भारतातील पहिलं स्मार्टकार्ड, एटीएम मशीन बनवणारा मराठी माणूस आहे

आज आपण झटपट मोबाईल वापरतो, आपल्या हाताशी कॉम्प्युटर आहे, समोर एलईडी टीव्ही आहे, पैसे लागले की घराजवळ एटीएम मशीन आहे. सगळ आयुष्य सोपं होऊन बसलं आहे. याच श्रेय कोणाला जात माहित आहे?

प्रभाकर शंकर देवधर

ते मुळचे पुण्याचे. नूमवि या प्रख्यात शाळेत शिकले. पुण्याच्याच सीओईपीमध्ये त्यांनी बी.ई. (टेलिकॉम) पूर्ण केलं. १९५६ ते १९६२ अशी सहा वर्षे ते टाटा  त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आय.सी.एम.आर.) आधिपत्याखालील प्रयोग-शाळेत मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स विभागात संशोधन क्षेत्रात काम केलं. 

१९६२ साली संशोधन आणि विकास क्षेत्रातील खासगी प्रयोगशाळा “अ‍ॅपलॅब” ची स्थापना केली.

१९६४ साली तेथील संशोधनावर आधारित ऊर्जाविषयक यंत्राचे उत्पादन आणि विक्री सुरू केली. तसेच तपासणी आणि मोजमापन करणारी विजेवर चालणारी यंत्रे विकसित केली. भारतात इलेक्ट्रोनिक्स क्षेत्रात डेव्हलपमेंट व रिसर्च मध्ये काम करणाऱ्या मोजक्या कंपन्यामध्ये अ‍ॅपलॅबचा समावेश होता.

भारतातली पहिली स्टेपर मोटर आणि लाईन व्होल्टेज रेग्युलेटर्स त्यांनी बनवली होती.

तो काळ समाजवादी विचारसरणीचा होता. यंत्रे माणसांचा रोजगार हिरावून घेतात यावर त्याकाळच्या नेत्यांचा स्वप्नाळू विश्वास होता. आयबीएम सारख्या कंपन्यानां भारतातून हाकलून दिल जात होत. लालफितीचा लायसन्सराज सर्वत्र राज्य करत होता.

प्रभाकर देवधर यांची दरम्यानच्या काळात पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे थोरले चिरंजीव राजीव यांच्याशी ओळख झाली.

ते एयर इंडियामध्ये पायलट होते. त्यांनी इंजिनियरिंगच शिक्षण घेतलेलं होत. यंत्रे, इलेक्ट्रोनिक वस्तू, रेडीओ, कंप्युटर यात त्यांना विशेष रुची होती. यातूनच देवधर व त्यांची खास मैत्री जमली.

पुढे दुर्दैवाने राजीव यांच्या भावाचा संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला व राजीव गांधी राजकारणात आले.

दिल्लीतल्या पहिल्या एशियाड गेम्सच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्या कडे देण्यात आली होती. या एशियन गेम्सच भव्य आयोजन त्यांनी करून दाखवलच शिवाय याच स्पर्धेच्या निमित्ताने अनेकांचा विरोध सहन करून भारतात रंगीत टीव्ही आणले.

एकदा राजीव गांधी आणि प्रभाकर देवधर भारतातल्या लायसन्स राज बद्दल गप्पा मारत बसले होते.

rajiv deodhar20160418 630 630

खरं तर प्रभाकर त्यांच्याशी वादच घालत होते, त्यांचा आवाज चढला होता. अचानक तिथे पंतप्रधान इंदिराजी आल्या. त्यांनी या दोघांना काय झाल ते विचारलं. प्रभाकर देवधर यांनी इंदिरा गांधींना भारतीय व्यवस्थेतील दोष सांगितले, नवीन उद्योगांना हे कायदे व नियम कसे मार्क ठरत आहेत, भारताच भविष्य सॉफ्टवेअरइंडस्ट्री मध्ये आहे हे ठासून सांगितलं.

