एकदा तर शिवसेनेच्या आमदाराने विधानभवनातच पिस्तुल बाहेर काढलं होतं…

आमदार सदा सरवणकर गोळीबार प्रकरण पुन्हा चर्चेत आलं. मुंबईच्या प्रभादेवीमध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिंदे गट विरुद्ध शिवसैनिक यांच्यात राडा झाला होता. या राड्यात आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर दादर पोलिसांनी आर्म्स एक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवत, त्यांचं रिव्हॉल्व्हर देखील जप्त करण्यात आलं होतं. पण त्यांना क्लिन चीट  देण्यात आल्याने बरंच राजकारण घडलं.  

त्याबाबत अपडेट म्हणजे आता सदा सरवणकर यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. शस्त्रास्त्र कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीने शस्त्राचा वापर बेकायदेशीर पद्धतीने केला, अथवा इतरांची बंदूक वापरली आणि त्याने कोणाला दुखापत झाली, तर शस्त्रास्त्र कायद्या अन्वये गुन्हा दाखल होतो.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेला राडा, गोळीबार, क्लीन चिट आणि पुन्हा एकदा दाखल झालेला गुन्हा यामुळे सदा सरवणकर चर्चेत आलेत.  

सरवणकर यांनी भर गर्दीत परवाना धारक पिस्तुलाने गोळीबार करण्यावर राजकारण तापलं होतं आणि आजही तीच चर्चा सुरु आहे तरीही सरवणकरांचं तर काहीच नाही या आधी सेनेच्या आमदाराने विधानभवनातच पिस्तुल बाहेर काढलं होतं…त्याचाच हा किस्सा…

हा किस्सा १९९० सालचा आहे.  

महाराष्ट्राच्या विधीमंडळात पावसाळी अधिवेशन सुरु होतं. वेगवेगळ्या कायद्यावर त्याच्या छोट्या मोठ्या मुद्द्यांवर साधक बाधक चर्चा चालल्या होत्या. नेहमी प्रमाणे सत्ताधारी आमदार आणि विरोधक यांच्यात चर्चेच रुपांतर घमासान युद्धात व्हायचं.

अशातच एक दिवस विधानपरिषदेमध्ये कसल्या तरी विषयावर चर्चा सुरु होती. शिवसेनेचे जेष्ठ आमदार प्रमोद नवलकर चर्चेसाठी उभे होते. मुंबईमध्ये सुरु असणारे गँगवॉर आणि मुंबईची सुरक्षितता यावर ते बोलत होते. बोलता बोलता सहजचं त्यांनी आपली बॅग हातात घेतली आणि त्यातून एक पिस्तुल काढली आणि सभागृहाच्या छताच्या दिशेने दाखवत भाषण सुरूच ठेवलं.

आधी तर कोणालाही काही कळाले नाही. सभागृहात एकचं हलकल्लोळ माजला. पिस्तुल भरलेले आहे की रिकामे आहे कळायला मार्ग नव्हता. नवलकरांनी पिस्तुल कोणावरही रोखले नव्हते तरी त्यांनी ते कोणावर हल्ला करण्यासाठी आणलं आहे अशीही समजूत काही आमदारांची झाली. भीतीने पूर्ण सभागृहाची गाळण उडाली होती. समोरच बसलेले भाषण लिहून घेणारे विधानभवनाचे कर्मचारी घाबरून थरथर कापत होते.

तेव्हा विधानपरिषदेचे सभापती होते जयंतराव टिळक. त्यांनी अतिशय संयमीपणे ही परिस्थिती हाताळली. त्यांनी शांतपणे नवलकरांना त्यांच भाषण थांबवण्यास सांगितलं आणि आपल्या शिपायाला त्यांच बंदुक काढून घेण्याचा आदेश दिला.

आधी तर ते शिपाई देखील नवलकरांच्या जवळ जाण्यास घाबरत होते. मात्र अखेर त्यातल्या एकाने धाडस केले आणि ते पिस्तुल हिसकावून घेतले.

नवलकरांनी देखील काही मोठा विरोध केला नाही. सभागृह तहकूब करून जयंतरावांनी त्यांना आपल्या केबिन मध्ये बोलावून घेतले. तिथे त्यांची सखोल चौकशी केली. तर समोर आली ती गोष्ट अशी.

