पोर्तुगीजांना अख्ख्या भारतावर राज्य करण्याची संधी आली होती पण ते गोव्यातच का अडकले?

भारतात समुद्रमार्गे येणारा पहिला माणूस होता वास्को द गामा. तो पोर्तुगीज होता. १४९८ मध्ये कालिकत बंदरावर हा माणूस उतरला. याआधी एकही युरोपियन देशाला हे काम जमलं नव्हतं. त्याच्यामुळं पोर्तुगीज लोकं या समुद्रमार्गे व्यापाराच्या शर्यतीत सगळ्यात पुढं गेली.

इंग्रजांना अशी काही भानगड असते ही खबर लागण्याच्या कितीतरी आधीची गोष्ट. पवित्र रोम शहराच्या पोपचा हात पोर्तुगीजांच्या पाठीशी होता. त्यामुळं नवनवीन प्रदेशात पोर्तुगीज धडक मारू शकत होते.

याच काळात पोर्तुगीज भारताच्या दुपटीहून मोठ्या असणाऱ्या ब्राझीलमध्ये जाऊन पोचले होते.

१५०० सालापासून त्यांनी तिथं आपली पकड बनवायला सुरुवात केली. या काळात या प्रचंड प्रदेशावर आणि येथील स्थानिक लोकांवर त्यांनी आपलं राज्य प्रस्थापित केलं.

मग भारतात आधी येऊनही पोर्तुगीजांना मोठी मजल का मारता आली नाही? त्या काळात त्यांना तोडीस तोड कुणीच नव्हते. इंग्रज फ्रेंच युरोपातच व्यस्त होते. मग भारतावर पोर्तुगीजांची सत्ता का स्थापन झाली नाही?

तर यासाठी पोर्तुगीजांनी चांगला प्रयत्नही केला होता. सुरुवातीलाच त्यांनी गुजरातच्या नबाबाकडून मुंबई जिंकून घेतली. गोव्यावर जवळपास पूर्ण कब्जा केला. तिथल्या प्रजेला आपल्या बाजूला वळवून घेतले. वसई शहरातून नबाब बहाद्दूरशाह आणि दीव बेटाचा सुभेदार मलिक टोकन यांनाही पाणी पाजले.

पण या वेळी पोर्तुगीज हरले ते स्वतःच्याच हातांनी. आपला आळशीपणा आणि नाकर्तेपणाने त्यांचा घात केला.

इ.स. १५३२ मध्ये पोर्तुगीजांची वसईमध्ये स्थानिक मुस्लिम राजाशी लढाई झाली होती. नुनो द कुन्हा हा पोर्तुगीज खलाशी १५० गलबते आणि ४००० सैन्य घेऊन लढत होता.

एवढ्या जोरासमोर तिथल्या सैनिकांचा जोर चालला नाही. सर्व मुस्लिम सैनिक आणि सुभेदार पळून गेले. बेटावर पोर्तुगिजांचा ताबा आला. फक्त २ सैनिक गमावून त्यांनी हि मोक्याची जागा जिंकली.

पण नंतर काहीच तासांत त्यांना रिकाम्या हाताने परत गोव्याला जायला लागले.

कारण का? तर येताना पोर्तुगीज शिबंदी आणायलाच विसरले होते.

इथे थांबल्यास शिबंदी नाही आणि संरक्षणही नाही अशी त्यांची अवस्था झाली. त्यामुळं एवढा विजय मिळवूंनही त्यांना आल्या वाटेने परत जावे लागले. त्यांच्या ढिसाळ नियोजनाचे हे फक्त एक उदाहरण!

शिवाजी महाराजांचे स्वराज्य टिकू शकले कारण त्यात रयतेला स्थान होते. पोर्तुगीज याच्या बरोबर विरुद्ध होते. प्रजेशी खोडसाळपणा करण्याची त्यांना सवय होती. याचे उदाहरण स्वतः पोर्तुगीज कागदपत्रात मिळते.

१ डीसेम्बर १५६० रोजी गोन्साला रॉड्रीको या अधिकाऱ्याने एक पत्र पोर्तुगालला पाठवले होते. त्यात असा मजकूर होता –

“इथून जवळ एक हिंदू लोकांचे तीर्थ आहे. तिथं हे लोक अंघोळ करायचे. आम्ही आता त्याच्यावर बंदी घातली आणि तिथं माउंट कल्व्हरी हे चर्चच बांधून टाकलं आहे.”

हा खोडसाळपणा इथंच थांबत नाही. हे तीर्थ मोडल्यावर लोक दूर डोंगरात २ तासांच्या अंतरावर एका तळ्यावर जाऊन पूजा करू लागले. तर त्यावर गोन्साला रॉड्रीको म्हणतो की

“आम्ही हे टाकेही भ्रष्ट करून टाकले. तसेच देऊन पाडून टाकून तिथल्या भक्ताला कैद केले होते.”

या खोडसाळपणासाठी भारतात आलेले पोर्तुगीज जगभर बदनाम होते. काही कारण नसताना एकदा त्रिनिनाद (वेस्ट इंडिज)च्या रस्त्यावर त्यांना एक जुनी मुस्लिम कबर दिसली. त्यांनी ती उगीच फोडून टाकली. आपल्या प्रजेत ब्राह्मणांना त्यांनी ‘शेंडी ठेवायची असेल तर कर भरा’ अशी आज्ञा केली होती.

जर हिंदू माणसांनी विधिपूर्वक लग्न केले तर त्यांना दंड भरावा लागेल. अन्यथा त्यांना जेलमध्ये जावे लागेल अशी थेट आज्ञा त्यांनी दिली.