इंदिराजीनी थोडा विचार केला आणि देवधर यांना म्हणाल्या,

“तुझ्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्या एकत्र लिहून मला दे.”

प्रभाकर देवधर यांना धक्का बसला. सहज नेहमीची तक्रार सांगितल्याप्रमाणे आपण बोलत होतो आणि पंतप्रधान थेट सिरीयस झाल्या. देवधर यांनी थोड्या दिवसात देतो अस सांगितल. ते परत मुंबईला आले व ही घटना विसरून सुद्धा गेले. पण इंदिरा गांधी विसरल्या नव्हत्या.

पंतप्रधान कार्यालयातर्फे देवधर यांना पत्र पाठवून अजून का प्रेझेन्टेशन तयार झाल नाही हे विचारणा करणार पत्र आलं. 

मग मात्र प्रभाकर देवधर खडबडून जागे झाले. त्यांनी दिवसरात्र जागून एक नोट तयार केली व स्वतः जाऊन इंदिरा गांधी यांच्या हातात दिली. तो फेब्रुवारी महिना होता. इंदिराजी थोड्या रागाने म्हणाल्या,

“प्रभू, हे तयार करायला थोडा उशीर केलास. जरा लवकर मिळाल असत तर यावर्षीच्या बजेटमध्ये याचा समावेश करता आला असता.”

प्रभाकर देवधर यांच्या नोटचा उपयोग करून इंदिरा गांधी यांनी भारताच्या इलेक्ट्रोनिक पॉलिसीची घोषणा केली.

ही एक क्रांतिकारी घटना ठरली. भारतातील लायसन्सराज संपवायच्या दिशेने पहिले पाउल टाकण्यात आले होते. राजीव गांधी व प्रभाकर देवधर यांना एक अमेरिकेत काम करणारा भारतीय तरुण येऊन मिळाला, त्याच नाम सॅम पित्रोदा.

या तिघांनी मिळून भारताच ब्लॅक अंड व्हाईट भविष्य रंगीत करून टाकलं.

जगात फक्त श्रीमंत देशांकडे असणाऱ्या टेक्नोलॉजी भारतात बनू लागल्या. २३ ऑगस्ट १९८३ रोजी अनेक तरुण भारतीय उद्योगपती राजीव गांधी यांच्या भेटीस आले यात रतन टाटा यांचा देखील समावेश होता. भारतीय उद्योगांचे येणारे भविष्य त्यातील संधी याबद्दल चर्चा झाली.

मेक इन इंडियाचे हे पहिले पाउल होते.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधानपद राजीव गांधी यांच्या हातात आले. तेव्हा ही प्रक्रिया वेग्वेअन करण्यात आली. प्रभाकर देवधर यांची इलेक्ट्रोनिक्स आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

त्यांच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाची उलाढाल १९८३-८४ सालांमधील १२०० कोटींवरून १९८९-९० सालांत ९४०० कोटींपर्यंत पोहोचली.कारागिरांना प्रशिक्षण देण्याकरिता त्यांनी माहिती तंत्रज्ञान आणि दूरचित्रवाणी या माध्यमांचा वापर करायला सुरुवात केली. त्याकरिता लागणाऱ्या ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओ कॅसेट) निर्मिती त्यांनी ई.टी. अ‍ॅण्ड टी.चे अध्यक्ष असताना केली.

प्रभाकर देवधर यांनीच भारतातले पहिले टीव्ही सेट बनवले.

राजीव गांधी हे पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावर मात्र या इलेक्ट्रोनिक्स क्रांतीवर खीळ बसला. प्रभाकर देवधर दिल्लीतून पुन्हा मुंबईला आले व आपल्या अ‍ॅपलॅब या कंपनीकडे पूर्णवेळ लक्ष देण्यास सुरवात केली.