झालं असं होतं की यापूर्वीच्या अधिवेशन काळात चहापानाच्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री शरद पवार यांच्याशी प्रमोद नवलकरांची गाठभेट झाली होती. त्यावेळी चर्चा करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना मुंबईत सुरु असलेले अंडरवर्ल्डचे गँगवॉर आणि त्या अनुषंगाने विधानभवनाच्या सुरक्षिततेची काळजी व्यक्त केली होती. पण नवलकर यांना वाटले की त्यांनी हे म्हणण सिरीयसली घेतल नाही. मग एकदा भाषण करताना त्यांनी घोषणा केली ,

“जर विधानभवनाची सुरक्षा वाढवली नाही तर एकदिवस मी पिस्तुल आणि बॉम्ब घेऊन सभागृहात येईन. दम असेल तर मला रोखून दाखवा.”

प्रमोद नवलकरांकडे त्या पिस्तुलाचे लायसन्स होते. शिवाय त्या पिस्तुल मध्ये गोळ्या नव्हत्या. त्यांनी ती बंदुक फक्त सिक्युरिटीमधील गलथानपणा दाखवण्यासाठी आणली होती हे स्पष्ट करण्यात झाले होते. पण त्यांनी ती बंदुक आणली कशी याबद्दल मात्र अनेकांनी शंका व्यक्त केली.

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर एखाद्या किल्ल्याप्रमाणे विधानभवन उभे आहे. त्याकाळातही मेटल डिटेक्टर विधानभवनाच्या दारात बसवण्यात आले होते. ठिकठिकाणी शेकडो सुरक्षा अधिकारी उभे असायचे. तरी या सगळ्या अडथळ्यांना पार करून नवलकरांची बंदुक आत पोहचलीच कशी हे कोड कायम होतं.

सगळ्या सत्ताधारी आमदारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली की हे बंदूक त्यांच्या ड्रायव्हरने आणून दिले. पण नवलकरांनी याला नकार दिला. त्यांनी स्वतःच आपल्या भाषणात पिस्तुल आणण्याचे मार्ग आणि त्याच्या शक्यता बोलून दाखवल्या. 

ज्या राज्यात खुद्द विधानभवन आणि आमदार सुरक्षित नाहीत तिथे सामान्य नागरिक सुरक्षित कसा राहिलं हा प्रश्न उपस्थित करत सुरक्षा यंत्रणेचा धज्जा उडवला. एवढं सगळं झालं पण त्यांनी नेमकी बंदुक कशी आणली हे गूढच ठेवले. कारण यानिमित्ताने पोलिसांना आपली यंत्रणा कुठे कुठे चुकू शकते हे शोधायची संधी मिळाली.

नवलकरांना वाटले की हा विषय संपला.

दुसऱ्या दिवशी पहाटे ते काही तरी कामानिमित्त विमानाने दिल्लीला आले. तिथे पोहचले तोपर्यंत त्यांना कळाले या घटनेमुळे दिल्लीसुद्धा हादरली आहे. तिथल्या वर्तमानपत्रानी ही सनसनाटी बातमी तिखटमीठ लावून पसरवली होती.  पहिल्या पानावर नवलकरांचे फोटो छापून आले होते. सगळीकडे त्यांचीचं चर्चा होती.

नवलकर जेव्हा जॉर्ज फर्नांडीस यांना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा त्यांनी देखील विचारलं, “प्रमोद पिस्तुल तर घेऊन आला नाहीस ना?”

लोकसभेमध्ये देखील या विषयावरून खडाजंगी झाली. अकाली दलाच्या खासदारांनी आम्हाला शपथविधीसाठी तलवार आणू दिली जात नाही पण शिवसेनेचे आमदार राजरोजपणे पिस्तुल घेऊन जातात असे म्हणत सभागृहात भांडण काढले. नवलकर दिल्लीहून परत येत होते तेव्हा त्यांना कळलं की मुंबईत दोन्ही सभागृहे बंद ठेवण्यात आली आहेत.

परत जेव्हा विधानभवन सुरु झाले तेव्हा सुरक्षा व्यवस्था अगदी कडक करण्यात आली होती. आत येणाऱ्या प्रत्येक आमदाराची काटेकोर तपासणी करण्यात आली. आधीच भडकलेल्या सत्ताधारी आमदारांनी नवलकरांना निलंबित करावे अशी घोषणा देत कामकाज बंद पाडले. अखेर जयवंतराव टिळकांनी प्रमोद नवलकरांचा हेतू स्वच्छ होता असे सांगत या प्रकरणावर पडदा टाकला.

यानंतरही बराच काळ प्रमोद नवलकरांच्या या स्टंटवर चर्चा सुरु राहिल्या. पण या स्टंटचा परिणाम म्हणा किंवा आणखी काही पण आठवड्याभरातचं मुंबईतील गँगवॉर संपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी टाडा हा कायदा आणला.

संदर्भ- या घटनेचे वर्णन शिवसेनेचे जेष्ठ नेते व माजी मंत्री प्रमोद नवलकर यांनी आपल्या निशाण या पुस्तकात केले आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.