मनुस्मृति, पुराणे आणि देवळे या तीनच गोष्टींवर प्रत्येक भट जगत असतो : प्रबोधनकार ठाकरे

महाराष्ट्रातला एक मुद्दा जो संपूर्ण देशामध्ये अगदी वाऱ्यासारखा पसरला अन देशातलं सामाजिक वातावरणच ढवळून निघालं…

“मशिदीवरचे भोंगे अन हनुमान चालीसा”

राज ठाकरेंनी जी कट्टर हिंदुत्ववादाची शाल पांघरली आहे त्यावरून त्यांच्यावर टीका होतेय की, त्यांचे आजोबा म्हणजेच प्रबोधकार ठाकरे यांच्या हिंदुत्वाची शिकवण राज ठाकरेंनी घ्यावी. 

त्यावर राज ठाकरेंनी असं उत्तर दिलं आहे कि, 

‘माझे आजोबा प्रबोधकार ठाकरे हे कडवट हिंदुत्ववादी होते. ते कर्मकांडाच्या विरोधात होते मात्र ते हिंदुत्ववादाच्या विरोधात कधीच नव्हते”. 

राज ठाकरेंनी ‘बहुचर्चित’ औरंगाबादच्या सभेला निघण्याआधी १००-१५० ब्राम्हण पुरोहितांचा आशीर्वाद घेतला आणि औरंगाबादला प्रस्थान केलं. 

जरी राज ठाकरे म्हणतायेत की, ते प्रबोधकार ठाकरे यांच्या हिंदुत्वाचंच अनुकरण करतायेत तरी त्यांच्या आजोबांनी ब्राम्हणवादी व्यवस्थेवर काय लिहिलंय ? इतकंच नाही तर त्यांनी हिंदुत्वादाबद्दल काय लिहून ठेवलंय ? त्यांनी धर्माच्या नावाखाली होणारा काळाबाजार असो वा हिंदू संस्कृती, देव-देवळांवर काय लिहिलं आहे ते पाहणं महत्वाचं आहे..

प्रबोधनकारांची ही महत्वाची १० वाक्ये 

टीप : यातील अनेक मतं स्फोटक आहेत, ती वाचल्यावर त्यावर टीका होऊ शकते पण प्रबोधनकारांच्या या वाक्यांकडे कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही. 

हिंदू संस्कृती आणि समाजाबाबत ते लिहितात…..

१) “आजचा हिंदु समाज ‘समाज’ या नावाला कुपात्र ठरलेला आहे. हिंदुधर्म हे एक भले मोठे भटी गौडबंगाल आणि हिंदु संस्कृति म्हणजे एक बिन बुडाचे पिचके गाडगे यापेक्षा त्यांत विशेष असे काहीच नाही. 

“पुष्कळ बावळटांना अजून वाटते कीं ‘हिंदू समाज’ अजून जिवंत आहे”. 

२) “सभोवार परिस्थितीचा जो नंगा नाच चालूं आहे. आत्मस्तोमांच्या टिकावासाठी भिक्षुकशाहीची जी कारस्थाने गुप्तपणाने सुरू आहेत, आणि दिव्यावरच्या पतंगाप्रमाणें भटेतर लोक या कारस्थानात जे फटाफट चिरडले जात आहेत, त्यावरून हिंदु समाजाचें भविष्य फारसे उज्वल नाहीं, असे स्पष्ट नमूद करायला या लेखणींस फार कष्ट होत आहेत. 

हिंदू धर्मातल्या ब्राम्हणी जातवर्चस्ववादी मानसिकतेवर प्रबोधनकार ठाकरे लिहितात…  

३) “आजचा हा धर्म हा हिंदुधर्मच नाही. प्रचलित भिक्षुकशाही धर्म हा बुळ्याबावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारं एक पाजी थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेतर दुनिया माणूस असून पशूपेक्षांही पशू बनली आहे. 

४) त्यामुळे आमच्या सर्वांगीण हलाकीचें मूळ भटांच्या पोटांत आहे. त्यांच्या गोडबोल्या ओठांत नव्हे. भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडांत देवळांचा नंबर पहिला लागतो. देवळांची उत्पत्ति ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदुधर्माची ही अगदी अलिकडची कमाई आहे 

आपमतलबी भिक्षुकशाहीने नवमतवादाच्या प्रत्येक लहान मोठ्या चळवळीला ठार मारण्याचा प्रयत्न एकसारखा सुरूच ठेविला होता. ब्राह्मणांची भिक्षुकशाही एवढ्याचसाठी भूतलावर अवतरलेली आहे.

सोबतच हिंदू देव-देवतांच्या बाबतीत प्रबोधनकार लिहितात…

५) “बौद्ध धर्म हिंदुस्थानांतून परागंदा होईपर्यंत म्हणजे इसवी सनाचा उदय होईपर्यंत तरी भारतीय इतिहासांत देवळांचा कोठेच काही सुगावा लागत नाही. मग तोपर्यंत आमचे हे हिंदु देव थंडी वाऱ्यात कुडकुडत आणि उन्हातान्हांत धडपडत पडले तरी कोठे होते? विद्वान संशोधकांच्या मतें आर्यांच्या ऋग्वेदकाळाची गणना जास्तींत जास्त इसवी सनापूर्वी ७००० वर्षे धरली, तर इतकी वर्षे हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठे?

६) आजचा देवांचा देवळांतला थाट पाहिला, तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचाईत पण या देवांना सकाळची न्याहरी, दुपारी पंचपक्क्वानांचे भरगच्च ताट, पुन्हा तीन प्रहरी टिफीन आणि रात्री जेवण..! याशिवाय दिवस सुना जायचा नाहीं.