हा काळ स्मार्टकार्डचा होता. जगभरात ही टेक्नोलॉजी मूळ धरू लागली होती. प्रभाकर देवधर यांनी अ‍ॅपलॅबतर्फे भारतात याचा प्रयोग करायचं ठरवलं.

त्यांनी एक प्रोग्रॅमेबल चिप बनवून घेतली. ही चिप क्रेडीट कार्ड आकाराच्या एका प्लास्टिक कार्डवर एम्बेड करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. अ‍ॅप्लॅबने मायक्रो कंट्रोलरवर आधारित प्रणाली वापरून पब्लिक पेफोन विकसित केला. ज्या ठिकाणी फोन केलेला आहे त्यानुसार दर लक्षात घेऊन ते कार्डामधून वजा करण्यासाठी एक अत्याधुनिक कम्युनिकेशन प्रोटोकॉल विकसित केला.

त्यानंतर हे फोन दूरसंचार खात्यामार्फत मुंबईमधे सहा महिन्यांहून अधिक काळासाठी चाचणी म्हणून वापरण्यात आले. ते प्रचंड यशस्वी ठरल. अख्ख्या दिल्लीत हे असे स्मार्टकार्डचे टेलिफोन बसवण्यात आले.

प्रभाकर देवधर यांचा इंटरनॅशनल कॉन्फरन्समधे “स्मार्टकार्ड इंडस्ट्री पायोनिअर” म्हणून गौरवण्यातदेखील आले होते.

१९९६ साली त्यांनी भारतीय बनावटीची ऑटोमेडेट टेलर मशीन (एटीएम)ची निर्मिती केली.

पण दुर्दैवाने या पूर्वी आलेला त्यांचा राजकीय संबंध पुढील काळात त्यांच्या पायातील धोंडा बनून राहिला. राजीव गांधी यांच्या विरोधकांनी अ‍ॅप्लॅबच्या प्रोडक्टशी दुजाभाव करण्याच धोरण अवलंबल. यातूनही आपल्या क्वालिटी व विश्वासर्हता याच्या जोरावर अ‍ॅप्लॅबचे जवळपास ८०० प्रोडक्ट मार्केटमध्ये राज्य करत आहेत.

फक्त इलेक्ट्रोनिक्स नाही तर साहित्याच्या क्षेत्रातही प्रभकर देवधर यांनी मुक्त संचार केला.

१९९६ साली जेरुसलेम (इस्रायल) येथे भरलेल्या जागतिक मराठी परिषदेच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. तसेच जागतिक मराठी अकादमीचे ते १९९७ ते १९९९ या काळात अध्यक्ष होते. त्याच कालावधीत ते महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचेही अध्यक्ष होते.

२००० सालापासून ते मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. २००५ सालापासून ते भारत-चीन इकॉनॉमिक आणि कल्चरल कौन्सिलच्या अध्यक्षपदी आहेत. 

आज अनेकदा चर्चा होते की अ‍ॅप्लॅबने तिच्या पोटेन्शियल इतके हजारो कोटी रुपये कमवले नाहीत. पण प्रभाकर देवधर यांना त्याची खंत नाही. पैसे मिळवणे हा हेतू कधी नव्हताच.

बाकी काही का असेना साधारण ऐंशी नव्वदच्या दशकात भारतातल्या इलेक्ट्रोनिक व संगणक क्षेत्रात जे अमुलाग्र बदल घडले याचा शिल्पकार त्यांना बनता आलं. त्यांच्यामुळेच भारत एकविसाव्या शतकाला सामोरे जाऊ शकला हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

 

 

2 Comments
  1. Rahul sutar says

    1st time read

  2. Sanjana says

    खूप छान आणि माहिती पूर्ण लेख
    तंत्रज्ञान आणि विकास यंत्रणा
    याबाबत अधिक माहिती पाठवून
    खरी देशाची ओळख होते
    असेच लेख प्रकाशित करावे

Leave A Reply

Your email address will not be published.