सोलापूरात खडा, तर परभणीत बल्लर. तुमच्या भागात प्रेयसीचा कोडवर्ड काय आहे ?

ती काल खोलीवर आली.नंतर मित्र आला, तेव्हा ती गेली. मित्र ठरवून ठरलेल्या वेळेत आला. तो आला आणि म्हणाला, काय नटी आल्ती का? कोल्हापूरात प्रेमाचं नाव नटी आहे हे पहिल्यांदा समजलं. तस कोल्हापूरसाठी रांगडा शब्द म्हणून छावी पण आहे. माणूस, माल, सामान, कंडका, आणि टवका प्रत्येक पिढीचा खास शब्द पण नटी तशीच तोंड बांधून चटकन पन्हाळ्यावर येणारी. चल म्हणलं की चल. हा बाबा पन्हाळ्यावर नेणाराय का नरसोबच्या वाडीला याची काळजी तिला नसायची.

सांगलीत होतो तेव्हा तीला सगळे हत्यार म्हणायचे.

आपण संजय दत्त आणि ती आपली AK47 असं ते नातं होतं. हत्याराबरोबर आलेले कंडका, माल, सामान, आयटम,छावी हे शब्द होतेच पण सांगली आणि कोल्हापूरात जस रंकाळा आणि घाटाचा फरकाय तसाच फरक हितं नटी आणि हत्याराचा आहे. तिथ नटी आणि हितं हत्यार. बाकी कृष्णा आणि पंचगंगेच्या पाण्यासारखं सगळं मिक्स होतं असतच की. 

सोलापूर, बार्शी, कळंब हा भाग खरा दर्दी. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमेवरचा हा भाग. आपण जन्मताच बॉर्डरवर आहोत हे इथल्या पोरांच्या नसानसात भिनलय. त्यामुळं बंडखोरी करायला हितली पोरं पुढं. माळरानावरचा खडा म्हणून हितं प्रेयसीला खडा म्हणतात की अजून काय वेगळं कारण आहे ते मिळालं नाही पण हितला जिव्हाळ्याचा शब्द खडा. बाकी दोन्हीकडच्या आक्रमणामुळं खड्याची अधूनमधून आयटम नायतर छावी होतच असते. पण खडा पर्मनंटय. अस्सल माळरानावर खेळलेली पोरं मात्र ईकान, लडतर, जुगमं म्हणतात. 

लातूरात गेलं की खड्याची होती फंटी. तर बीडमध्ये होती बल्लर.

इथल्या पोरींसारखाच या शब्दाचा अर्थ कळलां नाही. बल्लर का? तर काहीच नाही. असच बल्लर तर बल्लर. परभणी, नांदेडच्या मुस्लीम भागात मात्र बल्लरची रोमॅंन्टिक सिमरन होते. आपली इर्सल मस्ती तिच्यातपण दिसावी म्हणून बल्लर असावा आणि मुस्लीम ती दिसली की नजाकतीत आपआप सुरमा लावून ती सिमरन होतं असावी. लॉजिक तर काय कशाचही मांडता येत. बल्लर काय मग सिमरन काय

त्याच्या पलिकडचं घ्यायचं झालं तर पोट्या पोट्टी चालू होतं. या भागात बासण हा शब्द वामन मेश्राम यांच्या कांदबरीत ऐकल्याच एकाने सांगितलं बाकी तिथ पण ठावकी,डाव, माल, सेटिंग हे शब्द कॉमनच आहेत. 

औंरगाबाद, जालना मध्ये हक्काची मशीन हा शब्द आहे. कदाचित इथल्या पोरी सुपरफास्ट असाव्यात. पन्हाळ्यासारखी जागा इथ नाही. गेलं तर अंजिठाच,आणि अंजिठापर्यन्त येणारी मशीन मिळणं अवघडय. मशीन सोबत होतो, मशीन रुमवर आलती, जयंतची मशीन काटाय असले डॉयलॉग हक्काच्या पोरांकडून ऐकायला मिळतात. थोडक्यात काय तर औंरगाबाद मध्ये आल्यानंतर अखिल मराठवाडा मित्र मंडळातून मशीन शब्द परमनंट होवून जातो. कालांतरानं मशीनच लग्न होतं आणि पोरगं MPSC, UPSC करायला पुण्यात येतं. 

