राजीव गांधींच्या स्वप्नातली डिजिटल क्रांती साकार झाली ती त्यांच्या एका मराठी मित्रामुळे..

सत्तरच्या दशकातला काळ असेल. सांताक्रूझ विमानतळासमोर मनुभाई देसाई नावाचे एक गृहस्थ राहायचे. त्यांचं मुंबईत कॉस्मिक रेडिओ नावाचं प्रख्यात दुकान होतं. त्या काळात इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान सर्वांना आकर्षित करत असे. हायफाय ऑडिओ इंजीनिअरिंगमध्ये त्या काळात कॉस्मिकचे नाव अग्रगण्य होतं.

इंडियन एअरलाईन्सच्या दिल्ली मुंबई दिल्ली विमानाचा एक पायलट आठवड्यातून तीन दिवस मुंबईत असायचा. त्याला टेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड रस होता. अगदी लहानपणापासून त्याला वडिलांनी  रेडिओ दुरुस्ती, टेपरेकॉर्ड दुरुस्ती वगैरे कस करायचं ते शिकवलं होतं. मुंबईला आला कि तो पायलट हमखास कॉस्मिक रेडिओच्या दुकानात फेरी मारायचा. जगात कोणती नवीन टेक्नॉलॉजी आली आहे याची त्याला उत्सुकता असायची. यातूनच कॉस्मिकचे मालक मनुभाई देसाई यांच्याशी त्याची चांगली ओळख झाली.

दोघे समवयीन असल्यामुळे पुढे मैत्रीत रूपांतर झाले. त्या पायलटची दुपारी २ वाजता दिल्लीहून मुंबईला फ्लाईट आली की तो आपला युनिफॉर्म चेंज करायला एअरपोर्ट समोरच्या मनुभाई देसाई यांच्या घरी जाऊ लागला. मनुभाई देसाईंच फ्रेंड सर्कल पुढे त्याचेही मित्र बनले.

अनेकदा शॉपिंगला आईस्क्रीम खायला वगैरे ही मित्र मंडळी मुंबईत रस्त्यावर फिरत असायचे. तेव्हा लोक वळून वळून त्या पायलट कडे बघायचे. त्यांना वाटायचं कोणी बॉलिवूड हिरोच रस्त्यावरून फिरतोय. खरं पाहायला गेलं तर तो एका अर्थे सेलिब्रिटी होता पण कोणी हिरो नव्हता. त्याची आई तेव्हा देशाची पंतप्रधान होती.

त्या पायलटचं नाव राजीव फिरोज गांधी.

राजीव गांधी इंडियन एअरलाईन्सचे पायलट जरी असले तरी त्यांच पहिलं प्रेम इंजिनीरिंग होतं. इंग्लंडमध्ये केंब्रिजमधील ट्रिनिटी कॉलेज, इंपिरियल कॉलेज या प्रतिथयश विद्यालयात त्यांनी मेकॅनिकल इंजिनीयरिंगचं शिक्षण घेतलं होतं पण डिग्री पूर्ण झाली नव्हती. भारतात परत आले आणि पायलट बनले. मुंबई मध्ये त्याकाळात अनेक कारखाने होते, अनेक नवीन इंडस्ट्री उभी राहत होती. त्यामुळेच राजीव गांधी विशेष करून मुंबईत रमायचे. वेळ मिळेल तसे वेगवेगळ्या कारखान्यांना भेट द्यायचे.

राजीव गांधींच्या तिसाव्या वाढदिवसाच्या दिवशी मनुभाई देसाई यांनी त्यांची ओळख एका अशाच तरुण इंडस्ट्रियलिस्टबरोबर करून दिली. नाव प्रभाकर शंकर देवधर. 

प्रभाकर शंकर देवधर ते मुळचे पुण्याचे. नूमवि या प्रख्यात शाळेत शिकले. पुण्याच्याच सीओईपीमध्ये त्यांनी बी.ई. (टेलिकॉम) पूर्ण केलं. १९५६ ते १९६२ अशी सहा वर्षे ते टाटा  त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आय.सी.एम.आर.) आधिपत्याखालील प्रयोग-शाळेत मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स विभागात संशोधन क्षेत्रात काम केलं. 

१९६२ साली संशोधन आणि विकास क्षेत्रातील खासगी प्रयोगशाळा “अ‍ॅपलॅब” ची स्थापना केली.

