पुण्यातलं एक असं मंडळ जिथे विसर्जनावेळी फक्त प्रल्हाद शिंदेचं गाणं वाजवण्याची प्रथा आहे

पुणे हे ऐतिहासिक शहर आहे. दस्तुरखुद्द जिजाऊ माँ साहेबांनी नांगर फिरवून या शहराचा श्रीगणेशा केला होता. इथल्या प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे असं म्हणतात. इथे उभारल्या गेलेल्या प्रत्येक पेठा या उभारण्या मागे काही ना काही इतिहास हा आहेच. कसबा पेठ आणि शनिवार पेठ येथील वस्ती वाढल्यामुळे जागा अपुऱ्या पडू लागल्या.

या कारणास्तव थोरले बाजीराव यांनी पूर्वीच्या केदार वेशीच्या बाहेर जुन्या मलकापूर पेठेच्या दुतर्फा नव्या पेठेची उभारणी केली तीचे नाव आदित्यवार पेठ म्हणजेच “रविवार पेठ”. जुन्या केदार वेशीपासून ते पासोड्या विठोबा मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर व्यापाऱ्यांच्या बाजारपेठा वसविल्या गेल्या. तसेच सराफांची दुकाने सुद्धा वाढली गेली. या सर्व कारणांमुळे रविवार पेठ म्हणजे श्रीमंत व्यापारी पेठ अशी एक वेगळी ओळख निर्माण झाली.

याच रविवार पेठेतल्या कस्तुरे चौकात एक शिवकालीन विठ्ठल मंदिर आहे. 

हे मंदिर सरदार मोहिते यांनी बांधलेले असून, शमीनाथ बाबा या महान संतांनी विठ्ठल रुक्मिणी व मारुतीची स्थापना या मंदिरात केली. या विठ्ठल मंदिरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज येऊन किर्तनसुद्धा करून गेले होते. वारकरी परंपरेचा उज्ज्वल वारसा लाभलेलं हे विठ्ठल मंदिर आहे. याच विठ्ठल मंदिरात कस्तुरी चौकाच्या गणपती बाप्पाचे सुद्धा मंदिर आहे.

१९१९ साली या सार्वजनिक गणेशोस्तव मंडळाची स्थापना झाली. कृष्णाप्पा तुकाराम कोठावळे यांनी या मंडळाची स्थापना केली. 

सुरवातीला छोट्या प्रमाणात सुरु झालेला ह्या मंडळाच्या गणेशोत्सवाने पुढे जाऊन मोठे स्वरूप प्राप्त केले. या सार्वजनिक गणेशोत्सवाचे आणि वारकरी संप्रदायाचे अतूट नाते आहे. पूर्वी गणेशोत्सवामध्ये हे मंडळ मेळे सादर करायचे. त्या मेळ्यामध्ये काठीला घुंगरू बांधून ती जमिनीवर आपटून एका विशिष्ट ठेक्यात, लईत देशभक्ती वर गाणे म्हणून इंग्रज सरकारविरुद्ध लोकांना जागृत करण्याचे काम केले जात.

या मंडळाने गणेशोत्सव सुरू केल्याच्या पाच वर्षानंतर लाईटिंगचे देखावे गणेशोत्सवामध्ये उभारले.

लाईटिंगचे देखावे पहिल्यांदा सुरु करणाऱ्या मंडळांपैकी हे एक मंडळ. सांगण्यासारखा किस्सा म्हणजे “जेवेल थिफ” या प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील सुप्रसिद्ध गाणे ‘ओठो पैं ऐसी बात’ हे गाण लाईटिंगच्या देखाव्यावर ह्या मंडळाने प्रथम सादर केले. आणि ते त्याकाळी इतके फेमस झाले की, आजही नियमित दरवर्षी हे मंडळ हे गाणं लाईटिंगच्या देखाव्यावर सादर करते.

विशेष म्हणजे या मंडळाचे लाईटिंगचे काम करणारे किराड बंधू व नाईकडे मांडववाले यांची तिसरी पिढी आजही मंडळाचे लाईटिंगचे व मांडवाचे काम पाहतात. शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हे मंडळ नामांकित आहे. 

या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे, गणपती बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक हे मंडळ दरवर्षी नियमितपणे बैलगाडीवर काढत.

पण पंधरा वर्षांपूर्वी एक किस्सा घडला. बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज असलेल्या बैलगाडीचे बैलच जाग्यावर न्हवते. 

बैल दुसऱ्या ठिकाणी गेले असल्यामूळे बाप्पाच्या आगमन मिरवणुकीसाठी विलंब होत होता. तेव्हा मंडळातल्या कार्यकर्त्यांनी असे ठरवले की, बैल नाहीतर बाप्पाचा गाडा आपण ओढायचा आणि मिरवणुक काढायची. आणि झालं पंधरा वर्षांपूर्वी ही जी प्रथा पडली ती आजतागायत सुरु आहे. यंदा मंडळाने १०२ व्या वर्षात पदार्पण केले.

“तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे” हे प्रल्हाद शिंदेच गाण ऐकल की मन कसं हरवुन जात.

अजरामर गणेशोत्सवासारखे हे गाणे सुद्धा अजरामर आहे. ह्या गाण्याचा प्रभाव ह्या मंडळावर इतका आहे की, जेव्हा हे गाणे आले तेव्हापासुन हे मंडळ शेवटच्या विसर्जन मिरवणुकीत फक्त हेच एक गाणं वाजवत बाप्पाची विसर्जन मिरवणुक काढत. बाकीचे कोणतेही गाणं हे मंडळ लावत नाही. असे का म्हणुन जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा त्यांनी सांगितल की,

“ह्या गाण्यातून जी ऊर्जा मिळते, जो माहोल तयार होतो तो इतर कशातच नाही म्हणून हेच गाण आम्ही लावतो.”

दोन वर्षापूर्वीच या मंडळाने शताब्दी महोत्सव साजरा केला.

  • कपिल जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.