ना मराठी, ना बॉलिवूड बॉक्स ऑफिसचं गणित फक्त तेलगू पिक्चरानांच कळलंय

सर पे कफन बांधणेवाले कभी मौत से नाही डरते

ते

पुष्पा, नाम सुनके फूल समझे क्या फायर है मै

मास ते पुष्पा तेलगू पिक्चरचा स्वॅगच जरा   वेगळा असतो. तसं तर आपल्या पिढीनं नागार्जुन, चिरंजीवी यांच्या पासून सुरवात केली मग अल्लू अर्जुनाचा आर्या, रामचरणाचा मगधीरा कितीवेळा बघितला असेल हे नं विचारलेलंच बरं.

इतक्या दिवस नुसत्या कंटेन्ट आणि ऍक्शनवर आपला एक हक्काचा प्रेक्षकवर्ग निर्माण करणाऱ्या तेलगू सिनेमानं आता मात्र थेट बॉलिवूडला बॉक्स ऑफिसवर पण टक्कर द्यायला सुरवात केली आहे.

आजच्या घडीला बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त गल्ला जमवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत राजामौली आणि प्रभास यांचा बाहुबलीच टॉपला आहे. या वर्षीही थिएटरला आल्यानंतर काही दिवसातच OTT प्लॅटफॉर्मवरही पुष्पा रिलीज झाला तरीही पिक्चरनं ३०० कोटींचा आकडा पार केला होता. इतकच नाही तर 2021 मध्ये तर तेलुगू पिक्स्चर्सनी  तमिळ आणि बॉलीवूडला पण मागे टाकलंय. तेलुगू सिनेमाने २०२१ मध्ये ₹१,२०० कोटींची कमाई केली होती तर तामिळ सिनेमाने ₹८०० कोटी आणि हिंदी सिनेमाने ₹७०० कोटींचा गल्ला जमावाला होता. तिकिटाची वेबसाईट BookMyShow ने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या प्लॅटफॉर्मवर मागील १२ महिन्यांत खरेदी केलेल्या संपूर्ण तिकिटांपैकी तेलुगू आणि तमिळ चित्रपटांचा एकत्रितपणे ५0% वाटा आहे.मान्यपणे फील्ड वर्कप्लेस कलेक्शनपैकी ६0% व्युत्पन्न करतात.

इतक्या दिवस साऊथचे पिक्चर या कॅटेगरीत तमिळ चित्रपटांपुढे तेलगू पिक्चर वेगळे दिसत नव्हते. आता मात्र तेलगू पिक्चर्सनी स्वतःसाठी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. इतक्या दिवस साऊथमध्ये चालला तर बॉलिवूडमध्ये एंट्री असं गणित आहेत. आता मात्र बॉलिवूडचे सुपरस्टार साऊथकडे वाळायला लागलेत. आगामी RRR या पिक्चरमध्ये आलीय भट आणि अजय देवगण दिसणार आहेत. त्यामुळं मग एकदा बघू तरी तेलगू पिक्चरवाल्यांची पूर्ण भारतभर हवा कशी होतेय.

तर याची सुरवात झाली टीव्ही पासून ..

टियर २ आणि ३ शहरे आणि ग्रामीण भागातील बहुसंख्य हिंदी भाषिक प्रेक्षक अनेक वर्षांपासून प्रादेशिक चित्रपटांच्या डब केलेले पिक्चर  पाहत आहेत आणि हळूहळू त्यांची आवड निर्माण होत गेली. मग हे  चित्रपट आणि चित्रपट बनवण्याच्या शैली हिंदी आणि इतर भाषेतील प्रेक्षकांसाठी परक्या  राहिल्या नाहीत.

बॉलीवूडमधील अनेक सुपरहिट मसाला चित्रपट (वॉन्टेड, बॉडीगार्ड आणि रेडी, कबीर सिंग)  हे तेलुगू चित्रपटांचे रीमेक आहेत.

त्यामुळे लोकांना या पिक्चरची लत लागली.गोल्डमाइन्स फिल्मसारखे प्रोडक्शन हाऊस ज्यांनी साऊथचे पिक्चर डब करून हिंदीत आणले त्यांचा यात मोठा वाटा होता. 

गोल्डमाइन्स फिल्मने नागार्जुनचा मास पिक्चर ७ लाख रुपयांना विकत घेतला होता आणि आज अशा चित्रपटांचे दर २० कोटींहून अधिक झाले आहेत.

दुसरं म्हणजे ओटीटी आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ज्यांनी स्क्रिन नं मिळण्याचं कारण मागे पडलं 

इतक्या दिवस जर कोणत्याही साऊथच्या पिक्चरला राज्याबाहेर प्रदर्शित होण्यामागे सर्वात मोठा अडथळा असायचा थिएटरचा. अनेक वेळा दुय्यम दर्जाच्या थिएटर्स या चित्रपटांना मिळायचे. मात्र OTT प्लॅटफॉर्म्स आले आणि हा प्रश्न मिटला. आता प्रेत्येकाच्या हातात असलेल्या स्क्रीनवर पिक्चर दिसू लागले. जिथे डबिंगमुळे तुम्ह्लाला भाषा बदलायचा आपण ऑप्शन पण असतो.