याशिवाय काकडआरत्या, माकड आरत्या, धूपार्त्या, शेजार्त्या, आहेतच. कोट्यवधी गोरगरीब हिंदूंना, विशेषतः धर्मश्रद्धाळु हतभागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यांत गोणपाटाचें ठिगळहि मिळण्याची पंचाईत; पण आमच्या देवांना छपरीपलंग, मच्छरदाणी, गाद्यागिरद्यांशिवाय भागायचेंच नाहीं. 

७) शंकाराचार्यांनीं ब्राह्मणी धर्मांच्या पुरस्कारासाठी बौद्ध धर्माचा नायनाट केला. त्यांतल्या सुडाची नांगी इतकी भयंकर जहरी व खुनशी होती की, चालू घटकेपर्यंत बौद्धधर्माचा दिवसाढवळ्या अपमान व उपहास करीत आहे.

हिंदुजनांच्या मनांत बौद्धद्वैषाचें पेरलेले भिक्षुकशाही विष आज कसे थैमान घालीत असते, हे वाटेल त्या बौद्ध लेण्यांत पाहून घ्यावे.  वास्तविक या विहारात किंवा लेण्यात महात्मा बुद्धाचे बौद्ध भिक्षु ‘अहिंसा परमोधर्म’ चें तत्त्वचिंतन आणि भूतदया क्षमा, शांति या सात्विक गुणांचा परिपोष व प्रसार करीत असत. शंकराचार्यांचा भिक्षुकी हात या विहारांवरून फिरतांच त्यांची खाडकन स्मशानें बनली. 

हिंदू पुराणांवर देखील प्रबोधनकारांनी थेटच लिहिलंय…

८) “अठरा पुराणांचीहि भटी-पैदास झालेली असल्यामुळे, हिंदु समाजातल्या व्यक्तीमात्राची नातीगोती जरी जातिभेदाच्या घरटांत वस्त्रगाळ भरडली गेली होती. तरी देवांच्या आणि देवीच्या गोतावळ्याची जाळी सताड मोकाट सुटलेली होती. मनुस्मृति पुराणें आणि देवळे असा तीन पेडी फांस हिंदुसमाजावर लटकावून भिक्षुकशाही ब्राह्मणांनी आपल्या जातीच्या सवत्या सुभ्याचे सोवळें वर्चस्व आजवर टिकवून धरलेले आहे.

या मर्मावर कोणी घाव घालतांच जात सुधारक दुर्धारक भटें सापांसारखी कां फुसफुसतात ?

याचे अजून बऱ्याच बावळट शहाण्यांना आणि भोळसट भटेतरांना मोठें आश्चर्य वाटते. मनुस्मृति, पुराणे आणि देवळे या तीनच गोष्टींवर आज प्रत्येक भट जगत असतो. पण या तीनच गोष्टी म्हणजे अखिल भटेतर दुनियेच्या उरावर तीन प्राणघातक धोंडी आहेत. या तीन गोष्टी नष्ट करा. जाळून पोळून खाक करा कीं भिक्षुकशाही रसातळाला गेलीच!

९) “देवळांचा धर्म म्हणजे भटांच्या पोटापाण्याचें गुप्त मर्म आहे. या मर्माचें वर्म अफाट भटेतरांना कधींच उमगू नये, म्हणून भटांनी अठरा पुराणांची पैदास करून ठेवलेली आहे. गीता व उपनिषदादि आचारविचार-क्रांतिकारक आणि सत्यशोधन ग्रंथ कितीहि असले तरी देवळांवर देह जगविणा-या या भूदेवांचा विशेष मारा या पुराणांवरच असतो.

पुराणांचा पाचकळपणा प्रगट करण्याचे येथे प्रयोजन नाही. पुराणांच्या पचनीं पडलेला प्रत्येक प्राणी ईश्वरविषयक कल्पनेत इतका पागल बनतो की, दगड्या देवाच्या पायाऐवजीं भटाच्याच पायावर टाळकीं घासतो आणि त्याचे पाय धुतलेलें पाणी ‘पवित्र तीर्थ’ म्हणून घटाघटा पितो”.

देवळांत कथा, कीर्तने, पुराणें, प्रवचनें होतात पण. सर्वांची झाप छिनाल भागवतावर आणि पाचकळ पुराणांवर, या पुराणांच्या श्रवण मनन निदिध्यासाने हिंदु स्त्रीपुरुषांच्या मनांवर कसकसले घाणेरडे व विकृत परिणाम आजपर्यंत झाले.

१०) देवळांचे माहात्म्य पुराणांनीं वाढविले `पुराणें म्हणजे शिमगा’ असे पुष्कळ विचारवंतांचे म्हणणें आहे. पुराणे म्हणजे शौचकूप, असे आमचे मत आहे. पुराणांत कांहीं गोष्टी चांगल्या आहेंत, असें काही भेदरट सुधारकहि म्हणतात. असतील शौचकूपांत पडलेल्या मोहरा. पुतळ्या ज्यांना उचलायच्या असतील त्यांनी खुशाल उचलाव्या. आम्ही त्यांचा हात धरूं इच्छित नाहीं. पुराणें म्हणजे शौचकूप ठरल्यावर त्यांच्या जिवावर जगणा-या देवळांत काय काय पातकांच्या गिरण्या सुरूं असतात.

‘देवळांचा देव आणि धर्माची देवळे’ या पुस्तकात प्रबोधनकारांची स्पष्ट छाप असणारं साहित्य त्यातली काही महत्वाचे आणि विचार करायला भाग पाडणारे विचार आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. ज्यातून त्यांच्या प्रखर विचारांची जाणीव होते.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.