अशी ही कहाणी.. एका जुलमी, जाचक सत्तेविरुद्ध मराठ्यांनी दिलेल्या लढ्याची..
पोर्तुगीज.
भारतात व्यापाराच्या दृष्टीने आलेल्या अनेक परकीय देशांपैकी एक. गोव्यासारख्या ठिकाणी राहून या पोर्तुगीजांनी जो काही धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय छळ केला, त्याच्या खाणाखुणा आजही आपल्याला पाहायला मिळतात.
पण या पोर्तुगीजांना भारतात जम बसवण्यापासून रोखणारे दुसरे तिसरे कुणीही नसून मराठे होते.
शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि थोरल्या शाहू महाराजांच्या काळात पोर्तुगीजांची एवढी भयंकर हानी झाली की त्यांना कधीच गोवा सोडून बाहेर पडता आले नाही. संभाजी महाराजांच्या भीतीने तर पोर्तुगीजांनी आपली राजधानीच एका छोट्या बंदरावर हलवली. का? तर संभाजी महाराजांनी समजा आपल्या वर आक्रमण केलेच, तर पटकन बंदरावर असलेल्या जहाजात बसून लगोलग पोर्तुगालला पळून जाता येईल, म्हणून..
आपल्या राजाची किती भयंकर दहशत असेल..
शिवाजी महाराज आणि पोर्तुगीजांच्या संघर्षाचा पहिला संबंध आला, खोलगड किल्ल्याच्या बांधकामावेळी..
गोव्याच्या साळ नदीच्या उगमावर, साष्टी प्रांताच्या सीमेवर शिवरायांनी खोलगड नामक किल्ल्याची उभारणी करण्याचे योजले. आपल्या दक्षिण दिशेस जर मराठ्यांचा किल्ला उभा राहिला, तर आपल्या अस्तित्वाला जबर धक्का बसणार याची पोर्तुगीजांना जाणीव झाली. या किल्ल्याचे बांधकाम तात्काळ थांबवावे म्हणून गोव्याच्या व्हाइसरॉय ने शिवाजी महाराजांना पत्रे लिहिली.
पण महाराजांनी याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. शेवटी व्हाइसरॉय ने आपल्या सर्व मंत्र्यांची-सेनानींची बैठक बोलावली. काहीही करून किल्ला पाडून टाकायचाच, असा ठराव मंजूर झाला. ठरावावर सह्या सुद्धा झाल्या. पण किल्ल्यावर एक दगड सुद्धा फेकून मारण्याची हिम्मत या पोर्तुगीजांमध्ये झाली नाही.
हा खोलगडचा किल्ला म्हणजेच गोव्याचे आजचे प्रसिद्ध ठिकाण ‘काबुदीरामा’.
आज जगभरातून पर्यटक हा काबूदीरामा समुद्रकिनारा पाहायला येतात, त्याच्या काठावर असलेल्या किल्ल्यात जाऊन फोटो काढतात. पण मराठ्यांनी पोर्तुगीजांना आपल्या टाचेखाली ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली, हे सांगायला विसरतात.
शिवाजी महाराजांची पोर्तुगीजांना भरपूर धास्ती होती. महाराजांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीजांनी लिहून ठेवलेल्या ओळीच याविषयी खूप काही सांगून जातात. व्हाईसरॉयने लिहिले आहे,
“आम्ही आता काळजीमुक्त झालो आहोत. कारण, युद्धाच्या काळापेक्षा शांततेच्या काळातच शिवाजीची आम्हाला भीती वाटत असे.”
संभाजी महाराजांना तर पोर्तुगीज भयंकर घाबरून असत. शिवरायांच्या दूतास कधीच पोर्तुगीजांनी स्वतंत्र राजाचा दूत असल्याप्रमाणे वागणूक दिली नाही. पण, संभाजी महाराजांच्या राजदूताचे स्वागत मात्र सार्वभौम राजाच्या दूताप्रमाणे होत असे. संभाजी महाराजांचा उल्लेख पोर्तुगीजांच्या कागदपत्रामधून ‘छत्रपती’ असाच झालेला आहे.
विशेष म्हणजे, शिवाजी महाराजांना या पोर्तुगीजांनी कधीही ‘राजा’ या शब्दाशिवाय दुसऱ्या शब्दाने संबोधले नव्हते. संभाजी महाराजांचा दूत गोव्याला येत असेल तर त्याच्या स्वागतासाठी एक भलीमोठी नाव पाठवली जाई. सारे शहर सजवले जात असे. त्याला राहण्यासाठी नवीन घर बांधण्यात येई. घरात उंची कापड तसेच फर्निचर ठेवले जाई. उच्च स्थानावर काम करणारे अधिकारीच संभाजी महाराजांच्या दूताचे स्वागत करण्यास जातील, याकडे व्हाईसरॉय कटाक्षाने लक्ष देत असे. फार मोठ्या इतमामात त्याचे स्वागत होई.
