महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सव प्रबोधनकार ठाकरेंनी सुरू केला…
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे म्हणजे बंडखोर व्यक्तिमत्व. हिंदू धर्माचा त्यांना जाज्वल्य अभिमान तर होताच मात्र त्यात असलेले जातीभेद, अनिष्ठ रूढी परंपरा याबद्दल राग होता. हिंदू धर्माची सर्वसमावेशकता उच्चवर्णियांच्यामुळे नष्ट होत आहे यावरून त्यांनी जोरदार टीकाटिप्पणी केली, नव्या सुधारणा घडवून आणल्या.
१९२६ साली प्रबोधनकार ठाकरे पुण्याहून मुंबईला वास्तव्यास आले होते. दादर मध्ये होणाऱ्या गणेशोत्सवात त्यांनी भाग घेतला.
दादर म्हणजे मध्यमवर्गीय मराठी भाषिकांची मोठी संख्या असणारा भाग. इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष होते डॉ. जावळे. त्याकाळचे मोठे प्रस्थ. महापौरपदाच्या दिशेने त्यांची दमदार वाटचाल चालू होती. मात्र या सार्वजनिक गणपती मंडळाच्या कमिटीत, गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात ब्राम्हणेतर व्यक्तींना प्रवेश नव्हता.
सार्वजनिक गणेशोत्सव जर अखिल हिंदूंचा असेल तर त्यात सर्व जातीजमातीच्या लोकांना भाग घेता आला पाहिजे, इतकेच काय, पण अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जमातीतील व्यक्तींना देखील सार्वजनिक उत्सवातल्या गणेश मूर्तीचे पूजन स्वत: करण्याचा हक्क असला पाहिजे हा विचार त्याकाळच्या सुधारकी तरुणांमध्ये बळावला.
स्पृश्यास्पृश्य भेद नष्ट करून अखिल हिंदू जनांची एकजूट करण्यासाठी काही युवक मंडळे निघाली होती.
याचे कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होत होते. यामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचा देखील सहभाग होता. या युवक मंडळाच्या वतीने दादर सार्वजनिक गणपती मंडळाला पत्र लिहिण्यात आले व
गणपतीची पूजा दलित व्यक्तीच्या हातून व्हावी अशी इच्छा व्यक्त करण्यात आली.
या मंडळाचे जवळपास पाचशे तरुण दादरच्या सार्वजनिक मंडळाचे वर्गणी भरून सदस्य झाले होते. यावर्षीच्या कार्यक्रमात गोंधळ होणार हे ओळखून डॉ.जावळे यांनी इंग्रजांची पोलीस पार्टी बोलावून घेतली. टिळक पुलाच्या उत्सवाचा मंडप घातला होता. छबिलदास शाळेजवळ हे गोरे सार्जंट पोलीस डेरा टाकून बसले.
गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला. गणपतीची पूजा करण्यासाठी आलेल्या दलित तरुणांना मंडप प्रवेशास विरोध करण्यात आला.
डॉ. आंबेडकरांचे सहकारी राव बहाद्दूर सीताराम केशव बोले उर्फ सी.के. बोले या तरुणांचे नेतृत्व करत होते. त्यांना मंडपात गणेशोत्सव कमिटीतर्फे धक्काबुक्की करण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप केला. प्रबोधनकार ठाकरेंना निरोप गेला.
प्रबोधनकार ठाकरे फतकल स्वभावाचे होते. त्यांनी सरळ गर्जना केली,
“आज जर आमच्या अस्पृश्य हिंदू बांधवांना गणेश-पूजनाचा हक्क ३ वाजेपर्यंत देण्याचा शहाणपणा जावळे कमिटीने दाखविला नाही, तर मी स्वतः ही गणपतीची मूर्ती फोडून टाकीन.’’
