आणि पुण्यात प्रभात स्टुडिओच्या जागी फिल्म इन्स्टिट्यूट उभी राहिली

आग्र्यात ताजमहाल आहे, मुंबईत गेट वे ऑफ इंडिया आहे तस पुण्यात काय आहे ? याचं उत्तर नॉर्मल माणूस शनिवार वाडा असे देईल पण फिल्मी किडे याच उत्तर FTII असं देतात.

काही दिवसापूर्वी वादात अडकलेली ही FTII म्हणजे आहे तरी काय?

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया .

भारतातील सिनेमा च शिक्षण देणारी सर्वात दर्जेदार संस्था.सिनेमा शी संबंधित अभिनय, दिग्दर्शन, संकलन, कलादिग्दर्शन, पटकथा लेखन अशा विविध विषयांचे डिप्लोमा कोर्सेस इथे चालतात. भारत सरकार द्वारा संचालित हया संस्थेची फी नाममात्र आहे.अत्यंत कठीण अशी प्रवेश परीक्षा घेऊन त्यातून देशभरातून प्रत्येक कोर्स साठी फक्त बारा बारा विद्यार्थी निवडले जातात.

पूर्वी इथे प्रभात स्टुडीओ होता.

कोल्हापुरात बाबुराव पेंटर यांच्या महाराष्ट्र स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या व्ही.शांताराम, शेख फत्तेलाल , विष्णुपंत दामले, केशवराव धायबर यांनी सीताराम कुलकर्णी यांच्या मदतीने प्रभात स्टुडिओ सुरू केला. तो काळ मुकपटांचा होता.

त्यांचा पहिलाच सिनेमा गोपालकृष्ण हिट झाला. एकापाठोपाठ एक ६ मुकपट गाजले. मग त्यांनी पहिला बोलपट बनवला, “अयोध्येचा राजा” हा सिनेमा तर सुपरहिट झाला. प्रभातची चर्चा देशभर होऊ लागली.

तेव्हाच त्यांनी निर्णय घेतला की आता कोल्हापुरातून पुण्याला शिफ्ट व्हायचं.

कोल्हापूर हे तेव्हा मराठी सिनेमाचं मुख्यकेंद्र होत तर मुंबई ही हिंदी सिनेमाची राजधानी या दोन्हीच्या मधोमध असणाऱ्या पुण्यात प्रभात स्टुडिओ आला.

डेक्कन पासून काही अंतरावर विधी महाविद्यालयाच्या जवळ हनुमान टेकडीच्या उताराची सलग ११ एकर जमीन सरदार गणपतराव नातू यांच्याकडून साडे सोळा हजार रुपयांत विकत घेण्यात आली होती.

पुण्यात आल्यावर दामले यांनी आंबेकर नावाच्या कॉन्ट्रॅक्टर कढून ही जागा साफसूफ करून घेण्यात आली व अद्यावत असा स्टुडिओ उभारण्यात आला. इथे आल्यावर पहिला सिनेमा बनला, अमृतमंथन. हा भारतातला पहिला रौप्यमहोत्सवी चित्रपट.

फक्त मराठीच नाही अनेक हिंदी सिनेमे देखील इथे बनू लागले.

त्या काळातली आशिया मधला सर्वात मोठा स्टुडिओ अशी याची ख्याती होती. साउंड रेकॉर्डिंग पासून पोस्ट प्रोडक्शन पर्यंत सर्व गोष्टी एकाच ठिकाणी करण्याची सोय होती.उद्याने, उपवने, नदीचा घाट याचे सेट उभारण्यात आले.

पुण्यात प्रभात मध्ये फिल्म मेकिंग मध्ये अनेक प्रयोग येथे करण्यात आले.

संत तुकाराम या चित्रपटासाठी करण्यात आलेले स्पेशल इफ्फेक्ट पाहून जगभरातल्या रसिकांनी तोंडात बोटे घातली. कित्येक पुरस्कार मिळाले.

कुंकू, धर्मात्मा, माणूस, संत ज्ञानेश्वर, रामशास्त्री असे गाजलेले पिक्चर येथेच बनले.

