महाराष्ट्रातल्या कंदिलाचा ब्रँड संपूर्ण भारतात देशभक्तीची ओळख बनला होता…

सध्या देशभक्तीचं नवीन वारं आलंय. चीनच्या मुजोरपणामुळे आज सर्वत्र स्वदेशी उत्पादने वापरण्याचा आग्रह होतोय. कोरोनाच्या काळापासून आपल्या पंतप्रधानांनी देखील आत्मनिर्भर होण्याचा नारा दिलाय. भारतीय उद्योजकांनी बनवलेल्या वस्तू आणि सेवा वापरा असा आग्रह धरला जातोय. नेमकं असच स्वातंत्र्यापूर्वी देखील झालं होतं. स्वदेशी वस्तू म्हणजे देशभक्ती हे सगळे नेते सांगत होते.

या स्वदेशी ब्रँड मध्ये सगळ्यात अग्रेसर होते ते म्हणजे ओगलेंचे प्रभाकर कंदील.

सध्याचा सातारा सांगली जिल्ह्यांच्या सीमेवर असलेलं औंध संस्थान. राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे इथले श्रीमंत बाळासाहेब भवानराव पंतप्रतिनिधी. औंधसारख्या छोट्या दुष्काळी संस्थानाचा हा राजा पण त्यांनी केलेल्या कार्याची दखल स्वतः गांधीजींनी  घेतली होती, इतका हा मोठा माणूस.

त्यांनी आपल्या प्रजेला आपलं कुटुंब समजलं.

शाळा-वसतीगृह काढली आणि तिथं विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. पुरोगामी विचारांचा वारसा चालवला, अस्पृश्यता बंद केली. संगीत, नाटक, चित्रकला याला राजाश्रय दिला. कैद्यांना सन्मानाने जगण्याची दुसरी संधी मिळावी म्हणून खुला कारागृह बनवला. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले.

सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्याच्याही १० वर्षे आधी आपल्या राज्यकारभाराची सूत्रे प्रजेच्या हाती सोपवली. असा हा कर्मयोगी राजा.

याच राजाचे आणखी एक कार्य म्हणजे त्यांनी आपल्या राज्यात सबंध देशाला स्वावलंबी बनवतील असे उद्योग निर्माण होण्यास प्रेरणा दिली. किर्लोस्करांचा नांगर कारखाना औंध संस्थानच्या माळरानांवर उभा राहिला. याच कारखान्याने औंधच्या दुष्काळी प्रदेशात अनेक बेरोजगार हातांना काम दिले. किर्लोस्करवाडी वसवली.

त्याकाळी औंध संस्थांनमध्ये एक शिक्षक होते, नाव प्रभाकरपंत ओगले. चाळीस वर्षे त्यांनी ज्ञानदानाचे काम इमाने इतबारे केलं , पण आपल्या मुलांनी मात्र नोकरी न करता स्वतंत्र व्यवसाय करावा अशी त्यांची तीव्र इच्छा होती. राष्ट्रीय वृत्तीचे आणि उद्योजकतेचे बीज त्यांनीच आपल्या मुलांमध्ये पेरले. वडिलांची इच्छा लवकरच मुलांनी पूर्ण केली.

प्रभाकरपंत आणि पार्वतीबाई ओगले या जोडप्याला आठ मुलगे. गुरुनाथ, श्रीपाद, गंगाधर, शंकर, नरहर, दिगंबर, व्यंकटेश आणि अवधूत. यातले गुरुनाथ हे लहानपणापासून हुशार होते. त्यांना मुंबईच्या सुप्रसिद्ध व्हिक्टोरिया ज्युबिली म्हणजेच व्हीजे (आजचे वीरमाता जिजाबाई ) या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवून देण्यात आलं होतं. गुरुनाथ यांनी तिथे पहिल्या क्रमांकाने एल्. एम्. ई.चा शिक्षण पूर्ण केलं . पुढे ते बार्शीच्या ‘लक्ष्मी टेक्‍निकल इन्स्टिट्यूट’ मध्ये काही काळ प्रमुख अध्यापक होते.

स्वतंत्र व्यवसायातील अपयशामुळे गुरुनाथांनी किर्लोस्कर बंधूंच्या कारखान्यात अभियंत्याची नोकरी पत्करली. किर्लोस्करांनी या तरुणाची कर्तबगारी ओळखली आणि त्याला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास मदत केली.

१९१३ सालच्या नोव्हेम्बर महिन्यात विरवड्याच्या माळावर एका छोट्याशा झोपडीत गुरुनाथ आणि श्रीपाद ओगले बंधूनी दहा पौंड काच वितळवून आपला नवीन उद्योग सुरु केला. दूरदृष्टीच्या औंधच्या महाराजानी त्यांना जागा दिली आणि ओगलेवाडीचे निर्माण झाले.

हाच तो जगप्रसिद्ध ओगले काच कारखाना. 

सुरवातीला इथे बांगड्या बनवल्या जात असत. पण गुरुनाथ ओगले यांची महत्वाकांक्षा मोठी होती. सरकारने दिलेल्या शिष्यवृत्तीच्या बळावर ते काचउत्पादनच्या उच्च शिक्षणार्थ विलायतेस गेले. इंग्लंडमधल्या शेफील्ड येथील अभ्यासानंतर वर्षभरात त्यांनी अमेरिकेस प्रयाण केलं. तिथल्या पिट्सबर्ग विद्यापीठात काचनिर्मितीच्या तंत्राचा अभ्यास केला. यातून त्यांना आपल्या कारखान्यात कंदील निर्मिती करता येईल याची कल्पना सुचली.

