कोल्हापुरात समुद्र नसेल पण २००० वर्षांपूर्वीची सागर देवता आहे, ती पण युरोपातून आलेली.

मुंबईचा डॉन सुलतान मिर्झा आणि कोल्हापूरचा पैलवान मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर तौक्ते वादळ येण्याची वाट बघत बसलेले असतात. सुलतान मिर्झा म्हणतो, देखो हमारे पास ये समुंदर है, क्या है तुम्हारे पास? कोल्हापूरचा पैलवान सुलतानच्या डोक्यात एक टपली मारून म्हणतो..

रांडच्या तुझ्या समुंदराचा बा हाय नव्ह कोल्हापुरात..

कोण रं ह्यो बा… आपला पप्पा पोसायड्न

पोसायड्न हा प्राचीन ग्रीक समुद्रदेवता आहे. तसेच तो अश्व आणि भूकंपाचा देव म्हणूनही ओळखला जातो. त्याला पोसिडॉन असही म्हंटल जात. त्याच्या नावाचा अर्थ पृथ्वीचा पती किंवा पृथ्वीचा स्वामी.

पोसायडनचा उल्लेख इलियड आणि ओडिसी ह्या दोन ग्रीक महाकाव्यात आहे. झ्यूस आणि हेडीस हे त्याचे भाऊ; तर क्रोनस व रीया हे त्याचे आईवडील होते. क्रोनसला नष्ट केल्यावर झ्यूस, पोसायडन आणि हेडीस ह्या तिघांनी पृथ्वी, स्वर्ग, समुद्र आणि पाताळ असे आपापसांत विभागून घेतले. समुद्र पोसायडन कडे आला. त्याच्या हातात त्रिशूळ असून त्याच्या साहाय्याने तो समुद्रात त्सुनामी, मोठ्या लाटा, भोवरे निर्माण करतो. तो अतिशय क्रुद्ध स्वभावाचा आहे, अस मानले जात.

आता आलेलं तौक्ते वादळ पोसायड्नन त्रिशूळ पाण्यात हलवून तर तयार केलं नसल ना? मरू द्या आपल्याला काय… आपण कोल्हापूरवर फोकस करूया.

तर ही पोसायड्न नावाची समुद्र देवता आपल्या कोल्हापुरात हाय…. व्हय की व्हय..

कोल्हापूर जिल्ह्यातल्या ब्रम्हपुरी टेकडीवर १९४५-४६ साली पुण्याच्या डेक्कन कॉलेजन केलेल्या उत्खननात पंचधातूंची पोसायडनची एक मूर्ती सापडली होती. आज ही मूर्ती कोल्हापूरच्या टाऊनहॉल म्युझियम मध्ये बघायला मिळते. समुद्रदेवतेची ही शिल्पाकृती म्हणजे ग्रीक रोमन कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या सागरदेवतेची मूर्ती ब्राँझची असून (१४.३ सेंमी. उंच) मूळ अलेक्झांड्रिया येथील असल्याचे ज्ञात झाले. ती मूर्ती इ. स. पहिल्या शतकातील असावी.

कोल्हापुरात असणाऱ्या पोसायडन आणि ब्रिटनच्या ब्रिटिश म्युझियम मध्ये असलेली नेपच्यूनची मूर्ती यात बरच साम्य आढळत. त्यामुळं पोसायडनच्या या मूर्तीच मूळ कुठं असावं याविषयी सदाशिव गोरक्षकर (प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचे तत्कालीन संचालक) यांनी एक तर्क मांडला होता.

त्यांनी त्यांच्या पुस्तकात मत मांडताना म्हंटल की,

‘पोसायडनच्या या मूर्तीच मूळ स्फूर्तिस्थान अलेक्झांडरच्या काळातील आहे. लायसीपसने निर्माण केलेली सुप्रसिद्ध मूर्ती हीच आहे. अलेक्झांडरच्या नावाच्या उलट बाजूवरही पोसायडनचे चित्र आहे.’

मूळ मूर्तीच्या हातात त्रिशूळ आहे. पण सध्या कोल्हापूरातल्या टाऊनहॉल मध्ये असलेल्या या मूर्तीच्या हातातले त्रिशूळ गायब आहे.

मूर्तीच्या आकारावरून व आविर्भावावरून ती टेलिनीस्टिक काळातील म्हणजेच मूर्ती इतकी जोमदार व पैलवानी वाटत नाही. म्हणूनच ती जरा अलीकडच्या काळातली वाटते. अलेक्झांडरचा मृतदेह पहिल्या टॉलेमीने अलेक्झांड्रियाला एका सोन्याच्या शवपेटीत ठेवला होता.

इसवी सणाच्या पहिल्या दुसऱ्या शतकात या ग्रीक वसाहती शेजारीच सोकोग्रा बेटावर (सुखरदीप) बरेच भारतीय राहत असत. त्यांच्यापैकी एखादा व्यापारी, बोटीवर काम करणारा कोल्हापूरचा किंवा महाराष्ट्राचा असावा. त्यानेच ग्रीक पुराणातली ही देवतेची मूर्ती कोल्हापूरला आणली असावी. असा एक तर्क आहे.

पोसायडनची ही मूर्ती कोल्हापूरात कशी आली असावी याविषयी अजूनही अनेक तर्क काढले जातात. यातलाच अजून एक तर्क म्हणजे ग्रीक पुराण कथेत पोसायडन ही समुद्र देवता आहे. ती अक्राळविक्राळ व विध्वंसक असून समुद्रात वादळ आणून समुद्र खवळू शकते असा लोकांचा समज असल्याने त्यांच्यात पोसायडन विषयी भीती होती. त्यामुळेच त्याच्या मूर्तीची पूजा केली जात असे.

ज्यावेळी भारत आणि रोम यांच्यात व्यापारी संबंध प्रस्थापित झाले. त्याकाळात व्यापार मुख्यत्वेकरून समुद्रमार्गे चालत असे. अनेक दिवसांचा समुद्र प्रवास करताना पोसायडन समुद्र खवळू शकतो या भीतीपोटी लोक त्याची मूर्ती जवळ बाळगत असावेत. जेणेकरून मूर्तीची पूजा केल्यावर पोसायडन त्यांच्यावर प्रकोपणार नाही. अशाच समुद्रमार्गे व्यापाराला निघालेल्या एखाद्याने ही मूर्ती कोल्हापूरात आणली असावी.

अशा प्रकारे समुद्र मुंबईला हाय. पण समुद्राची देवता म्हणजेच पप्पा पोसायडन आपल्या कोल्हापुरात हायत. आणि कसाय ना पप्पाला डावलून चालत नसतंय. पूजा करायला यायला लागतंय..

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.