पुढे एकमेकांच्यात कुरबूरीतुन् संस्थापकांच्यात फुट पडली आणि प्रभात चं पडता काळ सुरु झाला. पिक्चर पडू लागले. स्टुडिओ तोट्यात गेला. गुरुदेव दत्त हा शेवटचा सिनेमा इथे बनला. पुढे प्रभात सिनेमा कंपनी बंद पडली.

स्टुडिओ विकायची वेळ आली. पण एवढा मोठा पसारा विकत घेणे कोणालाही परवडणारा नव्हता.

अखेर लिलाव करायची वेळ आली. साडे चार लाखाला प्रभात कंपनी व स्टुडिओची सगळी मालमत्ता अत्तरवाले केळकर नावाच्या व्यक्तीने विकत घेतली.

त्यांनी प्रभात याच बॅनर खाली सिनेमे बनवले पण अनुभव नसल्यामुळे ते अयशस्वी ठरले. अखेर त्यांनी स्टुडिओ भाड्याने देण्यास सुरुवात केली. त्याकाळात येथे देव बाप्पा, सांगत्ये ऐका या सिनेमाची निर्मिती झाली.

पण हा पांढरा हत्ती पोसण्याचे केळकर यांना देखील जमेनासे झाले. त्यांनी प्रभात विक्रीसाठी काढला.

अशा वेळी भारत सरकार पुढे आले.

व्हिजनरी नेहरूंचा तो काळ होता. आयआयटी आयआयएम सारख्या संस्था सुरू करणारया नेहरूंनी सिनेमा बनवण्यासाठी देखील एखादी प्रशिक्षण संस्था असावी असं डोक्यात घेतलं होतं.

यासाठी पुण्याच्या प्रभात सारखी जागा त्यांना शोधूनही सापडणार नव्हती.

त्यांच्या आग्रहामुळे भारत सरकारने प्रभात स्टुडिओ साडे अकरा लाखाला विकत घेतला. ते वर्ष होत १९५९.

फिल्म इन्स्टिट्यूटची स्थापना केली गेली.

तेव्हा भारताचे माहिती व प्रसारण मंत्रीपदी बी.व्ही.केसकर हे होते. फिल्म इन्स्टिट्यूट त्यांच्याच मंत्रालयाच्या अखत्यारीत येत होती. पुण्याला ही संस्था स्थापन होण्यामागे त्यांचाही सिंहाचा वाटा होता असे मानले जाते.

पहिल्या वर्षी सिनेमामध्ये काम करणाऱ्या लोकांनाच प्रशिक्षण देण्यात आलं. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे १९६१ साली इन्स्टिट्यूटची पहिली बॅच बाहेर पडली. सुरवातीला अॅक्टिंग, डिरेक्शन, एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी हे डिप्लोमा कोर्सेस सुरू झाले होते. आज इथे शॉर्ट टर्म कोर्स सुद्धा घेतले जातात.

१९७४ साली दिल्लीमध्ये सुरू झालेलं टेलव्हिजन ट्रेनिंग सेंटर देखील इथेच हलवण्यात आलं.

सिनेमामध्ये वापरतात तशा खऱ्या कॅमेऱ्यावर ट्रेनिंग देणारे हे भारतातील एकमेव फिल्म इन्स्टिट्यूट असेल. इतर ठिकाणी लाखोंमध्ये फी आकारली जाते त्यामानाने ftii देशभरातून प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थी निवडते व त्यांना नाममात्र फी आकारते.

या फिल्म इन्स्टिट्यूट मधून जया भादुरी, मिथुन चक्रवर्ती, नसिरुद्दीन शाह ओम पुरी यांच्या पासून ते शक्ती कपूर, राजकुमार राव यांच्या पर्यंत अनेक अभिनेते, राजकुमार हिराणी, सुभाष घाई, संजय लीला भन्साळी यांच्या पासून ते उमेश कुलकर्णी यांच्या पर्यंत महान दिग्दर्शक, संकलक तयार झाले आहेत. त्यांनी फिल्म इंडस्ट्री गाजवली आहे,

रसूल पोकुट्टी यांनी तर ऑस्कर जिंकून इन्स्टिट्यूटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

जागतिक स्तरावर देखील सर्वोत्तम सिनेमा प्रशिक्षण संस्थेमध्ये समावेश होणाऱ्या या इन्स्टिट्यूटने प्रभात स्टुडिओचे एक म्युजियम बनवून आपला वारसा जतन केला आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.