परिस्थिती चिघळत आहे हे पाहिल्यावर डॉ. जावळे बोल्यांकडे धावत आले. डॉ.आंबेडकरांना बोलावून घेण्यात आले. या सर्व नेत्यांची चर्चा झाली व अखेर मध्यममार्ग काढण्यात आला. या नुसार गणपतीची शास्त्रोक्त पूजा ब्राम्हण पुजाऱ्याच्या हस्ते झाली आणि एक जेष्ठ दलित कार्यकर्ते मडके बुवा यांनी सर्वांसमक्ष लाल गुलाबाचा एक गुच्छ पुजाऱ्याच्या हाती दिला नि त्याने तो टाळ्यांच्या गजरात गणपतीला वाहिला.
हे सर्व यथासांग पार पडले मात्र प्रबोधनकार या घटनेमुळे खुश नव्हते.
त्यात दादरकरांनी अशी घटना घडू नये म्हणून पुन्हा सार्वजनिक गणेशोत्सव साजराच करायचा नाही असा टोकाचा निर्णय घेतला. खरोखर पुढची तीस वर्षे हा उत्सव साजराच झाला नाही आणि याचे खापर ठाकरेंच्या वर फोडण्यात आले.
दलितांना मूर्तिपूजा करता यावी, बहुजन समाजाला आकर्षक महोत्सव हवा होता की ज्यात अब्राह्मण शूद्रादी अस्पृश्यांनाही आपुलकीने नि मोकळ्या मनाने सहज भाग घेता यासाठी उपाययोजण्यासाठी रा. ब. बोल्यांच्या बंगल्यावर प्रबोधनकार ठाकरेंनी काही स्नेही मंडळींची बैठक बोलावली. यातून एक विचार पुढे आला.
प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या माझी जीवनगाथा या आत्मचरित्रात ही घटना लिहीली आहे.
महाराष्ट्राची मुख्य देवता श्री मायभवानी तिच्या दरबारात सगळ्यांना मुक्तदार. तिचा नवरात्र महोत्सव हाच वास्तविक महाराष्ट्राचा राष्ट्रीय महोत्सव. प्राचीन काळचा इतिहास सोडा, छत्रपती श्रीशिवरायापासून हा नवरात्रोत्सव सबंध महाराष्ट्रात घरोघरी नि गडोगडी थाटामाटाने साजरा होत असे.
पेशवाईच्या नि त्यांच्या गणेश दैवताच्या स्तोमामुळे, तो उत्सव मागे पडला व लो. टिळकांनी त्याला सार्वजनिक स्वरूप देऊन त्या स्तोमाचे पुनरुज्जीवनच केले असे प्रबोधनकार ठाकरे यांचे मत होते.
शिवरायांच्या काळच्या ऐतिहासिक परंपरेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सार्वजनिक नवरात्र महोत्सव साजरा करायचे प्रबोधनकार ठाकरेंनी ठरवले.
त्यांची सूचना सर्वमान्य होऊन त्याच वर्षी दादर मध्ये ‘लोकहितवादी संघ’ स्थापन केला आणि सन १९२६ च्या पूर्वी मुंबईत किंवा महाराष्ट्रात कोठेही प्रघात नसलेला
‘श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव’ साजरा करण्याचा पहिला मान दादरने मिळवला.
यापूर्वी बंगालमध्ये व गुजरात मध्ये नवरात्रोत्सव साजरा केला जात होता. महाराष्ट्रात अखिल हिंदू जनांना बंधुभावाने समाविष्ट होऊन सहभाग घेता येईल असा हा पहिलाच नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात आला. कुलाबा ते कल्याण आणि पालघरपर्यंतच्या मराठी जनतेने मोठ्या रकमांच्या देणग्या भराभर गोळा होऊ लागल्या. शिवाय नाना प्रकारच्या साहित्य सामुग्रीच्या आश्वासनांची अनेकांकडून खैरात झाली.
दादरच्या काळ्या मैदानावर ८० फूट लांब नि ६० फूट रुंद विशाल मंडप थाटला गेला.
घटस्थापनेचा विभाग शृंगारण्यासाठी मुंबईचे प्रख्यात तांब्या-पितळेच्या भांड्यांचे व्यापारी कै. बाबाजी अनाजी तारकर यांनी आपला एक प्रतिनिधीच मंडपात उभा ठेवला होता. शिवरायांचा ६ फूट लांब नि ५ फूट रुंदीचा रेशमी भगवा झेंडा उभा करण्यात आला. अगदी एल्फिन्स्टन रोडवरून देखील दिसेल अशा या मोठ्या झेंड्याचं दलित आमदार सोळंकी यांच्या हस्ते अनावरण झाले.
