जावडेकरांच्या मंत्रिपदाचा फायदा ना पुणेकरांना झाला ना पुण्याच्या भाजपला…

बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मोदींनी विक्रमी ३४ मंत्र्यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिलं. कित्येक अनपेक्षित चेहरे यात झळकले. मात्र, त्यापेक्षाही जास्त चर्चा झाली ती मंत्रिमंडळातल्या राजीनाम्यांची. रविशंकर प्रसाद, हर्ष वर्धन, सदानंद गौडा असे दिग्गज नेते गेले. 

मात्र सोशल मीडियावर सगळ्यात जास्त बोललं गेलं ते मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या राजीनाम्याबद्दल. अनेक मिम्स बनले, ट्विटरवर ट्रेंड बनला.

प्रकाश जावडेकर यांच्या रूपाने पुण्याला सलग ७ वर्ष केंद्रीय मंत्री पद मिळालं होतं. मात्र त्यांचं मंत्री पद मिळाल्याने कोणी आनंद साजरा केला नव्हता आणि मंत्रिपद गेल्यावर कोणाला दुखःही झाले नाही. 

आजच्या जमान्यात पहायाला गेले तर एक साध्या नगरसेवकाच्या मागे पाच-पन्नास कार्यकर्ते मागे पुढे फिरत असतात. मात्र  स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री असा ५० वर्षांचा दीर्घ प्रवास करणारे प्रकाश जावडेकर मात्र कधीच मास नेता बनू शकले नाही. मात्र तरीही पक्षात त्यांना महत्वाचे स्थान असल्याचं पाहायला मिळते.

त्यामुळे चर्चा होणे साहजिकच आहे. बोल भिडूने प्रकाश जावडेकर यांच्या कार्यकिर्दीचा घेतलेला हा आढावा. 

प्रकाश जावडेकर यांची जडणघडण

प्रकाश जावडेकरांचा जन्म पुण्यातील. वडील केसरीत पत्रकार तर होतेच. त्याचबरोबर हिंदू महासभेचे काम सुद्धा करत होते. त्यामुळे प्रकाश जावडेकर यांच्यावर लहानपणापासून हिदुत्वाचे संस्कार होते. त्यांनी पुणे विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी त्यांचा एबीव्हीपी सोबत संबंध आला.

१९७१ ते १९८१ या काळात प्रकाश जावडेकर हे  बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीला होते. बँकेत असतांना सुद्धा ते एबीव्हीपी मध्ये सक्रीय होते. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबधित इतर संस्थाशी जोडून घेतले होते.

एबीव्हीपी काम करत असतांना प्रकाश जावडेकर यांची ओळख तरुण भारतचे पत्रकार आणि संघाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते  प्रमोद महाजन यांच्याशी ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर मग मैत्रीत झाले होते.

हळूहळू जावडेकर संघाच्या जवळ जात होते. प्रमोद महाजन यांना वाटायचे की, प्रकाश जावडेकर हे मास नेता नसले तरीही त्यांच्यात मॅनेजमेंट स्कील जबरदस्त आहे. त्यामुळे प्रमोद महाजन यांनी प्रकाश जावडेकरांनी नोकरी सोडून संघाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम पाहावे असा हट्ट धरला होता. 

७० च्या दशकात जनसंघाचे काम करणारे असं जास्त कोणी नव्हते. त्याकाळात जनसंघाला कार्यकर्ता मिळविण्यासाठी मोठे कष्ट करावे लागायचे. प्रमोद महाजन यांनी शेवटी प्रकाश जावडेकर यांना जनसंघात आणले. प्रमोद महाजन यांनी जावडेकर यांच्याकडील मॅनेजमेंट स्कील पाहूनच  पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर जावडेकर यांनी स्वतःला यात झोकून घेतले होते.