१९६४ साली तेथील संशोधनावर आधारित ऊर्जाविषयक यंत्राचे उत्पादन आणि विक्री सुरू केली. तसेच तपासणी आणि मोजमापन करणारी विजेवर चालणारी यंत्रे विकसित केली. भारतात इलेक्ट्रोनिक्स क्षेत्रात डेव्हलपमेंट व रिसर्च मध्ये काम करणाऱ्या मोजक्या कंपन्यामध्ये अ‍ॅपलॅबचा समावेश होता.

भारतातली पहिली स्टेपर मोटर आणि लाईन व्होल्टेज रेग्युलेटर्स त्यांनी बनवली होती.

यंत्रे, इलेक्ट्रोनिक वस्तू, रेडीओ, कंप्युटर यात त्यांना विशेष रुची होती. यातूनच देवधर व राजीव गांधी यांची खास मैत्री जमली. अनेकदा लॅमिंगटन रोडच्या इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये ते एकत्र जात असत.

या काळात राजीव गांधींना मुंबईतील सामान्यांचे जीवन खूप जवळून पाहता आले. काही वेळा ते देवधर यांच्या ‘अ‍ॅपलॅब’ या कंपनीत जात आणि फॅक्टरीच्या शॉपफ्लोअरवर वेळ घालवत असत. त्या सहा वर्षांच्या काळात आठवड्यातून दोन वेळा तरी देवधर यांच्या वरळी येथील घरात सर्व मित्रांचा अड्डा जमायचा आणि त्यात राजीव गांधी हमखास असायचे.

देवधर सांगतात,

त्या वेळी विविध विषयांवर गप्पा होत किंवा आम्ही बाहेर हिंडायला जात असू. आम्ही व्हिस्कीचा स्वाद घेत असू आणि राजीव कोकाकोलाचा!

तंत्रज्ञानाच्या बाबतीत राजीव गांधी अतिशय चौकस बुद्धीचे होते. मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, डिजिटल कम्युनिकेशन इत्यादी विषय त्यांच्या आवडीचे. त्यात काहीही नवीन घडले की, त्यावर प्रभाकर देवधर व त्यांच्यात चर्चा होत असे. या चर्चेवेळी भारतात काय करता येईल हा प्रश्न नेहमीचा असायचा. अ‍ॅपलॅबमध्ये काही नवी वस्तू निर्माण केली तर ती पाहायला राजीव गांधी मुंबईला यायचे.

१९८० साली प्रभाकर देवधर यांनी त्यांना व राजीव गांधींना असे दोन बीबीसी मायक्रो कम्प्युटर विकत घेतले. राजीव गांधींनी मात्र हट्टाने त्याची किंमत चुकवली आणि मगच तो कम्प्युटर घेतला.

पुढे दुर्दैवाने राजीव यांच्या भावाचा संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला व राजीव गांधी राजकारणात आले.

संजय गेल्यानंतर राजीव गांधींना साहजिकच आईला मदत करणे आवश्यक झाले. त्यातला एक भाग होता इंदिराजींना रोज देशवासियांकडून येणारी पत्रे. संजय गांधींची ती जबाबदारी आता राजीव गांधींवर आली. त्यातील तंत्रज्ञानाबद्दलच्या पत्रांना उत्तर देण्यासाठी राजीव यांच्या मदतीला प्रभाकर देवधर शनिवार-रविवारी दिल्लीला जाऊ लागले.

१९८१मध्ये असे एक पत्र होते सॅम पित्रोडाचे. खेड्यातही विना एअरकंडीशनिंग चालू शकेल असे डिजिटल एक्स्चेंजचे तंत्रज्ञान देशाला देऊन ते हिंदुस्थानात बनवण्याचा प्रस्ताव होता. त्या वेळी अमेरिकेविषयी आणि विशेषतः सीआयएविषयी देशात भीती होती. सीआयए सॅम पित्रोडाच्या माध्यमातून हे करत असावी, अशी भीती जी. पार्थसारथी यांना होती. त्यामुळे इंदिराजी असेपर्यंत विशेष झाले नाही.

एकदा राजीव गांधी आणि प्रभाकर देवधर भारतातल्या लायसन्स राज बद्दल गप्पा मारत बसले होते.

खरं तर प्रभाकर त्यांच्याशी वादच घालत होते, त्यांचा आवाज चढला होता. अचानक तिथे पंतप्रधान इंदिराजी आल्या. त्यांनी या दोघांना काय झाल ते विचारलं. प्रभाकर देवधर यांनी इंदिरा गांधींना भारतीय व्यवस्थेतील दोष सांगितले, नवीन उद्योगांना हे कायदे व नियम कसे मारक ठरत आहेत, भारताच भविष्य कंप्यूटर व टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्री मध्ये आहे हे ठासून सांगितलं.