तिसरं महत्वाचं कारण म्हणजे क्रॉसओवर पिक्चर्स 

क्रॉसओवर पिक्चर्स म्हणजे वेगवेगळ्या इंडस्ट्रीतले हिरो हेरॉईन एकत्र काम करतात. म्हणजे जसे आता बॉलिवूडचे ऍक्टर्स तेलगू पिक्चर्समध्ये काम करतायेत. पुढील काही महिन्यांत याच कॅटेगरीतले  दोन भव्य चित्रपट – राजामौलीचे RRR आणि पुरी जगन्नाधच चा  लिगर – प्रादेशिक चित्रपटांच्या यशस्वीतेचे बेंचमार्क बनू शकतात. तेलगू स्टार्स ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या RRR मध्ये प्रतिभा आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनाही कास्ट केले आहे. विजय देवरकोंडा अभिनीत लिगरमध्ये हिंदी अभिनेत्री अनन्या पांडे देखील आहे. 

यामुळे चित्रपटाचा नवीन इंडस्ट्रीमध्ये चित्रपटाला आयता फॅन बेस वाढतो आणि त्याचाबरोबर चित्रपट लोकांना परका पण वाटत नाही. 

प्रोमोशनवर घेतलेली मेहनत 

तेलुगू चित्रपटांना आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही बाजारपेठा आहेत आणि त्यासोबतच इतर राज्यांमध्ये संपूर्ण स्टारकास्टसह होणारे प्रमोशन अतिरिक्त बोनससारखे आहे. विशेष म्हणजे, ‘RRR’ च्या प्रोमोशनसाठी राम चरण, ज्युनियर NTR, आलिया भट्ट आणि राजामौली  चेन्नई, कोचीन आणि मुंबई अशी सगळी शहरं करत आहे. नॅशनल लेव्हल ला केलेल्या प्रमोशनमुळे चित्रपटाबद्दल देशभर बझ निर्माण होतो. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’साठीही असंच करण्यात आलं होतं. पुष्पाची टीम चेन्नई, मुंबई, कोचीन आणि हैदराबाद सारख्या प्रमुख शहरांमध्ये प्रमोशनसाठी फिरली होती.

सोशल मीडिया फोडण्याचा सापडलेला फॉर्मुला 

आज कुठलाही पिक्चर हिट व्हायचा असेल तर सोशल मीडियावर त्याची गाणी, डायलॉग , लूक्स हिट झाले पाहिजेत हे ठरलेले गणित. आणि तेलगू इंडस्ट्रीने हा कोड बरोबर क्रॅक केला आहे. लिप सिंक असो दे की हुक स्टेप्स असो किंवा अगदी मीम्स, ‘ओ अंतवा’, ‘सामी सामी’,  ‘बुट्टा बोम्मा’, ‘इन्केम इंकेम’  तेलगू गाणी लिरिक्स कळली नसली तरीही इंटरनेट सेन्सेशन ठरली होती. अगदी रवींद्र जडेजा ते डेविड वॉर्नर यांनी श्रीवल्लीच्या गाण्यावर पाय लंगडवत केलेला डान्स बघून लोकांना पुष्पा बद्दल उत्सुकता निर्माण झाली नसती तर नवलंच.

पिक्चर हिट होत असल्यानं फंडींगचा मिटलेला प्रश्न..

रिजनल सिनेमा म्हटलं की पहिला अडथळा असायचा फंडींगचा मात्र जसे जसे पिक्चर हिट होत गेले तसा प्रश्न मिटत गेले. त्याचबरोबर बाहुबलीसारख्या बिग बजेट पिक्चर्सनी त्यांच्यावर लावलेल्या पैशांचे रिटर्न्स दिल्यानं गुंतवणूकदार पण आता बिग बजेट चित्रपटासाठी पुढे येत आहेत.

आणि हे सगळे बदल स्वीकारत असताना तेलगू सिनेमाने त्यांचा मूळ बाज मात्र बदलला नाही.

अगदी टोकाचे इमोशन मग ते हिरोचं प्रेम करणं असू दे की बदला घेणं यात हिरोचं कुठेच मुळमुळीत वागणं नसतंय. आणि याला जोड असते गुरुत्वाकर्षणनाला आणि फिजिक्सच्या इतर सिद्धांतांना फाट्यावर मारत केलेली ऍक्शन. त्याचबरोबर काही अपवाद सोडले तर तेलगू पिक्चरवाले जास्तीचे ग्यान देत बसत नाहीत. आणि हे सगळे घटक एकत्र आणले की बनतो एक परफेक्ट मसाला पिक्चर. आणि रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून ज्याला फक्त मनोरंजन म्हणून पिक्चर पाहायचा आहे त्यांना असाच डोक्याला ताप नं देणारा निखळ मनोरंजन करणारा पिक्चर पाहिजे असतो.

आणि यामुळेच तेलगू पिक्चर देशभर हवा करतायेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.