गल्लीतली ब्राह्मण कुटूंब वाचली ती प्रबोधनकारांच्या एका इशाऱ्याने…!!!

गांधी हत्येपुर्वीचा काळ. या काळात प्रबोधनकार ठाकरे वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये लिहायचे. अशातलच एक साप्ताहिक होतं अग्रणी. ते पुण्यातून प्रसिद्ध व्हायचं. एकदिवशी प्रबोधनकार ठाकरेंना अग्रणी साप्ताहिकाच्या संपादकांच पत्र आलं. तूम्ही आमच्या वर्तमानपत्रासाठी लिहाल का? 

प्रबोधनकारांची कोणत्याही वर्तमानपत्रासाठी लिहताना एक अट असायची. माझ्या बुद्धीला पटेल ते मी लिहणार. जे सत्य असेल ते मांडणार मग कोणाच्या बापाला भिणार नाही. कोणत्याही पद्धतीने शब्दांची अदलाबदल करुन लेख छापायचा नाही, जे दिलं आहे ते आणि तसच छापायचं. हे मंजूर असेल तर हो म्हणा अन्यथा तुमच्या वर्तमानपत्रासाठी लिहणार नाही.. 

अग्रणीच्या संपादकांना काहीच अडचण नव्हती. त्यांनी होकार कळवला आणि प्रबोधनकार  ठाकरे अग्रणीमध्ये लिहू लागले. लिखाण चालू झालं आणि एक दिवशी अग्रणीच्या संपादकांच पत्र आलं. या पत्रात लिहलं होतं की, 

तूम्ही गांधीच्या अगोदर महात्मा लिहता. ते लिहीत जावू नका. वाटलं तर मिस्टर गांधी लिहा पण महात्मा हा उल्लेख नको.. 

यावर प्रबोधनकारांनी खरमरीत पत्र पाठवून अग्रणीच्या संपादकांला सांगितलं की, 

माझ्या लेखातला एकही शब्द इकडचा तिकडे झालेला मला खपणार नाही. माझे विचार तुम्हाला पटत नसतील तर मी लिहणार नाही. 

त्यानंतर प्रबोधनकरांनी अग्रणीमध्ये लिहणं बंदच केलं… 

या नंतर मात्र काही गोष्टी खूप नाट्यमयरित्या बदलल्या.. याबद्दल खुद्द श्रीकांत ठाकरेंनी लिहून ठेवलं आहे. श्रीकांत ठाकरे लिहतात, 

त्या काळात आम्ही शिवाजी पार्क ते किंग्स सर्कल येथे रोज चालत जायचो. कधीही बस वापरायचो नाही. असेच एकदा आम्ही चालत गेलो होतो तेव्हा आमचा एक मित्र आम्हाला शोधत धापा टाकत आला. तो आम्हाला म्हणाला, 

महात्माजींवर गोळ्या झाडून त्यांचा खून झाला.. 

पहातो तर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. ट्राम आणि बसेस डेपोमध्ये जात होत्या. आम्ही लगबगीने घरी आलो. मी घरात शिरलो तर दादा ( प्रबोधनकार) रेडीओवर बातमी ऐकत होते. त्या दिवशी रात्रभर रेडीओ चालू होता पण खून कोणी केला याची माहिती मिळत नव्हती.. सकाळचे वर्तमानपत्र वाचूनच खून कोणी केला हे समजणार होतं. 

सकाळी ६ वाजता पेपर आले. मी पेपर घेतला आणि खून कोणी केला ते वाचू लागलो..

ते नाव होतं अग्रणीचा संपादक नथुराम गोडसे… 

दूसऱ्या दिवशी दंगली पेटू लागल्या. ते लोण आमच्या घरापर्यन्त आलं. पण जमावासमोर एकटे प्रबोधनकार जावून हात आडवे घालून उभा राहिले. आणि जमावाला म्हणाले कुठे जाताय..? 

अरे इथे ठाकरे असताना गल्लीत ब्राह्मण राहील का? 

हे उत्तर ऐकल्यानंतर जमाव आल्या पावली निघून गेला. प्रबोधनकारांनी गनिमी कावा करून गल्लीतल्या ब्राह्मण कुटूंबाना वाचवलं… 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.