ते नसते तर अरुण जेटली काँग्रेसमध्ये गेले असते…

स्व.अरुण जेटली. अमित शहा येण्यापूर्वी नरेंद्र मोदींच्या खालोखाल दबदबा ज्यांचा होता असे भाजपचे दिग्गज नेते. असं म्हटलं जायचं कि भाजप मध्ये फक्त काही मोजक्या नेत्यांना अर्थशास्त्र कळत त्यात अरुण जेटलींचं नाव अग्रक्रमाने घेतलं जाई. अनेक वर्ष देशाचं अर्थमंत्रीपद त्यांनी समर्थपणे सांभाळलं. वाजपेयींच्या पासून नरेंद्र मोदींपर्यंत प्रत्येकाचे लाडके नेते म्हणून जेटलींना ओळखलं जातं.

सध्या ज्या सरकार विरोधी विद्यार्थी चळवळींवर टीका केल्या जातात अशाच एका चळवळीतून अरुण जेटली यांचं नेतृत्व घडलं होतं.

सत्तरच्या दशकातला काळ. देशाला स्वातंत्र्य मिळून पंचवीस वर्षे पूर्ण होत आली होती. सुरवातीच्या काळातला आदर्शवाद ओसरून गेला होता. नव्या स्वप्ने पाहिली होती ती स्वप्ने भंग होऊन भ्रष्टाचार,साठेबाजी, गुन्हेगारी याचा विळखा देशाला पडला होता. याचाच परिणाम बेरोजगारी वाढत चालली होती. 

त्यामुळे तरुणांच्यात असंतोष वाढला होता आणि यातूनच विद्यार्थी चळवळ आकार घेत होती. विशेषतः दिल्लीमध्ये. त्या काळात दिल्ली विद्यापीठात एक नाव गाजत होतं. 

ते नाव होतं अरुण जेटली यांचं.

दिल्लीचे सुप्रसिद्ध वकील महाराज किशन चंद जेटली यांचे ते चिरंजीव. फाळणीच्या वेळी लाहोर मधून दिल्लीला आलेलं हे निर्वासित कुटूंब पण आपल्या हुशारीच्या जोरावर वकिलीत जम बसवला. प्रचंड पैसे कमवला, दिल्लीच्या उच्चभ्रू वर्तुळाचे कायदासल्लागार अशी ओळख मिळाली. अरुण जेटली यांचं शिक्षण दिल्लीच्या प्रतिष्ठित सेंट झेव्हियर स्कुलमध्ये झालं. बीकॉम साठी त्यांनी श्रीराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

वडिलांप्रमाणे वकील व्हायचं त्यांचं स्वप्न होतं पण योगायोगाने त्यांचा राजकरणात प्रवेश झाला.

कॉलेजमध्ये अरुण जेटली यांची ओळख श्रीराम खन्ना यांच्याशी झाली. खन्ना हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करायचे. आरएसएसच्या विचारधारेवर चालणारी हि विद्यार्थी संघटना होती. मात्र अरुण जेटली हे टोकाचे हिंदुत्ववादी होते असं नाही. पण त्यांच्यात राजकीय महत्वाकांक्षा होती. वेगवेगळ्या राजकीय गटात त्यांचा संचार होता.

गुरुवारी संध्याकाळी भरणाऱ्या डाव्या चळवळीच्या विद्यार्थ्यांपासून ते काँग्रेसच्या एनएसयूआयपर्यंत सगळ्यांच्या ते संपर्कात होते.

पण श्रीराम खन्ना यांच्या मैत्रीमुळे त्यांनी एबीव्हीपी मध्ये प्रवेश घेतला. आपलं अमोघ वक्तृत्व, संघटनशक्ती यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ते प्रचंड फेमस बनले होते. त्याकाळी दिल्ली विद्यापीठात पहिल्यांदाच थेट निवडणूक झाल्या. श्रीराम खन्ना यांनी हि निवडणूक जिंकली. त्यांनी आपल्या सुप्रीम कौन्सिलमध्ये अरुण जेटली यांना निवडलं. खन्ना यांच्या मुळे खाली झालेल्या श्रीराम कॉलेजच्या जनरल सेक्रेटरी पदी देखील अरुण जेटली निवडले गेले.