किल्ल्यावर लढायलाही ते हिंदूंना येऊ देत नसत. फक्त ख्रिश्चन असेल त्यानेच किल्ल्यात यायचे असा त्यांचा दंडक होता.

त्यामुळे उत्तर कोकणात मोठे साम्राज्य स्थापन करण्याची संधी या लोकांनी स्वतःहून घालवली. नंतरच्या काळात आलेल्या इंग्रजांनी कोळी आणि इतर स्थानिक लोकांचा आपल्या साम्राज्यासाठी वापर करून घेतला होता. म्हणून त्यांना यश मिळू शकले. त्यांनी वसईत एक जेसुइट कॉलेज सुरु केले होते. इथे अनेक फादर राहत आणि शिकत.

यातील एक वरिष्ठ असा अनुभवी फादर होतास. त्याचे नाव फादर इम्यानुएल दि कोस्टा. याला सर्वजण अतिशय मान देत.

पोर्तुगीज जनतेसोबत काय करत आहेत हे तो बघत होता. तो अचानक प्रचंड आजारी पडला. १६१८ साल होते. पोर्तुगीजांना बाहेर एकही मित्र उरला नव्हता, त्यामुळे किल्ल्यावरच त्याची सुश्रुषा सुरु होती. मरण्याच्या काही वेळ आधी फादर इम्यानुएल दि कोस्टा जुन्या गोष्टी आठवायला लागला. हे शहर आपण कसे वसवले याची त्यांना जाणीव होती.

“शिक्षा होणार आहे…. या शहराला भीषण शिक्षा होणार आहे…!”

असा शाप त्याने या शहराला दिला. १५ मे १६१८ साली त्याचा मृत्यू झाला.

तो मेला न मेला त्याच्या काही तासांमध्येच आकाशात ढग भरून आले. वीज कडाडल्या आणि जोरात प्रलयंकारी वर वाहू लागला. समुद्रात चक्रीवादळास सुरुवात झाली. समुद्राच्या लाटा प्रचंड प्रमाणात वाढून त्या चक्क किल्ल्याची भिंत ओलांडून आत येऊ लागल्या. किनाऱ्यावर लावलेल्या नौका फुटून गेल्या. किल्ल्याबाहेरची वस्ती पूर्णपणे समुद्रात गडप झाली. गावातील अनेक घरे पडली. किल्ल्यात पाणी शिरले.

वसईच्या किल्ल्यात तेव्हा तीन चर्चेस होती. त्यांचेही प्रचंड नुकसान झाले. गावकऱ्यांच्या मते पोर्तुगीजांना देवाने ही शिक्षा दिली होती. अनेक पोर्तुगीज याला खरे मानू लागले.

सुदैवाने तेव्हा शापाप्रमाणे शहर पाण्याखाली गेले नाही. पण यानंतर वसईत प्रचंड दुष्काळ पडला. वसईची प्रचंड परवड झाली. पोर्तुगाल वरून गोव्यात येताना पोर्तुगीज लोकांनी अनेकदा अरब लोकांना डिवचले होते.

पोर्तुगीज एवढे कमकुवत झाले की अरबस्थानातून आलेल्या काही लोकांनी जाताजाता त्यांना धडा शिकवायचे ठरवले.

४ फेब्रुवारी १६७४ ला अवघे ६०० अरब तरुण सहज म्हणून वसईत उरले. शिवाजी महाराज लवकर वसईवर हल्ला करणार आहेत म्हणून पोर्तुगीज आधीच भयभीत होते. त्यामुळे त्यांनी या पोरांचा सामनाच केला नाही.

अवघ्या ६०० जणांनी तेव्हा आक्खी वसई बेचिराख करून टाकली. त्यांनी किल्ला, चर्चेस आणि आसपासची खेडी जाळून टाकली. शेकडो पोर्तुगीज अधिकाऱ्यांना त्यांनी कैद केले, मोठी लूट केली. ही सर्व शिबंदी ही अरब पोरे आपल्यासोबत घेऊन गेली.

 लगेचच शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडून चौथाई वसूल करायला सुरुवात केली. मोठमोठे आयात कर लादले.  १६९० साली तर “काकाजी पुंड” नावाच्या माणसाने बंड करून थेट वसईचा किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. 

त्यानंतर राज्य करण्याचा पोर्तुगिजांचा उत्साहच गेला. त्यांच्यात आळस आणि अनास्था शिगेला पोचली. एक इंग्रज अधिकारी हॅमिल्टन याने याची नोंद केली आहे.

“येथील सुपीक भूभाग आळशी आणि नाकर्त्या लोकांच्या हाती पडला आहे. हे लोक फक्त आळस, चैन आणि ऐषोआरामात दिवस घालवतात. आपल्या प्रजेच्या दुर्दशेची त्यांना जाणीव नाही…”

असं त्यानं नोंदवले आहे.

१७२७ साली गोव्याच्या अधिकाऱ्याने इथल्या किल्ल्याची तपासणी केली. तेव्हा त्याच्या कागदपत्रात त्याने केलेल्या गमतीशीर नोंदी आहेत. किल्ल्याचे गोदाम पडले होते, नाक्यांची दुर्दशा झाली होती. पण किल्ल्यावरच्या लोकांना हे माहीतच नव्हते असा शेरा त्याने मारला आहे.

सोबतच “शिबंदीतील सैनिक पूर्ण अकुशल आहेत. त्यातल्या कित्येक लोकांनी आयुष्यात एकदाही कवायत केली नाही” अशी चिडचिड त्याने मांडली आहे.

म्हणूनच त्यांची सत्ता कधी गोवा दिव दमनच्या बाहेर  नाही. पुढे या सत्तेचा लवकरच ऱ्हास झाला.

हे हि वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.