गरीबाला परवडणारा आणि श्रीमंताना आवडणारा ‘निलंगा राईस’.

लातूर जिल्ह्यातील निलंगा. उन्हाने रखरखलेल्या मराठवाड्यातलं एक छोट शहर. इथल निळकंठेश्वर मंदिर अख्ख्या भारतात प्रसिद्ध आहे. या गावाने महाराष्ट्राला एक माजी मुख्यमंत्री दिलाय, एक भावी मुख्यमंत्री दिलाय. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गावाने महाराष्ट्राला निलंगा राईस दिलाय.

काय आहे हा निलंगा राईस आणि त्याची सुरवात कशी झाली?

निलंगा तालुका हा उत्तर कर्नाटकला खेटून उभा असलेला भाग. बहामनी साम्राज्य , आदिलशाही, निजामशाही अशा अनेक राजवटी पाहिल्या. शेजारीच असलेल्या उत्तर कर्नाटकातला बिदर जिल्हा म्हणजे दुष्काळी भाग.

महाराष्ट्र आणि तेलांगना या दोन्हीच्या मधोमध वसलेला बिदर अनेक संस्कृतीचे मिश्रण आहे.  या भागातून हजारो लोक कामासाठी इकडे तिकडे पसरले आहेत. त्यातीलच काही कन्नड भाषिक लोक निलंगा शहरात देखील येऊन राहिले.

हा सगळा कष्टकरी समाज होता. दगड फोडणे, रस्ता बनवणे, ऊस तोडणे अशी कामे करायचा. त्यांच हातावर पोट होतं.

दिवसभर घाम गाळायच तर सकाळी पोटभर नाश्ता करणे गरजेच असायचं. दाक्षिणात्य पद्धतीने भात खायची सवय होतीच. सुलतानशाहीत मध्यआशियातून पुलाव बिर्याणी सारखी ‘तहारी’ न्याहरीला खाल्ली जायची. आता ही मटन घातलेली तहारी तर गरीब कामगाराला परवडणारी नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यात काही बदल केले गेले, मटणाच्या जागी बटाटा वापरण्यात आला आणि बनला निलंगा राईस !!

हायवेची वगैरे कामे सुरु होती. दगड फोडणाऱ्या या मजुरांच्या उदरभरणच्या सोयीसाठी पहाटे पहाटे हा मसाले भात विकणारा गाडा उभा राहू लागला. अगदी पाच रुपये वगैरे किंमतीमध्ये मिळणाऱ्या या भाताने पोट भरू लागले. काही दिवसातच अख्खा निलंगा सकाळच्या न्याहरीला हा आलूभात खाऊ लागला. या भाताची लोकप्रियतेचा घमघमाट अख्ख्या मराठवाड्यात पसरला.

निलंगा गावावरून पूर्ण मराठवाड्यात त्याला निलंगा राईस म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

प्रत्येक छोट्या मोठया गावात स्टँडवर, बाजारात सकाळी या भाताचे गाडे उभे राहू लागले.  खऱ्या अर्थाने हे कष्टकर्यांचे खाणे होते. आजही दहा रुपये ते वीस रुपये या किंमतीत हा राईस मिळतो. एकेकाळी गाड्यावर खपणारा पदार्थ निलंगाच्या छोट्या मोठया हॉटेलमध्येही मिळू लागला. एवढेच काय आज पुण्यामुंबईसारख्या मोठया शहरातही निलंगा राईस मिळतो. पण खिशाला परवडणारा राईस ही त्याची ओळख विसरली गेली नाही.

आज साधा एक चहा दहा रुपयात मिळतो अशा वेळी तेव्हड्याच किंमतीमध्ये पोटभरण्याची खात्री निलंगा राईस देतो.

खर तर निलंगा भागात भात पिकत नाही. तेलंगनामधून येणाऱ्या चांदतारा तांदळामध्ये हा भात बनवला जातो. इथे मिळणाऱ्या भाताच्या चवीची सर भल्या मोठया फाईव्ह स्टार हॉटेलच्या बिर्याणीला सुद्धा नसते. आज निलंगामध्ये पन्नासच्यावर हॉटेल मध्ये निलंगा राईस मिळतो. पहाटेच्या वेळी भल्या मोठया पातेल्यात जवळपास दहापंधरा किलो भात शिजतो. उन्ह डोक्यावर येईपर्यंत तो संपूनही जातो.

निलंगा मध्ये गरीब कष्टकरयाची सायकल आणि मंत्र्याची मोठी कार सकाळ सकाळी मुशीर कादरी साहेबांच्या निलंगा राईस हॉटेलच्या बाहेर शेजारी शेजारी उभी असलेली दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.

धर्म जात पंथ यांची सावली देखील या भातावर पडत नाही. सर्व समाजातले सर्व थरातले लोक एकत्र बसून या निलंगा राईसचा आस्वाद घेतात. घरच्यांसाठी पार्सल बांधून जातात. या भाताने निलंगेकराना बांधून ठेवलेले आहे. 

रोज जवळपास दीडहजार ते दोन हजार किलो राईस निलंगेकर फस्त करतात. गरीबांना परवडणारा आणि श्रीमंताना आवडणारा भात खाण्यासाठी निलंग्याला एकदातरी भेट दिलीच पाहिजे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.