अरुण जेटली यांची राजकीय कारकीर्द वेगाने सुरु झाली. त्यांची महत्वाकांक्षा देखील वाढू लागली. विद्यापीठाच्या वर्तुळात त्यांचा वावर सुरु झाला. श्रीराम कॉलेजनंतर जेटली यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कायदे डिपार्टमेंट मध्ये प्रवेश घेतला.

पुढल्या वर्षी म्हणजेच १९७३ साली जेव्हा दिल्ली विद्यापीठाच्या निवडणूक आल्या तेव्हा अरुण जेटली यांनी एबीव्हीपीकडे तिकीट मागितलं. त्यांचा विजय पक्का होता. पण संघाच्या नेतृत्वाचा काही कारणामुळे जेटलींवर विश्वास नव्हता. त्यांच्या ऐवजी विजय भाटिया यांना छात्रसंघाच्या अध्यक्षपदासाठी उभं करायचा विचार चालू होता.

अरुण जेटली प्रचंड नाराज झाले. काहीही झालं तर दिल्ली विद्यापीठाचा प्रेसिडेंट व्हायचं त्यांच्या मानत पक्के झालं होतं. हे प्रेसिडेंटपद म्हणजे भावी आमदार हे त्याही काळात फेमस गणित होतं.

त्यांच्या वडिलांची काँग्रेस वर्तुळात मैत्री होती. बहादूर सिंग आणि कुलबीर सिंग नावाचे दोन काँग्रेस नेते त्यांना अप्रोच झाले. एबीव्हीपी ने दवडलेली संधी साधायची असा काँग्रेसचा विचार होता. अरुण जेटली एनएसयूआय कडून निवडणूक लढायला तयार देखील झाले होते.

मात्र त्यांच्या काही मित्रांनी त्यांना रोखलं. यात होते प्रभू चावला. पुढे जाऊन आज तक इंडिया टुडे ग्रुपमध्ये संपादक, सिधी बात नावाच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे गाजलेलं होस्ट अशी ओळख बनलेले प्रभू चावला त्या काळात एबीव्हीपी मध्ये सक्रिय होते. अरुण जेटली यांच्याशी त्यांची शालेय जीवनापासून मैत्री होती.

जेटली यांनी काँग्रेसमध्ये जावं हे त्यांना पटलं नव्हतं. प्रभू चावला यांची एबीव्हीपीच्या वरिष्ठ वर्तुळात ओळख होती. त्यांनी राजकुमार भाटिया या मित्राच्या बरोबर तीन दिवस वरिष्ठ नेत्यांशी हुज्जत घातली. अगदी आरएसएसच्या नेतृत्वाला संपर्क केला आणि अरुण जेटली यांना तिकीट मिळवून दिलं.

अरुण जेटली यांनी दिल्ली विद्यापीठाच्या छात्रसंघाच्या अध्यक्षपदी सहज विजय मिळवला हे वेगळं सांगायला नको. हा विजय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.

लवकरच इंदिरा गांधींनी भारतात आणीबाणी लागू केली. एबीव्हीपीच्या वतीने जेटली यांनी त्या विरोधात मोठी आंदोलने केली. त्यांना अटक देखील झाली. एका कॉलेजचा विद्यार्थी थेट पंतप्रधान इंदिरा गांधींशी भिडतोय म्हणून देशभरात कौतुक झालं. याच काळात नरेंद्र मोदी यांच्या सारख्या कार्यकर्त्यांपासून ते थेट अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या सर्वोच्च नेत्याशी त्यांची मैत्री झाली.

स्वतः अरुण जेटली देखील खाजगीत मान्य करायचे, त्या दिवशी प्रभू चावला यांनी भांडून त्यांना तिकीट मिळवून दिलं नसतं तर त्यांचं भविष्य काँग्रेस मध्ये असतं. कदाचित तिथले आमदार मंत्री झाले असते. प्रभू चावला स्वतः राजकारणात राहिले नाहीत व पत्रकारितेत वळले मात्र त्यांनी भाजपला एक समर्थ नेता मिळवून दिला हे मात्र नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.