गडचिरोलीची प्राजक्ता मधमाशी पालन करून वर्षाला लाखो रुपये कमवतिये…

“डोक्यातलं हे खूळ जास्त दिवस टिकणार नाही. मधमाशी पालन करणं सोपं काम नाही. मानवी वस्ती पासून लांब राहावं लागतं. ती एक महिला आहे तिला असं जमणार आहे का? इथं आदिवासी आपल्या पारंपरिक पद्धतीने  मध गोळा करत आहेत. ६ महिने करेल आणि येईल नाद सोडून” असे टोले तिला अनेकजण मारत.

पण त्या तरुणीने ठरविलं होतं. काहीही करून हाती घेतलेलं काम पूर्ण करून दाखवायचं. झालंही तसंच. पहिल्या प्रयत्नातच ३५० किलो मध गोळा करून आपण हार मानणाऱ्यातील  नसल्याचं तिने दाखवून दिलं. आता या तरुणीने स्वतःचा मधाचा ब्रँड तयार केला असून महाराष्ट्र भर ओळख निर्माण केली.

ही गोष्ट आहे नक्षलग्रस्त भागातील गडचिरोलीच्या प्राजक्ता आदमनेची.

प्राजक्ताच्या वडिलांचा बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय आहे. तर आई शिक्षिका. घरून व्यवसायाची थोडी पार्श्वभूमी होतीच. प्राथमिक शिक्षणानंतर तिने नागपूर येथून डिफार्म पूर्ण केलं. डिग्रीनंतर पुण्यात येऊन एमबीए पूर्ण केलं. त्यानंतर काही काळ नोकरी सुद्धा केली. मात्र प्राजक्तानं आधीच ठरविलं होतं की, जास्त काळ नोकरी करायची नाही. परत आपल्या मूळगावी जाऊन नवीन काही तरी करावं, असा विचार तिच्या डोक्यात होताच. 

तिला गडचिरोलीतील असणाऱ्या वन वैभवाची माहिती होती. त्या भागात मधाचं संकलन हे पारंपरिक पद्धतीने करण्यात येतं येवढंच माहित होतं. तिने कधी मधमाशी पालनाबाबत ऐकलं पण नव्हतं आणि तो व्यवसाय कसा असतो हे माहित सुद्धा नव्हते. मात्र यात आपण सुरुवात तर करून पाहूया, असं तिला वाटलं.

प्राजक्ताला या व्यवसायाची सुरुवात कुठून करायची, कशी करायची याबद्दल काहीही माहिती नव्हतं. त्यासाठी लागणारे पैसे पण नव्हते. मात्र, नवीन काही तरी करण्याची जिद्द तिच्या मनात होती. इकडून तिकडून माहिती काढल्यानंतर प्राजक्ताला कळालं की, राष्ट्रीय मधमाशी मंडळाच्या वतीने मधमाशी पालनासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येतं.

प्राजक्ताने मधमाशी पालनाचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी सोडत गडचिरोली गाठली. गडचिरोलीत पारंपरिक पद्धतीने मध संकलन करण्यात येत होतं.  मात्र, त्याची विशेष अशी ओळख नव्हती. प्राजक्ताने ठरवलं की, रत्नागिरीचा हापूस, नागपूरची संत्री अशी ओळख त्या-त्या शहराला मिळाली आहे. गडचिरोली सुद्धा मधाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे.

केवळ मध गोळा करायचं आणि ते विकायचं असं करून चालणार नाही. मधाचं योग्य ब्रॅण्डिंग करायला हवं. गडचिरोलीत किती मध गोळा होतं, ते कोण करतं याचा सगळा अभ्यास केल्यानंतर प्राजक्ताच्या एक लक्षात आलं की, येथील आदिवासी हे मध संकलन पारंपरिक आणि हिंसक पद्धतीने करतात. मध गोळा केल्यानंतर ते पोळं जाळतात आणि त्यांचा अधिवासच संपवून टाकतात.

त्यामुळे लाखो मधमाशांच्या वसाहती नष्ट होत आहेत. आपल्या भागात केवळ मध गोळा करणं एवढंच काम चालतं. यात बदल करणं गरजेचं आहे.

सगळ्या संकटावर मात करून त्यांनी पहिल्या प्रयत्नात ३५० किलो मध गोळा केलं.

हे सगळं अभ्यासल्यानंतर प्राजक्ताच्या लक्षात आलं की, आधुनिक पद्धतीने मधमाशा पालन केलं तर त्यातून चांगल्या प्रमाणात पैसे मिळू शकतात. त्यांनी एका संस्थेकडून ५० पेट्या विकत घेतल्या. खरी अडचण येथून सुरु झाली. गडचिरोलीत अशा प्रकारे पेट्याद्वारे  मधमाशी पालन केलं जात नव्हतं.

मधमाशी व्यवसायासाठी लागणाऱ्या वस्तू, औषधं काहीच मिळत नव्हतं. त्यांना हे सगळं बाहेरच्या राज्यातून आणावं लागत. स्थानिक मजूर मिळाले नाही. बाहेर राज्यातून मजूर आणावं लागलं.

या सगळ्या गोष्टींवर यश मिळवून महिला हंगामात ३५० किलो मधाचं उत्पन्न मिळालं. पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्याने प्राजक्ताच्या कुटुंबियांना यानंतर खात्री पटली की मुलगी योग्य ट्रॅकवर आहे.

गडचिरोलीत एक महिला वेगळ्या पद्धतीने मध गोळा करते असं समजल्यावर लोक भेटायला येऊ लागले होते. अनेक कृषी अधिकारी सुद्धा होते. कृषी प्रदर्शना दरम्यान हे मध विकायला ठेवलं होतं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर मधाच्या व्यवसायासाठी  लागणाऱ्या सगळ्या परवानग्या त्यांनी घेतल्या.

कस्तुरी हनी नावानं ब्रँडची ओळख

मधाचे जांभूळ, सूर्यफूल, लिची आदी असे नवीन फ्लेवर तयार केले. हे सर्व मध ‘कस्तुरी हनी’ नावाने बाजारात आणले. गडचिरोली भागातून अशा प्रकारे कोणीच बाजारात आणलं नव्हतं. त्यामुळे प्राजक्ताची ओळख ‘मधकन्या’ अशी झाली आहे.

प्राजक्ता केवळ मध गोळा करून थांबली नाही तर मधमाशी पालन करताना त्यासाठी लागणारे साहित्य आणि उपकरण विकायला सुरुवात केली. खादी ग्राम उद्योगाच्या मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्त झाल्या. त्या माध्यमातून शेतकरी, बेरोजगार तरुण, महिलांना  प्रशिक्षण देण्यात देण्याचे काम प्राजक्ता करते.

जिल्ह्यातील खादी ग्रामउद्योगाचं मधमाशा संदर्भाचं एक टेंडर प्राजक्ताला मिळालं. हे काम त्यांच्या व्यवसायासाठी टर्निंग पॉंईंट ठरलं. जोखिमेचा व्यवसाय असल्याने ते करू नये असं तिला अनेकांना सांगितलं होतं. मात्र तिने ठरविलं होतं मधमाशी पालन करून आपली वेगळी ओळख निर्माण करायची. तिच्या कामाबाबद्दल २०२१ मध्ये विदर्भरत्न पुरस्कारही देण्यात आला.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.