खरं तर जावडेकरांचे वडील केशव जावडेकर हे केसरीत पत्रकार होते. त्याच बरोबर ते हिंदूमहासभेचे काम सुद्धा करत होते. त्यामुळे घरात लहानपणापासून हिंदुत्वाच वातावण होते. प्रकाश जावडेकर हे पुणे विद्यापीठात शिकत असतांनाच एबीव्हीपीचे सदस्य झाले होते. 

मात्र त्याकाळी जनसंघाचे आणि हिंदू महासभेचे वाकडे होते. त्यांचे कार्यकर्ते एकमेकाकडे पाहत सुद्धा नव्हते. त्यामुळे प्रकाश जावडेकर यांच्या वडिलांना वाटायचे की, आपल्या मुलाने जनसंघाचे काम करू नये.

यावरून दोघांमध्ये वाद सुद्धा झाला होता. मात्र प्रकाश जावडेकरांनी आपला निर्णय पक्का केला होता. घर सोडेल पण पक्ष कार्य सोडणार नाही असा निश्चययच त्यांनी केला होता. त्यानंतर प्रकाश जावडेकरांनी मागे कधीच पहिले नाही.

एकीकडे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे सारखे प्रचंड जनाधार असलेले नेते भाजपने पाहिले. साधारण याच काळात एकला चलो रे नारा देत प्रकाश जावडेकर एक-एक करत पद मिळवत होते.

१९८० मध्ये जनसंघ भाजप मध्ये विलीन करण्यात आला.

१९८४ ते १९९० दरम्यान जावडेकर हे भारतीय जनता युवा मोर्चात राष्ट्रीय सचिव म्हणून काम पाहत होते. त्यानंतर त्यांना पुणे पदवीधर मतदार संघातून  भाजपची उमेदवारी दिली गेली.

एबीव्हीपी आणि बँक ऑफ महाराष्ट्र मधील कामाचा अनुभव पाठीशी होते. एबीव्हीपी काम केल्याने पुण्यातील सर्व शैक्षणिक संस्थेशी चांगली ओळख झाली होती. याचा फायदा घेत अधिकाधिक पदवीधरांची मतदान नोदणी करून घेतली. त्याचा फायदा असा झाला की, पहिल्या प्रयत्नात ते पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून आले. 

१९९० आणि १९९६ मध्ये ते दोन वेळा विधानपरिषदेवर पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून गेले आहेत.  

युती सरकारच्या काळात नियोजन मंडळाचे उपाध्यक्षही

१९९५ मध्ये राज्यात युतीचे सरकार आले. संघाच्या जवळचे समजले जाणाऱ्या प्रकाश जावडेकर यांना नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष देण्यात आले. त्याच बरोबर ते अनेक वर्षे महाराष्ट्रात भाजपच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांना केंद्रात बोलावून घेण्यात आले.

प्रकाश जावडेकर यांचा राजकीय आलेख वाढतच होता. संघाच्या जवळील म्हणून त्याची विशेष ओळख निर्माण झाली होती. २००८ साली त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर त्यांना पाठविण्यात आले. यावेळी ते दुसऱ्या बाजूने भाजपचे प्रवक्ते म्हणून किल्ला लढवत होते. 

२०१४ ची लोकसभा निवडणूक जवळ आली होती. अशात भाजपच्या बाजूने वारे वाहू लागले होते. एक-एक पक्ष भाजपलाच्या आघाडीत सामील होत होते. आरपीआयचे रामदास आठवेल हे सुद्धा भाजपच्या आघाडीत सामील झाले होते.

२०१४ मध्ये प्रकाश जावडेकर यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आला होता. पुन्हा त्यांनाच महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठविण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र त्यावेळी  रामदास आठवले यांना त्यांच्या जागेवर राज्यसभेत पाठविण्यात आले.

अनेकांना वाटले आता प्रकाश जावडेकर काही तरी बोलतील. मात्र त्यांनी शांत राहणे पसंद केले होते. पुढच्या काही महिन्यातच  मध्य प्रदेशामधून प्रकाश जावडेकर यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले.

