या विशेष गोष्टीमुळेच प्रकाश आमटे यांना वाघ, बिबट्या, अस्वल पाळण्याचा अधिकार आहे

शून्यातून विश्व उभं करणं म्हणजे काय हे आमटे परिवाराकडून शिकावं. बाबा आमटेंनी कुष्ठरोगींसाठी आनंदवन निर्माण केलं. तर त्यांचा मुलगा प्रकाश आमटे यांनी अगदी कोणतीही साधन सामग्री नसताना झाडा झुडपांच्या घनगर्द जंगलात हेमलकसा उभारलं.

त्यांच्या कार्याचं वर्णन एका वाक्यात जरी केलं असलं तरीही शब्दात सामावू शकणार नाही इतकं अफाट कर्तृत्व प्रकाश आमटेंचं आहे. आज हेमलकसा भागात प्रकाश आमटे यांनी आदिवासींसाठी शाळा उभारली आहे. आदिवासींना ते औषधोपचार करून त्यांना निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. 

हेमलकसा येथे प्रकाश आमटे यांनी करून ठेवलेलं कार्य खूप मोठं आहे. विविध प्रकल्प ते इथे राबवतात. पण त्यांनी निर्माण केलेलं प्राण्यांचं अनाथालय हे हेमलकसा मध्ये असलेलं एक वैशिष्टयपूर्ण काम.

आदिवासींवर उपचार करता करता नकळत सुरू झालेलं हे अनाथालय आज विस्तारलं आहे.

इथे अनेक जंगली प्राणी गुण्या गोविंदाने राहतात. पण एकवेळ अशी आली होती, की वनाधिकारी येथील प्राण्यांवर जप्ती आणणार होते.

नेमकं ते प्रकरण काय झालं होतं की प्रकाश आमटे या प्रकरणामुळे पद्मश्री हा सर्वोच्च बहुमान परत करायला जात होते. 

या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी प्राण्यांचं हे अनाथालय सुरू कसं झालं हे जाणून घेऊ. एरवी रस्त्यावरचा कुत्रा भुंकला तरीही भीतीने गाळण उडते. पण प्रकाश आमटेंच्या या अनाथालयात आज अनेक वन्य प्राणी एकत्र राहत आहेत.

एकत्र हा शब्द इथे महत्वाचा कारण

वाघ, कुत्रा, मांजर, अस्वल हे सर्व प्राणी इथे एकत्र बागडत असतात. खेळत असतात. एरवी टीव्ही वर आपण वाघाला अशा प्राण्यांची शिकार करताना बघतो. पण इथे वाघाची जात नरभक्षक असली तरी तो कुणाला इजा पोहचवत नाही. 

या अनाथालयाची सुरुवात कशी झाली ?

अगदी दुर्गम अशा हेमालकसा भागात आदिवासींच्या आरोग्यासाठी काम करण्याचं व्रत डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांनी स्वीकारलं. अगदी शुन्यापासून सुरुवात करायची होती. सुरुवातीला आदिवासी माणसं उपचार करून घेण्यास घाबरायचे.

पण हळूहळू त्यांना ही दोन डॉक्टर त्यांच्यातलीच एक माणसं आहेत यावर विश्वास बसला, आणि ते प्रकाश आणि मंदाकिनी यांच्याकडे उपचारासाठी येऊ लागले. 

एके दिवशी प्रकाश आमटे जंगलातून जात असताना त्यांना आदिवासी माणसं माकडाची शिकार करून त्या माकडाला घेऊन जाताना दिसले. त्या मेलेल्या माकडाच्या मादीला बिलगून माकडाचं जिवंत पिल्लू दूध पीत होतं.

प्रकाश आमटे यांनी आदिवासींना ते माकडाचं पिल्लू देण्याची विनंती केली. परंतु आदिवासींनी पिल्लू देण्यास नकार दिला. यामागचं कारण असं, त्यांची मुलं घरात उपाशी होती. त्यामुळे आदिवासी ते माकड आणि त्यांच्या पिल्लाला खाणार होते. प्रकाश आमटे यांनी आदिवासींच्या भावना ओळखल्या. त्यांनी आदिवासींना खायला तांदूळ दिले. आणि त्याच्या बदल्यात आदिवासींनी ते छोटं पिल्लू प्रकाश आमटेंना दिलं.

