जेफ बेजोस, एलन मस्कच्या कंपन्या सोडा आता भारतातून सुद्धा स्पेसमध्ये जाता येणार आहे

२० जुलै २०२१ रोजी जेफ बेजोस स्वतःच्या ३ सहकाऱ्यांबरोबर ब्लु ओरिजिन स्पेसफ्लाईट मध्ये बसून अंतराळात गेला होता. समुद्रसपाटीपासून तब्बल १०० किमी अंतरावर असलेल्या कारमन लाईनवर १० मिनिटं घालवल्यानंतर ही स्पेसफ्लाईट परत पृथ्वीवर लँड झाली.

ही बातमी जगभरात वाऱ्यासारखी पसरली आणि श्रीमंतांच्या मनात अंतराळात जाण्याचे लाडू फुटायला लागले. कारण ब्लु ओरिजिनच्या स्पेसफ्लाईटने फक्त अंतराळवीरच नाही तर सामान्य माणूस देखील अंतराळात जाऊ शकतो हे दाखवून दिलं. तब्बल १० कोटी रुपये तिकीट असलेल्या स्पेसराईडसाठी जगभरातील श्रीमंतांच्या डोक्यात खिसा खाली करण्याचं स्वप्न पडायला लागलं.

पण आता त्यापेक्षा कमी पैशात स्पेसमध्ये जाता येणार आणि ते देखील भारतातून.

भारतातूनच कमी खर्चात स्पेसमध्ये जाणे शक्य होणार आहे. त्यासाठी भारतातील टाटा इन्स्टिट्यूट फॉर फंडामेंटल रिसर्च हैद्राबाद आणि स्पेनची एरोस्पेस कंपनी हालो दोघांच्या माध्यमातून स्पेसमध्ये जाण्यासाठी एक बलून बनवलं जात आहे, ज्यात बसून स्पेसमध्ये जाणे शक्य होणार आहे.

या बलूनची पहिली टेस्ट मागील आठवड्यातच हैद्राबादमध्ये यशस्वी झालीय. 

७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास हैद्राबाजवळ एक मोठं यान उडत असल्याचं लोकांना दिसलं. यांच्याकडे बघून अनेक जणांचं डोकं गांगरलं. साउथच्या फिल्म्सचे डायरेक्टर जगरलामुदी कृष्ण यांनी त्याचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पृथ्वीवर यूएफओ येत असल्याची चर्चा करू लागले होते.

थोड्याच वेळात हैद्राबादच्या जवळ असलेल्या मोंगलीगुडी गावातल्या शेतात हे यान कोसळलं आणि लोकांनी बघायला गर्दी केली. तेव्हा टीआयआरएफचे शास्त्रज्ञ तिथे पोहोचले आणि हे काही यूएफओ  नसल्याचं स्पष्ट केलं. 

कारण ते यूएफओ वैगरे काही नव्हतं तर तो हेलियमचा एक्सपेरिमेंटल बलून होता. हा बलून हैद्राबादच्या टीआयआरएफने आकाशात सोडला होता. ब्लु ओरिजिन, स्पेस एक्स या कंपन्यांप्रमाणेच स्पेनची हा लो कंपनी देखील लोकांना स्वस्तात अंतराळात नेण्यासाठी हा प्रयोग करत आहे. त्याच प्रयोगाचा भाग म्हणून हा बलून सोडण्यात आला होता.

याच बलूनमधून आता अंतराळात जाता येणार आहे.

जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट हे ८.८४ किलोमीटर उंच आहे, माउंट एव्हरेस्टपेक्षा उंचावर म्हणजेच साधारणपणे १०-१२ किलोमीटर उंचीवर विमानं उडतात, पण त्याच्यावर उडायचं असल्यास फक्त रॉकेट आणि स्पेसफ्लाईट वापरले जातात. मात्र आता या दोन पर्यायांसोबत आणखी एक तिसरा पर्याय आहे तो म्हणजे हेलियम बलूनचा.

याच पर्यायाचा वापर करून हालो आणि टीआयआरएफ स्पेसमध्ये जाण्यावर प्रयोग करत आहे. 

यात ६२० किलो वजनाच्या फुग्यामध्ये २.८ लाख घन मीटर हेलियम वायू भरली जाते आणि त्यानंतर ८०० किलो वजनाचा हा बलून अवकाशात सोडला जातो. हा बलून पृथ्वीपासून तब्बल ४० किमी अंतरावर जाऊ शकतो, जेथून पृथ्वीचं गोल रिंगण पाहिलं जाऊ शकतं.

७ डिसेंबर रोजी करण्यात आलेला प्रयोग यशस्वी झाला आहे, त्यामुळे ३० एप्रिल २०२३ पर्यंत अणुऊर्जा विभाग आणि इस्रोच्या देखरेखीखाली टीआयआरएफ कडून आणखी ९ प्रयोग केले जाणार आहेत. त्यानंतर स्पेनमध्ये देखील असे प्रयोग केले जातील. सगळे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर २०२५ पासून लोकांचा अंतराळात जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

या बलूनच्या माध्यमातून वेगवगेळ्या आकाराचे कॅप्सूल आणि स्पेसक्राफ्ट बनवले जाणार आहेत.

या कॅप्सूलमध्ये एकावेळी ८ जण प्रवास करू शकणार आहेत. हे कॅप्सूल पृथ्वीवरून टेक ऑफ केल्यानंतर ६ तासामध्ये ४० किलोमीटर उंचावर जाईल आणि त्यानंतर पॅराशूटच्या माध्यमातून पृथ्वीवर लँड होईल. हालो कंपनीने दिलेल्या माहितीनुसार २०२९ पर्यंत दरवर्षी ४०० सहलींमध्ये ३,००० जण अंतराळात प्रवास करतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या कॅप्सूलमधून स्पेसटूर करण्यासाठी एका व्यक्तीचं तिकीट साधारणपणे ८० लाख ते १ कोटी ६० लाख रुपयांपर्यंत असेल. 

स्पेसफ्लाईटची सुविधा देणाऱ्या स्पेस एक्सच्या एका तिकीटाची किंमत ४५० कोटी रुपये आहे, ब्लु ओरिजिनच्या एका तिकीटाची किंमत १० कोटी रुपये आहे तर रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या व्हर्जिन गॅलेटिक्सच्या एका तिकीटाची किंमत ३ कोटी ६७ लाख इतकी आहे. मात्र होलो कंपनीच्या तिकीटाची किंमत इतर कंपन्यांच्या तुलनेत फार स्वस्त असणार आहे. त्यामुळे भारतात स्पेसट्यूरिजम वाढेल असं सांगितलं जातंय.

जगात मोजक्याच देशांमध्ये हेलियम बलून्स आणि स्पेसक्राफ्ट बनवण्याचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे या स्पेसट्यूरिजममधून भारताला उत्पन्न तर मिळेलच सोबतच भारताची मान देखील जगभरात उंचावेल हे नक्की.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.