपेक्षित होतं.

मात्र ते थेट बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरात आणि प्रामुख्याने बंजारा समाजातील लोकांपुढे येत असल्याने या प्रकरणात ‘जात’ हा घटक किती महत्वाचा आणि घटनात्मक संस्थांपेक्षा श्रेष्ठ आहे हे दिसून येत. 

याचं कारण जाणून घेण्यासाठी आम्ही जेष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार यांच्याशी संपर्क साधला. ते ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,   

त्यांचा मतदारसंघ हा आजही जातीशी संबंधित आहे. यांचं संपूर्ण राजकारण हे मतदासंघातील या लोकांवर अवलंबून असते. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती मतदार हे आपल्या जातीतील उमेदवारालाच मतदान करतात. त्यामुळे तो मतदार आपल्यापासून दुरावू नये यासाठी हा प्रयत्न असतो.

हे न्याय व्यवस्थेला आव्हान ठरत आहे का? 

या प्रश्नाचं उत्तर देताना ऍड. असीम सरोदे ‘बोल भिडू’ शी बोलताना म्हणाले, 

मंत्री राठोड यांनी न्यायचं सत्ताबाह्य केंद्र तयार करणं हे पूर्णतः चुकीचं आहे. ते न्याय आणि अन्याय ठरवणारे कोणीच नाही. ते केवळ श्रद्धेचं स्थान असू शकत न्यायचं केंद्र नाही. आपल्याकडे जात पंचायत विरोधी कायदा देखील आहे. त्यानुसार कोणतीही समांतर न्यायव्यवस्था किंवा सत्ता केंद्र सुरु करता येत नाही. आणि तसं जर करून कोणी न्याय संस्थेला आव्हान देत असेल तर ते घटनेला मान्य होणार नाही.

जातीव्यवस्था ही न्यायसंस्थेपेक्षा श्रेष्ठ ठरू शकते का?

या प्रश्नावर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी ‘बोल भिडू’ शी बोलताना म्हणाले, 

कायद्यानुसार जातीव्यवस्था सध्या अस्तित्वात नाहीत, पण ही जी वेगवेगळी धार्मिक ठिकाण आहेत तिथून त्यांचा अंमल चालू आहे, असं दिसतं. त्यांना जर स्पष्टीकरण द्यायचं असत तर ते त्यांनी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला देणं अपेक्षित होतं. तिथं जाऊन जे स्पष्टीकरण देत आहेत हे समाजाला देत आहेत, राज्यातील जनतेला नाही.

उद्या जर संविधानानुसार जात की न्याय असा जर प्रश्न आला तर त्याच उत्तर हे केवळ न्याय आणि न्यायसंस्था हेच आहे. त्याला पर्याय असूच शकत नाही.

आता संजय राठोड हे पोहरादेवीचे दर्शन घेऊन याठिकाणी उपस्थिती बंजारा समाजातील लोकांसमोर आपली बाजु मांडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.