आपल्याच देशात शोध लागलेल्या खेळात नंबर वन होण्यासाठी प्रकाश पदुकोण जन्मावा लागला.

बॅडमिंटन हा एक असा खेळ आहे त्याची सुरवात भारतात तेही पुण्यात झाली अस म्हणतात. मुळा नदीच्या काठावर खेळणाऱ्या दोन पोरांना पाहून इंग्रजांना हा गेम सुचला आणि त्यांनी आपल्या देशात नेऊन त्याच नाव बॅडमिंटन ठेवलं.

पण ज्याची निर्मिती भारतात झाली त्या खेळात मात्र आपण कुठेच नव्हतो.

क्रिकेट, फुटबॉल वगैरेच ठीक होत पण कमीतकमी भारतात शोध लागलेल्या खेळात तरी आपण जगावर राज्य करावं अशी अनेकांची अपेक्षा होती. पण तसं घडत नव्हतं

आधीच पारतंत्र्यात इंग्रजांनी आपल्याला लुटलं होत त्यात या खेळाची एक भर अस म्हणून गप्प बसावं लागत होतं.

भारताला एका सुपरहिरोची गरज होती.

तो जन्माला आला प्रकाश पदुकोण यांच्या रुपात. ते मूळचे उडपी कर्नाटकातले. तिथल्या एका छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. त्याच्या वडिलांना बॅडमिंटनची आवड होती. ते स्वतः म्हैसूर बॅडमिंटन असोसिएशनचे सेक्रेटरी होते.

त्यांनी खूप लहान वयात असतानाच प्रकाशच्या हातात बॅडमिंटन रॅकेट सोपवलं. अवघ्या सात वर्षांचा असताना प्रकाश पदुकोण कर्नाटक ज्युनियर चॅम्पियनशिप ची मॅच खेळत होता.

त्याची पहिलीच मॅच वयाने खूप मोठ्या असलेल्या खेळाडूशी झाली.

त्याने प्रकाशला पहिल्याच फेरीत सहज हरवलं. पण अवघ्या ७ वर्षाच्या प्रकाश पदुकोणमध्ये जिंकण्याची जिद्द प्रचंड मोठी होती.

त्याने कोर्टवरच भोकाड पसरलं.

अखेर ऑर्गनाईझर्सनी प्रकाशला बेस्ट लुझर नावाची ट्रॉफी दिली तेव्हाच त्याच समाधान झालं.

प्रकाशच्या वडिलांना खूप दुःख झालं. त्याच्या खेळासाठी म्हणून पदुकोण कुटुंबीय बेंगलोरला शिफ्ट झाले. पण त्याकाळात बेंगलोरमध्ये सुद्धा चांगली फॅसिलिटी नव्हती. लग्न मंगल कार्यालयात सिझन नसला की बॅडमिंटन कोर्ट भरायचे.

प्रकाश पदुकोण सारखे टॅलेंटेड खेळाडू अशा वातावरणात एकलव्याप्रमाणे स्वतः स्वतः शिकत होते.

पण त्याच्यात लढाऊ वृत्ती एवढी होती की त्यानं बेस्ट लुझरची ट्रॉफी मिळवली होती त्याच्या दोनच वर्षात तो कर्नाटकचा चॅम्पियन बनला.

फक्त एवढंच नाही तर वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्याने नॅशनल ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकलीच आणि त्याच वर्षी सिनियर स्पर्धेत उतरून ती सुद्धा जिंकली

आपण सचिनने सोळाव्या वर्षी क्रिकेटमध्ये केलेल्या चमत्काराची चर्चा करतो,

पण प्रकाश पदुकोण वयाच्या १६ व्या वर्षी भारताचे चॅम्पियन बनले होते आणि तिथून पुढे ९ वर्षे त्यांना त्या स्थानावरून कोणी हरवू नाही शकलं.

हा एक विक्रमच होता. पुढे येणाऱ्या अनेक विक्रमांची ही एक नांदीच होती.

अतिशय वेगवान समजल्या जाणाऱ्या या गेम मध्ये प्रकाश पदुकोण यांनी आपली एक वेगळीच स्टाईल निर्माण की होती. नाजुक व कलात्मक शैली आणि अत्यंत फसवे व सफाईदार अलगद फटके ही त्याच्या खेळाची वैशिष्ट्ये होते.

