गोंडस बाळ असताना देखील माता पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये का जातात ?

आपण एक बातमी ऐकली असेल कि, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची नात  सौंदर्या हिने शुक्रवारी आत्महत्या केली. सौंदर्याचे पती डॉ. नीरज सकाळी आपल्या कामावर गेले होते, पण तितक्यात घरातल्या नोकराने माहिती दिली कि, सौंदर्याने स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतले आहे. पण तोपर्यंत त्यांनी गळफास लावून घेतला होता आणि त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला…

सौंदर्याने आपल्या सहा महिन्यांच्या बाळाला दुसऱ्या खोलीत ठेवले होते आणि बाजूच्या खोलीत जाऊन हे टोकाचे पॉल उचलले. त्यानंतर कुटुंबीय दुःखात बुडाले, पण कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी या आत्महत्येबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली की, सौंदर्या डिलिव्हरी नंतर डिप्रेशन मध्ये गेली होती. आणि याची कल्पना कुटुंबाला होती…पण आत्महत्येचं पाऊल उचलेल हे कुणालाही वाटलं नव्हतं….

बरं बातमी इथेच संपत नाही ….. हि बातमी सोडून त्या मागचं गांभीर्य खोल आहे…. ते म्हणजे मातृत्व लाभलेल्या सौंदर्याने लहानसं ६ महिन्याचं गोंडस बाळ असतांना देखील आत्महत्येचं पाऊल का उचलावं ? तिला डिप्रेशन येण्याएवढी अशी कोणती परिस्थिती तिच्यावर ओढवली असेल ?

एकदा काय घरातल्या बाईची डिलिव्हरी झाली कि, बाळाच्या रडण्याचा आवाज घरात घुमू लागतो, घरात नवीन पाहुणा आला म्हणून सगळे आनंदी असतात. तेंव्हा सर्वांचे लक्ष फक्त नवीन आलेल्या बाळाकडेच असते….बाळाच्या आरोग्याकडे सर्वांचं लक्ष लागून असते पण त्या बाळाची आई कोणत्या प्रकारच्या समस्यांमधून जातेय याकडे ना तिचं स्वतःचं लक्ष असते ना घरच्यांचं….

आणि जेंव्हा अशी परिस्थिती टोकाला जाते त्याला म्हणतात पोस्टपार्टम डिप्रेशन !

म्हणजेच डिलिव्हरी नंतर येणारं डिप्रेशन. अगोदर यावर इतर देशात चर्चा होत असे. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) नुसार, प्रत्येकी ४ पैकी १ महिला प्रसूतीनंतरच्या तणावाची, नैराश्याची बळी ठरते आणि याला प्रसुतिपश्चात उदासीनता म्हणतात…थोडक्यात एक प्रकारचं डिप्रेशन. आता हळूहळू का होईना भारतात देखील याबद्दल बोललं जातंय. 

अशा परिस्थितीत गर्भधारणेनंतरचे नैराश्य म्हणजे काय ? त्याची कारणे आणि लक्षणे जाणून घेऊया-

सामान्यतः हे नैराश्य प्रसूतीच्या पहिल्या ३ आठवड्यांत दिसू लागते आणि काही प्रकरणांमध्ये ते मुलाच्या जन्मानंतर एक वर्षापर्यंत तरी टिकते असा अभ्यास सांगतो. जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा आईला शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो, ज्यामुळे ही समस्या उद्भवते. पण सर्वात महत्वाचं म्हणजे याचा अर्थ असा होत नाही, की आई आपल्या बळावर प्रेम करत नाही. ही एक मानसिक स्थिती आहे आणि प्रसूतीनंतरचे नैराश्य डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि औषधांनी बरे होऊ शकते. वुमेन हेल्थ ऑफिसने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, प्रत्येक ९ मातांपैकी १ माता या  प्रसूतीनंतरच्या नैराश्याने ग्रस्त आहेत..

या डिप्रेशनची लक्षणे काय असतात ??