इंदिराजीनी थोडा विचार केला आणि देवधर यांना म्हणाल्या,

“तुझ्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्या एकत्र लिहून मला दे.”

प्रभाकर देवधर यांना धक्का बसला. सहज नेहमीची तक्रार सांगितल्याप्रमाणे आपण बोलत होतो आणि पंतप्रधान थेट सिरीयस झाल्या. देवधर यांनी थोड्या दिवसात देतो अस सांगितल. ते परत मुंबईला आले व ही घटना विसरून सुद्धा गेले. पण इंदिरा गांधी विसरल्या नव्हत्या.

पंतप्रधान कार्यालयातर्फे देवधर यांना पत्र पाठवून अजून का प्रेझेन्टेशन तयार झाल नाही हे विचारणा करणार पत्र आलं. 

मग मात्र प्रभाकर देवधर खडबडून जागे झाले. त्यांनी दिवसरात्र जागून एक नोट तयार केली व स्वतः जाऊन इंदिरा गांधी यांच्या हातात दिली. तो फेब्रुवारी महिना होता. इंदिराजी थोड्या रागाने म्हणाल्या,

“प्रभू, हे तयार करायला थोडा उशीर केलास. जरा लवकर मिळाल असत तर यावर्षीच्या बजेटमध्ये याचा समावेश करता आला असता.”

प्रभाकर देवधर यांच्या नोटचा उपयोग करून इंदिरा गांधी यांनी भारताच्या इलेक्ट्रोनिक पॉलिसीची घोषणा केली.

ही एक क्रांतिकारी घटना ठरली. भारतातील लायसन्सराज संपवायच्या दिशेने पहिले पाउल टाकण्यात आले होते. राजीव गांधी व प्रभाकर देवधर यांना अमेरिकेतुन पत्र पाठवणारा भारतीय तरुण येऊन मिळाला, त्याच नाम सॅम पित्रोदा.

या तिघा मित्रांनी मिळून भारताच ब्लॅक अंड व्हाईट भविष्य रंगीत करून टाकलं.

जगात फक्त श्रीमंत देशांकडे असणाऱ्या टेक्नोलॉजी भारतात बनू लागल्या. २३ ऑगस्ट १९८३ रोजी अनेक तरुण भारतीय उद्योगपती राजीव गांधी यांच्या भेटीस आले यात रतन टाटा यांचा देखील समावेश होता. भारतीय उद्योगांचे येणारे भविष्य त्यातील संधी याबद्दल चर्चा झाली.

मेक इन इंडियाचे हे पहिले पाउल होते.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधानपद राजीव गांधी यांच्या हातात आले. तेव्हा ही प्रक्रिया वेगवान करण्यात आली. प्रभाकर देवधर यांची इलेक्ट्रोनिक्स आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

त्यांच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाची उलाढाल १९८३-८४ सालांमधील १२०० कोटींवरून १९८९-९० सालांत ९४०० कोटींपर्यंत पोहोचली.कारागिरांना प्रशिक्षण देण्याकरिता त्यांनी माहिती तंत्रज्ञान आणि दूरचित्रवाणी या माध्यमांचा वापर करायला सुरुवात केली. त्याकरिता लागणाऱ्या ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओ कॅसेट) निर्मिती त्यांनी ई.टी. अ‍ॅण्ड टी.चे अध्यक्ष असताना केली.

पुढे १९८९ साली झालेल्या पराभवामुळे राजीव गांधींची सत्ता गेली आणि भारतातल्या डिजिटल क्रांतीला थोडा फार खीळ बसला. १९९१ साली त्यांची तामिळ लिबरेशन टायगरच्या अतिरेक्यांनी हत्याचं केली. पण त्यानंतर सत्तेत आलेल्या पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांनी राजीव गांधींचे मित्र प्रभाकर देवधर यांना परत बोलवलं आणि भारताची डिजिटल क्रांती पुढे नेली.

प्रभाकर देवधर यांच्या अ‍ॅपलॅबतर्फे भारतात पहिल्यांदा स्मार्टकार्डचा प्रयोग करण्यात आला. देशातले पहिले एटीएम देखील त्यांनीच बसवले. आजही प्रभाकर देवधर यांना भारतातल्या स्मार्ट कार्ड इंडस्ट्रीचे जनक म्हणूनच ओळखलं जातं.  

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.