त्याने कॉमनवेल्थ गेम मध्ये पहिला ब्रॉंझ पटकावला. यामुळे त्यांच्याकडे बॅडमिंटन जगताच लक्ष वेधलं गेलं. हा खेळाडू स्पेशल आहे असं तेव्हाही अनेकांचं मत होतं.

प्रकाश पदुकोण यांनी भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर पोहचवल.

तेव्हाही या खेळात युरोप कोरिया चीन इंडोनेशियाच्या खेळाडूंच वर्चस्व असायचं.

प्रकाश पदुकोण यांनी सर्व प्रथम डेन्मार्क ओपन, स्वीडन ओपन अशा स्पर्धा जिंकत जिंकत आपले पाय रोवले. १९७८ साली प्रकाश पदुकोण यांनी कॉमनवेल्थमध्ये देशाला गोल्ड मेडल मिळवून दिला.

पुढच्या दोनच वर्षात बॅडमिंटन जगातला सर्वात मानाची ऑल इंग्लंड ओपन चॅम्पियनशिप प्रकाश पदुकोण यांनी जिंकली.

आता पर्यंत सलग तीनवेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या लाएम स्वी किंग या इंडोनेशियाच्या खेळाडूला अटीतटीच्या सामन्यात पदुकोण यांनी मात दिली होती

हा विजय भारताच्या फक्त बॅडमिंटन नाही तर एकूणच क्रीडा क्षेत्रात क्रांतिकारी मानला गेला.

ज्या इंग्रजांनी भारताचा खेळ चोरला त्यांना त्यांच्याच मातीत हरवून जगातलं अव्वल नंबर पटकावणे ही साधी गोष्ट नव्हती.

प्रकाश पदुकोण जगात एक नंबरच्या रँकिंगला पोहचले होते. आणि अस करणारे ते पहिले भारतीय होते. पुढच्याच वर्षी त्यांनी वर्ल्डकप देखील जिंकला.

भारताला हवा असणारा सुपरहिरो मिळाला होता.

सभ्य सुशिक्षित देखणा प्रकाश पदुकोण भारताच्या क्रीडा जगतातला खरा सुपरहिरो होता. त्यांच्या मुळे भारतात अनेकांना बॅडमिंटन हा खेळ समजला, कित्येकांनी खेळायला सुरवात केली.

पण लालफितीच्या कचाट्यात खेळाला अडकवलेल्या राजकारण्यांनी आणि नोकरशहानी प्रकाश पदुकोण यांचे महत्व कधी समजलेच नाही.

नव्वदच्या दशकात प्रकाश पदुकोण बॅडमिंटनमधून रिटायर झाले.

त्यांनी बराच काळ राष्ट्रीय कोच म्हणून काम पाहिलं, बॅडमिंटन संघाचे अध्यक्ष देखील बनले.

पण मनासारखं फ्रीडम त्यांना मिळत नव्हतं. अखेर त्यांनी बेंगलोरमध्ये आंतराष्ट्रीय दर्जाची प्रकाश पदुकोण अकॅडमी सुरू केली व अनेक बॅडमिंटनपटू घडवले.

प्रकाश पदुकोण यांनी केलेल्या कष्टाचं फळ म्हणजे भारताचा बॅडमिंटन जगात दरारा निर्माण झाला. पी सिंधू, साईना नेहवाल, गोपीचंद, ज्वाला गुट्टा सारखे वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू आपल्या देशात घडले, ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत मेडल मिळालं याच श्रेय जात,

कोणतीही फॅसिलिटी नसताना भारतात क्रीडा संस्कृती रुजवणाऱ्या प्रकाश पदुकोण यांना!

भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा सन्मान दिलेला आहे.

त्यांना दोन मुली आहेत. दीपिका आणि अनिशा. यापैकी दीपिका हिला लहानपणी बॅडमिंटनमध्ये इंटरेस्ट होता, ती स्टेट चॅम्पियनसुद्धा बनली होती.

SAVE 20200610 184524

मात्र कॉलेजमध्ये गेल्यावर तिने आपले लक्ष मॉडेलिंग कडे वळवले आणि आज ती भारतातली हिंदी सिनेमामधली आघाडीची हिरॉईन बनली आहे.

एक काळ असा होता की तिला प्रकाश पदुकोण यांची मुलगी म्हणून ओळखल जायचं, आज प्रकाश पदुकोण यांना दीपिकाचे बाबा म्हणून ओळखातात.

आणि याचा प्रकाश पदुकोण यांना सार्थ अभिमान आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.