संभाजी महाराजांनी फक्त गोव्यावर कधी हल्ला करू नये, त्यांची कृपादृष्टी राहावी, यासाठी हा संपूर्ण अट्टाहास.. मराठ्यांच्या छत्रपतींची काय ती दहशत.. संभाजी महाराजांच्या पराक्रमाने एक सामान्य धर्मगुरू ‘सेंट फ्रान्सिस झेविअर’ पॅट्रन म्हणजेच रक्षणकर्ता झाला.. आजही त्याचे शव आपल्याला झेविअर चर्च मध्ये पाहायला मिळते. आज तेसुद्धा गोव्याचे प्रसिद्ध ठिकाण आहे, त्यासाठी कारणीभूत ठरले संभाजी महाराज.
राजाराम महाराजांच्या काळात, ताराराणींच्या काळात पोर्तुगीजांनी तठस्त भूमिका स्वीकारली होती. पण शाहू महाराजांच्या काळात पोर्तुगीजांनी उघड उघड विरोध करण्यास सुरुवात केली. अवघ्या काही काळातच मराठ्यांनी पोर्तुगीजांना एवढे जेरीस आणले, की शाहू महाराजांकडे दया मागण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय उरला नाही.
मराठ्यांचा पराक्रम एवढा मोठा होता की पोर्तुगीजांच्या राजापर्यंत ही बातमी गेली. राजाने व्हाईसरॉयला कान्होजी आंग्रे सोबत तह करण्यास सांगितले पण व्हाईसरॉयने राजाच्या निर्णयाला विरोध केला. आंग्रे म्हणजे नेमकं काय रसायन आहे , हे सांगण्यासाठी व्हाईसरॉयने पोर्तुगालच्या राजाला भलं मोठं पत्र लिहिलं, त्या पत्राचे शेवटचे वाक्य होते,
“आंग्रे हा आमचा सर्वात मोठा शत्रू आहे. तो धनवान, बलाढ्य आणि समृद्ध आहे. त्याने आत्तापर्यंत एवढ्या प्रबळ सावजांची शिकार केली आहे कि मलाच आता त्याची भीती वाटते..”
या पोर्तुगीजांना आपल्या युद्धनौकांवर भयंकर घमंड होता. समुद्रातून कोणत्याही जहाजाला प्रवास करायचा असेल तर पोर्तुगीजांचे ‘कार्ताज’ लागत असे. कार्ताज म्हणजे परवाना. मुंबई पासून कर्नाटकच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत कोणत्याही जहाजाला परवानगी दस्तक नसेल तर पोर्तुगीज प्रवास करू देत नसत. शिवरायांनी ही भयंकर पद्धत सरळ सरळ धुडकवली.
कोणत्याही दस्तकाशिवाय आमच्या समुद्रावर आम्ही फिरू शकतो, त्यासाठी तुम्हाला उद्धवस्त सुद्धा करू शकतो हे स्पष्ट संदेशच त्यांनी दिला. पुढे कान्होजी आंग्रेंच्या काळात मात्र उलट परिस्थिती झाली. मराठ्यांनी परवानगी दिली तर आणि तरच कोकणच्या समुद्रातून कुणी जहाज घेऊन जाऊ शकत असे. मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने समुद्रावर सुद्धा मालकी हक्क प्रस्थापित केला होता.
अशी ही कहाणी.. एका जुलमी, जाचक सत्तेविरुद्ध मराठ्यांनी दिलेल्या लढ्याची.. थोडक्यात पण अतिशय महत्त्वाची. पराक्रमाची आणि अभिमानाची
- केतन पुरी
हे ही वाच भिडू
- पोर्तुगीजांनी लिहून ठेवलय, संभाजी राजांनी जसा आमचा पराभव केला तसा द. आशियात कोणी केला नाही
- संभाजी महाराजांना घाबरून पोर्तुगीजांनी चक्क थडग्यात ठेवलेले प्रेत पुन्हा बाहेर काढले होते
- छ. संभाजी महाराजांनी औरंगजेबाची घमेंड जिरवली. त्याचा आर्थिक कणा खिळखिळा करून टाकला..