पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांची तुलना जगजेत्या सिकंदराशी केली होती

भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले आणि इथं राज्य करायला सुरुवात केली यामध्ये पोर्तुगीज पहिले. पंधराव्या शतकात त्यांनी भारतात जम बसवला.

गोवा तर त्यांची राजधानी बनली होती सोबतच दिव दमन मुंबई वसई कल्याण येथील बंदरावर व तिथल्या किल्ल्यांवर त्यांचंच राज्य होतं.

शिवपूर्वकाळात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज राज्य करत होते.

भारतातली सर्वात सामर्थ्यशाली सत्ता होती मुघलांची. मुघल बादशहा दिल्लीतून देशाचा कारभार चालवायचा पण पश्चिम किनारपट्टीवर त्याचे काही एक चालत नसे.

इतकेच काय त्याकाळी खुद्द मुघल बादशहाला हज यात्रेला जायचं असेल तर पोर्तुगीजांच्या जहाजांचा वापर करावा लागायचा.

भारतातल्या प्रत्येक मुसलमानाला हज यात्रेसाठी पोर्तुगीज अधिकाऱ्यांचा परवाना घ्यावा लागायचा.

मुघलांकडे स्वतःच आरमार नसल्याचा हा परिणाम होता. पोर्तुगीजांचे वर्चस्व मोडावे म्हणून मुघलांनी जंजिऱ्याच्या सिद्दीला पैसा पुरवून बळ देण्यास सुरवात केली. त्यांच्याशी तह केले. त्याला आरमारप्रमुख म्हणून मान्यता दिली.

याच काळात शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली होती. त्यांनी थोड्याच काळात बारा मावळातील मराठी तरुणांना एकत्र करून महाराष्ट्रातील किल्ले जिंकले. निजामशाही, आदिलशाही, मुघल या मोठ्या सत्ताधार्यांना हादरवून सोडलं.

छत्रपतींच्या राज्याची सीमा पश्चिमेला समुद्र किनाऱ्याला जाऊन भिडली. यामुळे पोर्तुगीज आणि सिद्दी या दोन्ही आरमारासाठी ही धोक्याची घंटा निर्माण झाली.

विशेषतः मुघलांच्या आश्रयाखाली असलेल्या सिद्दीला शिवरायांच्या राज्यविस्ताराची भीती वाटत होती. त्यामानाने पोर्तुगीजांनी मराठ्यांशी सामोपचाराचे वागत होते.

पोर्तुगीज हे धूर्त राज्यकर्ते होते. आपले राज्य सुरक्षित राहावे म्हणून एतद्देशीय राजांशी सलोख्याच धोरण स्वीकारलं होतं. मुघल आदिलशहा मराठे एवढंच काय सिद्दीशी देखील त्यांचे चांगले संबंध होते.

शिवाजी महाराजांना पोर्तुगीजांचा स्वभाव ठाऊक होता.

एक हातात तागडी व एका हातात बंदूक घेऊन आलेले हे परकीय व्यापारी विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत. संधी मिळताच ते आपल्या देशात पाय रोवून बसतील याचा त्यांना अंदाज होता.

पण पोर्तुगीजांशी त्यांच्याच पद्धतीने गोड बोलून चुचकारून आपले कार्य साधण्याचा सल्ला त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिला होता.

म्हणूनच जेव्हा सुरत लूट केली किंवा स्वराज्याचे पहिले आरमार उभारले तेव्हा पोर्तुगीजांनी मराठ्यांना मदत केली होती.

जेव्हा मुघल सरदार दिलेरखान आणि राजा जयसिंग यांनी मराठ्यांना तह करायला भाग पाडले, शिवराय औरंगजेबाच्या मगरमिठीत आग्र्याला अडकले तेव्हा सगळ्या भारताला वाटले की मराठ्यांचं राज्य संपलं.

शिवाजी महाराज आग्र्याहून जिवंत परत येतील याची कोणालाही खात्री नव्हती.

पण महाराजांनी चातुर्याने बलशाली मुघल बादशहाच्या कडक बंदोबस्तातूनही सहज सुटका करवून घेतली. आग्र्याहून शिवाजी महाराज सहीसलामत सुटले आणि रायगडावर येऊन देखील पोहचले.

सगळ्या महाराष्ट्रात दुसरी दिवाळी साजरी झाली.

शिवरायांना पकडण्यासाठी मागे पाठवलेले सरदार मोकळ्या हाताने परत आल्यावर औरंगजेब बादशाह हताश झाला. दक्षिणेत आता फक्त मराठेशाहीच वर्चस्व राहणार हे त्याच्या लक्षात आलं होतं.

परत येताच शिवरायांनी आपले गमावलेले किल्ले परत घेण्याचा धडाका लावला. त्यांचा पराक्रम, बुद्धीचातुर्य, रणनीती कौशल्य यामुळे पोर्तुगिजांचा व्हाइसरॉय प्रचंड प्रभावित झाला. 1666 साली आपल्या पोर्तुगाल मधल्या राजाला पाठवलेल्या पत्रात तो म्हणतो,

“जर मुत्सद्देगिरी व युद्धकौशल्य याबाबतीत तुलनाच करावयाची असेल तर फक्त अलेक्झांडर द ग्रेट किंवा ज्युलियस सीझर यांचीच तुलना शिवाजीसोबत होऊ शकते.”

पोर्तुगीज इतिहासकार कॉस्मे दे गार्डा याने या प्रसंगा बद्दल लिहून ठेवले आहे. खरं तर सिकंदर आणि सीझर हे जन्मतःच मोठ्या राज्याचे सत्ताधीश होते.

शिवरायांच्या एवढी संकटे आणि मोठ्या शत्रूशी सामना करून स्वतःच राज्य शून्यातून उभा करायची वेळ त्यांच्यावर आली असती तर त्यांना देखील हे शक्य झालं असत का हे सांगता येत नाही. म्हणूनच शिवाजी महाराज इतर राज्यकर्त्यांपेक्षा अद्वितीय ठरतात.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Shailesh Kshirsagar says

    Very true, this letter can be seen in the book – Marathyanchya Itihasachi Sadhane Portuguese Daftar, Khand -3 (1663-1739)

Leave A Reply

Your email address will not be published.