आज चित्रपटांच्या माध्यमातून देशभरात कल्ला करणारे ‘प्रकाश झा’ ऍक्सिडेंटली डायरेक्टर बनलेत
बॉलीवूड चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या पट्टीचे आणि वेगवगेळ्या प्रकारचे चित्रपट आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक चित्रपटाच्या प्रकाराचा त्याचा त्याचा चाहता वर्ग आहे. मात्र हा चाहता वर्ग जसा चित्रपटांचा आहे तसाच तो अलीकडच्या काळात चित्रपट निर्मात्यांचा आणि दिग्दर्शकांचा देखील तयार व्हायला सुरुवात झाली आहे.
काय आहे ना सध्या लोकांना ‘बिहाइंड द कॅमेरा’ बघायची सवय लागलीये. आणि याच सवयीमुळे त्यांना एखाद्या निर्मितीच्या मागील कष्टाचा, कल्पनेचा चेहरा बघता येतोय.
फक्त बघताच नाहीयेत तर त्यांना भरभरून प्रेम, आदर आणि प्रोत्साहन देखील देतात. अशातीलच प्रेक्षकांचा चाहता चेहरा सध्या बनला आहे ‘प्रकाश झा’ यांचा. प्रकाश झा हे खूप पोटतिडकीने चित्रपट बनवतात. सामाजिक मुद्द्यांवर आणि राजकारणावर त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या चित्रपटांना त्यांनी अशा ज्वलंत आणि उघडपणाने बोलल्या जाणाऱ्या मुद्द्यांवर भाष्य करण्याचं साधन बनवलं.
नेमकं हेच प्रेक्षकांना भावलं आणि त्याचमुळे आज ते लोकप्रिय झालेत.
मात्र सिनेसृष्टीत कॅमेऱ्यातून कला, कल्पकता दाखवणाऱ्या या कार्यकर्त्याला त्यांची खरी कला तर ब्रश आणि कागदावर उतरवून जगाला दाखवायची होती. मात्र नियतीमध्ये जे लिहिलेलं असतं ते कुणालाही ठाऊक कुठे असतं!
प्रकाश झा बिहारमध्ये जन्मले आणि तिथेच पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं. बोकारो शहरातील केंद्रीय विद्यालय क्रमांक १ आणि कोडरमा जिल्ह्यातील तिलैया इथे असलेल्या सैनिक स्कुलमधून त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे त्यांच्या डोळ्यांत चमकू लागली ती ड्रीम सिटी मुंबई.
मुंबई त्यांना सतत खुणावत होती मात्र सिनेसृष्टीसाठी नाही तर पेंटर होण्यासाठी.
हो, तुमचं आमचं जसं शाळेत, महाविद्यालयात कुणी विचारलं की ‘काय बनायचंय?’ याचं एक ठराविक उत्तर असतं, तसंच प्रकाश झा यांचं या प्रश्नाचं उत्तर होतं – ‘पेंटर’. याच स्वप्नाला साकार करण्यासाठी त्यांनी मुंबईची वाट धरली.
पदवी झाली होती तेव्हा आता आपल्याला हवं तसं शिक्षण घेण्यासाठी आणि आपल्या छंदाला करिअर बनवण्यासाठी सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता मुंबईमध्ये आला. तिथल्या जे जे स्कुल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी प्रवेश मिळवला. पेंटिंगचं शिक्षण सुरु झालं होतं मात्र ही मुंबई नागरी होती आणि १९ व शतक सुरु होतं. चित्रपट क्षेत्र नव-नवीन कलाटण्या घेत होतं. मुंबईच्या रस्त्यावर देखील तेव्हा सर्रास शूटिंग केलं जायचं.
अशीच एक शूटिंग प्रकाश झा यांनी बघितली आणि त्या कॅमेऱ्याच्या जगाच्या प्रेमात पडले.
मग काय? प्रेम जडलं होतं तर त्या प्रेमाला आयुष्यात आणण्यासाठी त्यांनी पेंटिंग सोडून दिलं आणि दिग्दर्शनाचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मात्र हे इतकं सोपं नव्हतं. क्षेत्र निवडलं होतं मात्र त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा पैसा नव्हता की शिक्षण आणि राहण्याचा खर्च भागवला जाऊ शकत होता. तेव्हा त्यांनी राहण्याची गरज मागे ठेवली आणि शिक्षणाला प्राधान्य दिलं. जुगाड होईपर्यंत कित्येक रात्री त्यांनी जुहू बीचच्या फूटपाथवर काढल्या.
शिक्षण घेतानाच त्यांनी त्यांची पहिली डॉक्युमेंटरी फिल्म १९७५ मध्ये बनवली. जिचं नाव होतं ‘अंडर द ब्लु’. ही डॉक्युमेंटरी देखील सिरीयस जॉनरची फिल्म होती.