सोपंय व्यक्तीनुरूप त्या त्या स्त्रियांमध्ये त्याची लक्षणे वेगवेगळी असू शकतात, परंतु काही सामान्य चिन्हे आणि लक्षणे जी या आजाराने ग्रस्त असलेल्या बहुतेक स्त्रियांमध्ये दिसतात ती अशी कि,

सारखं-सारखं उदास वाटणे, सतत चिडचिड आणि चिंताग्रस्त वाटणे, खूप थकवा येणे आणि सुस्त वाटणे,  अपराधीपणाची भावना येणे, कोणत्याही कामासाठी आपण योग्यच नाही असा समज बाळगणे,  सततच्या ताणतणावामुळे जागरण होणे त्यामुळे डोकेदुखी किंवा पोटदुखीची समस्या उद्भवणे, भूक न लागणे, खाण्याची इच्छा नसणे,  कोणत्याही प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये इंटरेस्ट येत नाही, आपल्या बाळाशी काही अटॅचमेंट होत नाही, त्या तणावात पुन्हा पुन्हा रडण्याची भावना येणे आणि बराच वेळ विनाकारण रडत राहणे तसेच, कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांपासून स्वतःला वेगळे करणे, एकटं-एकटं राहणे, हार्मोनल असंतुलन, इत्यादी हे झाले लक्षणे..

पण हे का होतं ??? त्याची करणे काय ?

पहिले तर शारीरिक बदल हे मुख्य कारण आहे असू शकते. ज्याप्रमाणे गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात खूप बदल होतात, त्याचप्रमाणे बाळाच्या जन्मानंतरही स्त्रीच्या शरीरात खूप हार्मोनल बदल होत असतात. बाळंतपणानंतर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे हे तणाव उद्भवतात. थायरॉईड ग्रंथीतून सोडल्या जाणार्‍या संप्रेरकांच्या पातळीत घट झाल्यामुळे तणाव, थकवा आणि सुस्तीची भावना देखील उद्भवते. प्रसूतीनंतर स्ट्रेच मार्क्स, केस गळणे, वजन वाढणे आदींमुळेही स्त्रीचा ताण वाढतो…दुसरं म्हणजे, भावनिक समस्या….नुकत्याच जन्मलेल्या संबंध जोडण्यात अडचण, त्याच्या/तिच्या गरजा समजून घेणे, पालकत्व आणि स्वतःमधील शारीरिक बदलांमुळे शरीर आणि जीवनावरील नियंत्रण कमी वाटणे यामुळे देखील नैराश्यात भर पडते. परिणामी आत्मविश्वास कमी होतो. 

– याशिवाय सामाजिक कारणांमुळेही महिलांवर ताण येऊ शकतो. उदाहरणार्थ, जर मुलगा आणि मुलगी जन्माची इच्छा असेल तर यामुळे देखील तणाव होऊ शकतो.

– प्रसूतीनंतर घराच्या बाकीच्या जबाबदाऱ्यांसोबतच मुलाची जबाबदारीही येते. अशा परिस्थितीत, आपण मुलाची जबाबदारी योग्यरित्या पार पाडू शकू की नाही याची चिंता आणि तणाव देखील स्त्रीला असू शकतो. याशिवाय अनेक महिलांना शारीरिकदृष्ट्या अशक्तपणामुळे किंवा गर्भधारणेपूर्वीचे शरीर सारखे नसल्यामुळेही तणाव जाणवतो.

– नवजात बालकांच्या गरजा पूर्ण केल्यामुळे अनेक वेळा आई रात्रभर झोपू शकत नाही, झोप न लागणे आणि थकवा येणे यामुळे प्रसूतीनंतरचे नैराश्यही येऊ शकते.

– मुलाला सांभाळताना कुटुंबीय किंवा मित्रमंडळींची साथ नसेल आणि सर्व काही एकट्यानेच करावे लागत असेल, तर हे देखील तणावाचे कारण असू शकते.

यावर उपचार काय ?

जर समस्या फार गंभीर नसेल आणि लक्षणे सामान्य आणि लवकर दिसत असतील तर काही वेळा औषधाचीही गरज नसते. समुपदेशन आणि कुटुंबीयांच्या मदतीनेच या समस्येवर मात करता येते. परंतु जर रोग वाढला तर मानसोपचार तज्ज्ञांशी संपर्क साधावा लागेल. यादरम्यान रुग्णाला औषधोपचार, औषधे दिली जातात आणि समुपदेशनही केले जाते.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.