एका सिनेमा कंपनीने चित्रकार रविवर्माच्या कालीदेवी तांडवनृत्याचा एक मोठा कटआऊट पूर्वी तयार केलेला होता. तो आणून घटाच्या मागे भवानीची मूर्ती म्हणून उभा करण्यात आला. मंडपात ठेवण्यासाठी पुरुषभर उंचीच्या दोन लखलखीत समयाही आणण्यात आल्या.
घटस्थापनेचा मान देखील एका गरीब दलित दाम्पत्याला देण्यात आला.
प्रबोधनाचे नामवंत कविवर्य वसंत बिहार ऊर्फ जोशी यांनी जगदंबेची आरती रचली होती, तिच्या छापील प्रती वाटण्यात आल्या. आबालवृद्धांनी एकसुरात आरतीचे गायन केले. रावसाहेब बोले यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्रीचा समारंभ पार पडत होता.
संपूर्ण महाराष्ट्रात हि अभूतपूर्व घटना घडली होती. ठाकरे म्हणतात,
स्पृश्यास्पृश्य भेद कोणाच्या खिजगणतीतही उरला नाही. एकजात मऱ्हाठी माणूस एका जगदंबेचे कन्यापुत्र नात्याने सरमिसळ वावरत होते. रात्रीच्या कार्यक्रमातले वक्ते, गायक, कवी, शाहीर, प्रवचनकार, कीर्तनकार सगळे बामणेतर. भयाखळा मार्केटमध्ये भाजी विकणा-या सौ. यमुनाबाई घोडेकर या माळणीचे व्याख्यान जेव्हा जाहीर झाले. तेव्हा तर सर्वत्र अचंब्याची एक विलक्षण लाटच उसळली.
नवरात्रीची सांगता दसऱ्याच्या दिवशी मिरवणूक काढून करण्यात आली. सुरवातीला इंग्रज पोलीस परवानगी देत नव्हते. मात्र रावसाहेब बोले यांनी आपले वजन वापरून परवानगी आणली.
सबंध मुंबईतून लेजिमवाले, मलखांबवाले, भजनी फड, आपापले ताफे घेऊन हजर झाले.असली विराट मिरवणूक दादरमध्ये पूर्वी कधीच निघालेली नव्हती. तेथे रा. ब. बोल्यांच्या हस्ते सुवर्णपूजन झाले. सोने लुटले गेले. डॉ. आंबेडकरांचे थोडेसे भाषण झाले. नंतर मिरवणूक-जशी होती तशीच-परत वाजत गाजत टिळक पुलावरून वळसा घेऊन काळ्या मैदानावर आली. भवानीची मूर्ती स्थानापन्न केली. आरती झाली आणि प्रसाद वाटला.
प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरु केलेला हा सार्वजनिक नवरात्रीचा उत्सव फक्त दादरच नाही तर संपूर्ण मुंबई व पाठोपाठ संबंध महाराष्ट्रात फोफावला. गेल्या नव्वद वर्षात अनेक स्थित्यांतरे आली उत्सवाचे स्वरूपदेखील बदलले मात्र समाज, राष्ट्र एकसंध व्हावा आपल्या प्रथा परंपराचा जागर होण्याबरोबर दबलेल्या समाजबांधवांचे पुनरुथ्थान व्हावे म्हणून ठाकरेंनी केलेले प्रयत्न वाया नक्कीच गेले नाहीत.
संदर्भ- माझी जीवनगाथा लेखक प्रबोधनकार ठाकरे
हे ही वाच भिडू:
- गणबाई मोगरा गणाची जाळी : साखराबाईच्या गाण्याशिवाय नवरात्रात घट बसत नाही..
- हिंदू धर्माचे घनघोर पालन करण्यासाठी ज्युलिया रॉबर्ट्स नवरात्रीत घट बसवते, उपास देखील करते..
- आजही नवरात्र उत्सवामध्ये उगवत्या सूर्याची किरणे थेट या देवीच्या चरणावर पडतात