पुण्याला येताना मध्ये लागतं नगर. अगर मगर आणि अहमदनगर. हिकडंच आणि तिकडचं दोन्हीकडचं जरा जरा अस्तित्व जपणारा हा जिल्हा. हितला खास असा शब्द आम्हाला तर मिळाला नाही. खडा, मशीन या दोन्ही शब्दांमध्ये फिस हा एक शब्द मिळाला पण त्याचं अस्तित्व किती हे सांगता येणार नाही. बहुतेक ऊसाच्या पैशामुळे पोरी लग्न करुन लवकर सेट होत असाव्यात अस वाटतं.

त्याच्या वरती उत्तर महाराष्ट्रात किटली हा शब्द ऐकायला मिळाला. त्याच पण अस्तित्व तेवढच. एखाद्या आजूबाजूच्या गावात आणि त्यानंतर शहरात आलेल्या पोरांच्यात त्याच्या अलीपलीकडे सापडतात ते माल, सेटिंग, आयटम हेच. 

मुंबईत आयटम आणि गर्लफ्रेंन्ड हे शब्द तसे कॉमनच. माल्टा हा शब्द ठाण्यात बोल्ला जात असल्याचं सांगितलं जातं पण हे सांगणारी पिढी भिकू म्हात्रेची पिढी असल्यानं त्या शब्दाचं आत्ताच स्थान सांगता येणार नाही. माल हा मुंबई उपनगरात वापरला जातो तर आगरी समाजात डाव हा हक्काचा शब्द आहे.

खाली कोकणात येताना घाट आणि मुंबई या संकरित पट्यातून यावं लागतं.तिथे देखील असेच शब्द मस्का, चुंबक, विषय, चिकनी, चांदणी, सामान असे शब्दांचा संकरीत पट्टा निर्माण होतो. तो विसावतो तो थेट मालवणीच्या अस्सल गोडीत तिथ प्रेयसीला णामूस म्हणतात. माणूसच उलटं करुन कोणाला समजणार नाही याची खबरदारी मालवणीत अशाप्रकारे घेतलेली पाहून समाधान वाटतं. मात्र अस्सल जूना शब्द म्हणून केत हा शब्द मिळाला. “केत” सांगणारा णामूस देखील भिकू म्हात्रेच्या पिढीचा. त्यामुळे आज हा शब्द कितपत वापरला जातो पक्क सांगता येणार नाही. 

बऱ्यापैकी महाराष्ट्र फिरून झालेली अनेकांच्या मशीन, माणूस, नटी, हत्यार, खडा, बल्लर, केत, माल्टा, माल, विषय,मंडळी येतात त्या पुण्यात फरक फक्त इतकाच असतो त्या लग्न करुन वेल सेटल होतात आणि आपण पेठांमध्ये रात्र रात्र काढू लागतो.

पुण्याच्या या सास्कृतिक मायाजालात आपणाला भेटते चमकी, सामान, विषय, छावी असे शब्द जरा कमी जरा अधिक प्रत्येकांच्याच सांस्कृतिक मिक्सरमधून बाहेर पडतात. कधी पिंपरी चिंचवड मध्ये त्यांचा पत्रा होतो तर कधी विषय होतो. पण पोरी त्यांच नाजूक साजूक कधीतरी सोडून जाणाऱ्या किंवा आईबापाला सोडून आपल्यासोबत उभा राहणाऱ्या. 

अशा कित्येक मुली प्रत्येकांच्या आयुष्यात आल्या. प्रत्येकीचं नाव वेगळ होतं पण तीच असणं तेच असायचं.चोरुन चोरून भेटणं, हळूच गाडीवर बसणं,प्रेमाच्या दिलेल्या आणाभाका असोत की आणि काही पण चालायचं… 

असच तुमच्या आयुष्यात आलेल्या नटी, सामान, विषय, पत्रा, माल, माल्टा, खडा, छावी, डाव, आयटम, कंडका, माणूस, मंडळी, टवका, चुंबक, मस्का, णामूस, केत, बासण, किटली, पोरगी, ईकान, लडतर, जुंगम, बल्लर, मशीन, डेंजर, झेंगट, फंडींना सलाम!!! 

त्यांच्यामुळेच तुम्हाला काहीतरी वेगळं जमवता येतय. तरीदेखील फेसबुकच्या गर्दीत तुम्ही तीला कुठेतरी शोधतायच. झालं असेल तर जा बिंनधास्त आपआपल्या नटीला शोधून या एकदा. 

हे ही वाचा.

1 Comment
  1. माने प्रफुल्ल उद्धव says

    अहहहहहहह काय लेख लिहिला रे भाऊ एक नंबर की,,, कधी लातूर , उस्मानाबाद ला आल्यावर मेल करा मला भेटायचं आहे तुम्हाला अन पदस्पर्श करायचे आहेत…

Leave A Reply

Your email address will not be published.