त्यांनी नंतर ‘फेसेज आफ्टर स्टॉर्म’ यासारखी डॉक्युमेंटरी देखील बनवली. ही बिहारच्या दंग्यांवर आधारित असल्याने त्याच्यावरून वाद पेटला आणि तिला रिलीज झाल्याच्या ४-५ दिवसांतच बॅन करण्यात आलं. वादात ते सापडले तेव्हा त्यांनी टिपलं की आपण योग्य मार्गावर आहोत आणि तेव्हापासूनच त्यांनी हाच जॉनर पुढे कायम ठेवला आहे. त्यांच्या या डॉक्युमेंटरीला बेस्ट नॉन फिचर फिल्मसाठीचा नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला होता.
चित्रपटांमध्ये जिवंतपणा आणण्याची त्यांची प्रेरणा त्यांना त्यांच्या पेंटिंगच्या आवडीतून मिळाली. हेच ध्येय पुढे ठेवून त्यांनी मार्गक्रमण केलं. १९८३ मध्ये त्यांनी त्यांनी ‘हिप हिप हुरेय’ चित्रपटापासून दिग्दर्शनाची सुरुवात केली. मात्र त्यांना ओळख मिळाली ती १९८४ मध्ये आलेल्या ‘दामुल’ चित्रपाटातून.
हा चित्रपट बिहारच्या बंदुआ मजदूरीवर आधारित होता. सामाजिक परिस्थितीवर सडेतोड उत्तर देणाऱ्या या चित्रपटातून त्यांच्या कामाची जादू सिनेसृष्टीला कळायला सुरुवात झाली.
१९८६ च्या दरम्यान त्यांनी ‘परिणती’ चित्रपट आणि चार टेलिव्हिजन मालिकांचं दिग्दर्शन केलं. ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ही त्यातील सर्वात गाजलेली मालिका ठरली. मग बंदिश, मृत्युदंड, राहुल, लोकनायक, गंगाजल, अपहरण, राजनीती अशा चित्रपटांनी कल्ला केला. यातील त्यांचे जवळपास सर्वच चित्रपट नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडत राहिले. कारण त्यांचे हे सर्व चित्रपट सामाजिक आणि राजनैतिक प्रश्नांवर बोलणारे होते त्यामुळे काहींच्या भावना दुखावणं साहजिक होतं.
त्यांनी जवळपास २५ डॉक्युमेंटरीज, ९ फिचर फिल्म, २ टेलिफिल्म आणि ३-४ टेलिव्हिजन मालिकांचं दिग्दर्शन केलेलं आहे.
आधी पेंटर, नंतर चित्रपट दिग्दर्शन अशा स्वप्नांनंतर त्यांनी राजकारणात उतरण्याचं स्वप्न देखील बघितलं. त्यासाठी ते चंपारणच्या २००४, २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही उभे राहिले मात्र पदरी अपयश पडलं. आता सध्या ते ‘प्रकाश झा प्रोडक्शन’ ही त्यांची स्वतःची कंपनी सांभाळतात.
जेव्हा त्यांनी त्यांचं पेंटरचं स्वप्न सोडलं तेव्हा त्यांनी वेगळ्या पद्धतीने ते अस्तित्वात आणलं. त्यांनी पेंटर बायको केली, दीप्ती नवल त्यांचं नाव’. दीप्ती नवल चांगल्या पेंटर तर होत्या मात्र इंडस्ट्रीमध्ये त्या नायिका म्हणून कार्यरत होत्या. अशाप्रकारे ते त्यांच्या जगत असलेल्या स्वप्नचीही कास धरून होते आणि भूतकाळातील देखील. त्यांनी एका मुलीला दत्तक घेतलं होतं जिचं नाव दिशा आहे.
त्यांना नॅशनल फिल्म अवॉर्ड, इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन असे अनेक अवॉर्ड मिळालेले आहेत. तर, त्यांच्या अनेक चित्रपटांनी देखील अवॉर्ड कमावले आहेत. सामाजिक प्रश्नांवर चित्रपटांच्या माध्यमातून बोलणारा हा कार्यकर्ता स्वतःही प्रत्यक्षपणे अनेक सामाजिक कार्य करतो. बिगर सरकारी संस्था ‘अनुभूती’ च्या माध्यमातून ते बिहार आणि जवळपासच्या लोकांना आरोग्य आणि रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी प्रशिक्षणाचं काम करताय.
आपल्या आयुष्यातून काही तरी समाजाला जावं असं मानणाऱ्या प्रकाश झा यांचे चित्रपट पिढ्यानपिढ्या शिकवण देत राहणारे आहेत.
हे ही वाच भिडू :
- हिरो बनायला आलेल्या डॅनी डेन्जोंगपाला डायरेक्टरने वॉचमनची नोकरी कर म्हणून सांगितलेलं….
- एकता कपूर येण्याआधी सिरियलचा तो किंग होता, सलमानने त्याला म्युझिक डायरेक्टर केलं…
- अंबानींच्या घरावर छापा टाकल्यानंतर CBI डायरेक्टरची उचलबांगडी झाली होती…