१९२२ साली ते स्वदेशी परतले. पण इथे आल्यावर त्यांनी आपल्या कारखान्याचा जम बसवला. कंदील निर्माण करण्यासाठी भांडवलापासून कारखान्याची तयारी केली आणि लगेचच दोन वर्षात या कारखान्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री खरेदी करण्याकरिता ते जर्मनीस गेले.

तेथून भारतात परतल्यावर १९२५ – २६ पासून कंदिलांचे उत्पादन त्यांनी सुरू केले. आयुष्यभर खस्ता खाऊन ज्यांनी त्यांना वाढवलं अशा वडिलांच्या नावे या कंदिलाची निर्मिती केली.

प्रभाकर कंदील.

विजेचे दिवे अजूनही भारतीयांच्या स्वप्नातच होते. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाच्या घरात कंदिलच उजेड पाडायचा. भारतात ब्रिटिशांचं राज्य असल्यामुळं उद्योगधंद्यांना चालना मिळालीच नव्हती. त्यामुळे कंदिल युरोपातून मागवले जायचे. भारतात जे थोडे फार कंदिल बनायचे त्यांना मागणीच नव्हती.

ओगलेंनी आपल्या काच कारखान्यात बनवलेला प्रभाकर कंदील परदेशी बनावटीच्या आधुनिक कंदिलांच्या तोडीस तोड होता. एवढंच काय किंमत आणि दर्जाच्या याची तुलना केल्यास प्रभाकर कंदील जास्त चांगला होता.

आता प्रश्न उरला होता मार्केटिंगचा.

त्याकाळी देखील परदेशी ते उत्तम हीच संकल्पना बहुतांश लोकांमध्ये दृढ झाली होती. हा गैरसमज मोडून काढणे हे गुरुनाथ ओगलेंच्या समोरील सगळ्यात मोठे आव्हान होते. त्यांनी कल्पकतेने यावर मात केली.

गुरुनाथ ओगले हे लोकमान्य टिळकांचे मोठे भक्त होते. खुद्द टिळकांनी त्यांच्या ओगलेवाडीच्या कारखान्याला पूर्वी भेट दिली होती. त्यांनी वीस वर्षांपूर्वी दिलेल्या स्वदेशीच्या हाकेला आपल्या कंदिलाशी जोडायचा विचार ओगलेंच्या मनात आला.

अशातच महात्मा गांधींनी देखील आपल्या सत्याग्रहाबरोबर स्वदेशीचा पुरस्कार सुरु केला. काँग्रेसच्या आंदोलनात विदेशी कपड्यांची होळी केली जाऊ लागली. औंधचा राजा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा समर्थक होता. गांधीजींशी त्याच मित्रत्वाचं नातं होतं. गुरुनाथ ओगलेंनी हेच सूत्र आपल्या मार्केटिंग मध्ये वापरलं.

ओगले आपल्या कंदिलाच्या जाहिरातीत सांगत होते खरे देशभक्त असाल तर प्रभाकर कंदील वापरा.

प्रभाकर कंदील कोणत्याही विदेशी कंदिलांच्या दिखाऊ व टिकाऊपणात खात्रीने तोंडात मारतो असा देखील यात उल्लेख होता.

प्रभाकर कंदील अगदी अल्पावधीतच लोकप्रिय झाले. फक्त औंध संस्थान नाही तर महाराष्ट्रच काय तर देशभर प्रभाकर कंदील फेमस झाला. औंध सारख्या छोट्याशा संस्थांनमध्ये तयार झालेला कंदिल परदेशातही निर्यात केला जाऊ लागला.

कंदिलाचा ब्रँड असतो हे ओगलेंनी भारताला शिकवलं.  

प्रभाकर कंदीलाच्या यशानंतर ओगलेंनी प्रभाकर स्टोव्ह देखील बनवला. तो देखील तितकाच यशस्वी ठरला. सायकली व विजेचे पंखे यांच्या उत्पादनाच्या योजनाही गुरुनाथांनी आखल्या होत्या; तथापि त्या साकार होई शकल्या नाहीत.

पूर्वीचे त्रावणकोर व श्रीलंका येथील सरकारांशी काचकारखाने सुरू करण्याबद्दल त्यांनी वाटाघाटी करून १९४२ साली  प्रत्यक्ष कारखान्यांची उभारणी केली.

दुसऱ्या महायुद्धात ओगलेवाडीतून टाटा कंपनीला मोठ्या प्रमाणात काच बाटल्यांचा पुरवठा केला होता. आपल्या कारखान्यांमधून ओगलेंनी हजारो लोकांना रोजगार मिळवून दिला. खुद्द भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू या कारखान्याच्या भेटीसाठी आले होते.

तथापि प्रभाकर कंदिलांची निर्मिती ही गुरुनाथांनी सर्वांत महत्त्वाची कामगिरी समजली जाते.

ग्रामीण भागात विजेचा प्रसार झाला नव्हता अशा त्या काळात हा कंदील म्हणजे एक अभूतपूर्व आणि खरेतर क्रांतिकारक अशी वस्तू होती. सूर्यास्तानंतर सर्वच व्यवहार ठप्प व्हायचे अशा त्या काळात ह्या कंदिलाने सर्वसामान्य माणसाचे जीवन खूपच सुसह्य केले. देशात अनेकांच्या घरात पहिला दिवा प्रभाकर कंदिलाचा लागला. आज आपल्यापैकी अनेकांना याचं नाव ठाऊक नसण्याची शक्यता आहे मात्र आपल्या आधीच्या कित्येक पिढ्या या कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करून मोठ्या झाल्या.

खऱ्या अर्थाने स्वदेशी आणि देशभक्तीचं प्रतीक असलेला प्रभाकर कंदील आजही या पिढ्यांच्या आठवणींच्या हळुवार कप्प्यात आपली जागा राखून आहेत हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.