मोदी सरकार मध्ये दुहेरी भूमिका

२०१४ साली लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले.  त्यांच्या मंत्रिमंळामध्ये जावडेकरांची माहिती प्रसारण, संसदीय कामकाज व पर्यावरण ह्या तीन खात्यांवर नियुक्ती करण्यात आली. त्यानंतरच्या खातेबदलात जुलै २०१६ रोजी जावडेकर यांच्याकडे मनुष्यबळ विकास खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली.

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्येही प्रकाश जावडेकर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आणि भाजपचा प्रवक्ता अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत होते. याशिवाय, त्यांच्याकडे पर्यावरण खाते आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभारही देण्यात आला होता.

बुधवारी इतर १२ मंत्र्यांसोबत प्रकाश जावडेकर यांना सुद्धा केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा राजीनामा द्यावा लागला.

संघाशी एकनिष्ठ आणि संघाच्या नेत्यांशी असणारे चांगले संबंध यामुळे प्रकाश जावडेकर यांना  कुठलाच जनाधार नसतांना सुद्धा सामान्य कार्यकर्ता ते सात वर्ष केंद्रीय पद मिळवू शकले. 

या बाबत ज्येष्ठ पत्रकार हरीश केंची यांनी बोल भिडूने बोलतांना सांगितले की,

प्रकाश जावडेकर यांचा प्रवास सुरुवाती पासून ‘एकला चलो रे’ असाच राहिला आहे. इतर नेत्याप्रमाणे पुण्यात, राज्यात त्यांचे कार्यकर्ते कधीही तयार झाले नाहीत. तसेच असेही म्हणायला जागा आहे की, त्यांनी कुठल्याही कार्यकर्त्याला मोठे केले नाही.

जावडेकर एक्टीव्ह पॉलिटिक्स लिटिक्स मध्ये नव्हते. संघाच्या जवळ राहायचे हे मात्र त्यांनी कटाक्षाने पाळले. संघाच काम केल्याने मोदींना सुद्धा ते जवळचे वाटायचे. त्यांनी कधीच कुठेलीही रचनात्मक काम नसून संघटनात्मक कामात मात्र त्यांनी पुढे बरेच राहिले आहेत.

ते सतत डेप्युटेशनवरच राहिले आहेत. पक्षाच्या वतीने दिलेले काम पूर्ण करायचे हेच त्यांचे ध्येय राहिले आहे. त्यामुळे त्यांना पक्षाने एवढ्या संधी दिल्या आहेत. त्यांनी पुण्याला सुद्धा कधी खासदार निधीतून भरीव असं काही दिले असं झाले नसल्याचे हरीश केंची यांनी सांगितले.

अस्सल पुणेकर नेहमी म्हणतो, जावडेकरांच्या मंत्रीपदाचा लाभ ना आम्हाला झाला, ना पुण्यातील भाजपला.

भाजपच्या माध्यमातून प्रकाश जावडेकर यांना दोन वेळा विधानपरिषद आणि दोन वेळा राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. २००४ ते २०१४ या दशकात प्रकाश जावडेकर यांनी भाजप प्रवक्ते म्हणून जोरदार कामगिरी केली आहे. असे सांगण्यात येते की २०१२ मधील कोळसा खाण घोटाळ्याची चौकशी जावडेकरांच्या पाठपुराव्यामुळेच सुरु झाली होती.

जावडेकरांना पुढे काय मिळू शकते?

२०२४ ची संभाव्य लोकसभा निवडणूक पाहता मोदी सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रकाश जावडेकर हे प्रवक्ते म्हणून प्रमुख भूमिका मांडू शकतात. प्रकाश जावडेकर यांनी वयाची सत्तरी पार केली आहे. त्यामुळेच त्यांना मंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.

२०१४ मध्ये प्रकाश जावडेकर हे मध्यप्रदेश येथून राज्यसभेवर गेले आहेत. यावर्षी त्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे जावडेकर यांना पुन्हा संधी मिळणार का याबाबत साशंकता ही व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.