या माकडाच्या छोट्या पिल्लापासून प्रकाश आमटे यांच्या अनाथालयाची १९७३ साली खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

हळूहळू प्राण्याची संख्या वाढत गेली. अस्वल, बिबट्या, कुत्रे, हरणं असा प्राण्यांचा मोठा गोतावळा आमटे कुटुंबाचा एक अविभाज्य भाग झाला. प्रकाश आमटे यांचा कार्याचा २००२ साली भारत सरकारने पद्मश्री देऊन सन्मान केला. 

आपली व्यवस्था अशी आहे की, चांगल्या कामांना आडकाठी करायला लगेच माणसं येतात. प्रकाश आमटे जे प्राण्यांचं अनाथालय चालवत आहेत ते बेकायदेशीर आहे, अशी नोटीस वन खात्याकडून प्रकाश आमटेंना मिळाली.

जवळपास २० वर्षाहून अधिक काळ प्रकाश आमटे अनाथालयात प्राण्यांचा सांभाळ करत होते. त्यामुळे या नोटीस मुळे त्यांना काहीसा धक्का बसला. त्यावेळी गोगटे नावाचे वनाधिकारी होते. त्यांच्या मते,

“प्रकाश आमटे करत असलेला प्राण्यांचा सांभाळ बेकायदेशीर आहे. अनाथालय बंद करा. अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल.” 

प्रकाश आमटे यांनी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या सर्व प्राण्यांचं भविष्य टांगणीवर होतं. या संपूर्ण प्रकरणात असलेली विसंगती अशी होती की, प्रकाश आमटेंना जो पद्मश्री पुरस्कार मिळाला होता, त्यामध्ये प्रकाश आमटे यांच्या अनाथालयाची आणि प्राणीप्रेमाची प्रशंसा केली होती.

आज तेच अनाथालय बेकायदेशीर ठरवून सरकार कारवाई करायला निघालं होतं. या सर्व प्रकरणामुळे प्रकाश आमटे यांनी पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला.

सर्व वर्तमानपत्रांनी या प्रकरणाची दखल घेतली. यामुळे हा प्रश्न दिल्लीतील मंत्रिमंडळात गेला. याचा परिणाम असा झाला.. प्रकाश आमटे यांच्या अनाथालयावर जी कारवाई होणार होती, ती स्थगित करण्यात आली.

अनाथालय सरकारच्या ताब्यात देण्यात प्रकाश आमटे यांना कोणतीही अडचण नव्हती. पण ज्या मायेने आणि प्रेमाने त्यांनी सर्व प्राण्यांचा सांभाळ केला होता ते प्राणी सरकारच्या ताब्यात गेल्यावर जगू शकणार नाहीत, याची त्यांना खात्री होती.

सुरुवातीला स्वखर्चातून ते या प्रत्येक प्राण्याचा खर्च भागवत होते. त्यांनी कोणाकडे मदत मागितली नाही. एवढं सर्व करत असूनही सरकारकडून शुल्लक कारणासाठी होणारा विरोध त्यांना अस्वस्थ करून गेला.

आणि म्हणून पद्मश्री परत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. 

तुम्ही हेमलकसा येथील या प्राण्यांच्या अनाथालयाचे व्हीडिओ पहाल तर तुम्हाला लक्षात येईल, येथे असणारा प्रत्येक प्राणी हा आनंदात बागडताना दिसतो. प्राण्यांची स्वच्छता, खाणं- पिणं वेळच्या वेळी करत असल्याने हे सर्व प्राणी कायम उत्साही आणि फ्रेश दिसतात.

आज हेमलकसा भागात सुधारणा झाली असली तरीही प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी येथे खऱ्या अर्थाने हाती काही नसताना एक वेगळी दुनिया निर्माण केली आहे. म्हणूनच प्रकाश आमटे हे महाराष्ट्रातले एकमेव व्यक्ती वाघ देखील पाळू शकतात अस म्हणावं लागतं. कारण खऱ्या अर्थाने ते जंगली जनावर पाळत नाहीत तर वडीलकीच्या नात्याने त्यांचा सांभाळ करतात. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.