महिलांना ५०% आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी पहिल्यांदा बार्शीच्या आमदारांपासून सुरु झाली.
अलीकडेच झालेल्या प्रियांका गांधी यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं होतं. उत्तर प्रदेशातील महिलांना राजकारणात आणण्यासाठी त्यांनी ४० टक्के आरक्षणाची घोषणा केली. आणि असंही म्हणाल्या कि, जर माझ्या हातात असलं तर मी ५० टक्के आरक्षण देखील देईल. या निमित्ताने आता पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली कि, महिलांच्या आरक्षणाची फरफट कधी थांणार आहे.
संसदेमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण ठेवण्यात यावे ही मागणी चोवीस वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र आता संसदेत महिलांना ५० टक्के राखीव जागा ठेवाव्यात अशी मागणी अजूनही होत आहे.
महाराष्ट्रात आणि देशात अशा अनेक महिला राजकारणी महिला आरक्षणासाठी लढल्या. त्यात एक नाव हमखास घ्यावंच लागते ते म्हणजे प्रभावती शंकर झाडबुके हे होय.
प्रभावतीताईचा जन्म १६ डिसेंबर १९३४ रोजी झाला. लहानपणापासून त्यांना वर्तमानपत्रे वाचनाची आवड होती. शंकरराव झाडबुके यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना एकच मुलगी आहे. प्रभावतीताईचे पती शंकरराव हे समाजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रीय होते.
प्रभावतीताईंना त्यांचे पती श्री शंकरराव झाडबुके यांच्याकडून समाजकार्याची प्रेरणा मिळाली.
शंकरराव झाडबुके यांनी आपल्या पत्नीला म्हणजेच प्रभावतीताई यांना बार्शी – उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवण्यास सांगितली. आणि त्या उभ्या राहिल्या आणि निवडूनही आल्या. वयाच्या फक्त अठ्ठाविसाव्या वर्षी त्या आमदार झाल्या होत्या. त्या काळात एका महिला नेत्यांनी निवडून येणे म्हणजे साधी-सोपी गोष्ट नव्हतीच. १९६२ ते १९७२ याच काळात त्यांनी विधानसभेत आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. आजही त्या मतदारसंघात त्यांच्या कारकीर्द आणि कार्याची छाप आहे.
१९६४ साली प्रभावतीताई सोलापूर जिल्हा महिला काँग्रेस समितीच्या अध्यक्षा बनल्या. काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे राबवण्यात त्यांनी अगदीच पुढाकार घेतला. आमदार होण्यापूर्वी म्हणजेच १९५९ ते १९६३ या काळात त्या बार्शी नगरपालिकेच्या सदस्य होत्या. तसेच बार्शी नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत विजयी देखील झाल्या होत्या. महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या असतांना राज्य वित्त आयोगाच्या सदस्य होत्या. तसेच सरकारने नेमलेल्या विविध समित्यावरही त्यांनी काम केलं.
श्रीमती प्रभावती झाडबुके यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये अनेक महत्त्वाची सार्वजनिक आणि सामाजीक सुधारणा घडवून आणणारी कार्य आणि उपाययोजना राबवल्या. १९५४ साली त्यांनी बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्या संस्थापक अध्यक्ष आहेत. १९५८ पासून ते आज पर्यंत मंडळाच्या अध्यक्षपदी कार्य करीत आहेत. आज या संस्थेच्या एकूण १३ शाखा आहेत. १९६० साली त्यांनी बी. एड महाविद्यालयाची स्थापना केली. प्रभावतीताईंनी जयशंकर सूतगिरणीच्या स्थापनेमध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान दिले.
त्यांनी मतदार संघातील पाणीपुरवठा असेल वा वीजपुरवठा असेल सर्वच योजनांचा पाठपुरावा सतत करत असायच्या. तसेच त्यांनी आपल्या मतदारसंघातील दळणवळणाच्या समस्या देखील सोडवल्यात. तसेच स्थानिक नागरिकांच्या लक्षात राहण्याजोगी बाब म्हणजे त्यांच्या सार्वजनिक आणि दैनदीन आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी मूलभूत प्रयत्न केले आहेत.
त्या सतत आपल्या भाषणात आणि मुलाखतीमध्ये म्हणतात कि, “महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने ५० टक्के आरक्षणावर हक्क सांगावा. आणि विधानसभा तसेच लोकसभेच्या आरक्षणासाठी संघर्ष करावा”. अशा प्रकारचा संदेश त्या महिलांना देत असतात. समाजकार्य करतांना महिला म्हणून मला कसल्याही प्रकारची अडचण आली न कोणत्या मर्यादा आल्या नसल्याचे प्रतिपादन त्या करत असतात.
हे हि वाच भिडू :
- गावातील तलाठ्यामुळे महर्षि कर्वे भारतरत्न पुरस्कार घेण्यासाठी वेळेवर पोहचू शकले नाहीत.
- पंतप्रधानांनी ताराबाईंच्या अंगणवाड्या पाहिल्या आणि देशभरात हा उपक्रम चालू केला.
- बलात्कार झाल्यानंतर स्त्रियांची नाही तर त्या बलात्काऱ्याची अब्रू जाते.