प्रल्हाद शिंदे यांच्या कव्वालीने चढता सूरजचं मार्केट डाऊन केलं.
कितीही सूर लावला तरीही सूर हा लागत नाही
कितींदा ऐकले तरीही मनाची भूक भागत नाही
गाणं सत्यनारायणाचं खोटं मी सांगत नाही
त्या प्रल्हादाच्या अभंगाशिवाय तो पंढरीचा विठोबाही जागत नाही,,,,
अशा कैक लाखमोलाच्या रचना ज्या माणसासाठी रचल्या गेल्या ते व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांच्यापासून शिंदेशाहिची सुरवात झाली, शिंदेशाहीचा म्होरक्या, जनमानसातील बुलंद आवाज, मानवी मनाला अध्यात्माकडे खेचून आणणारा आवाज, घरातले सासू सुनेचे वाद असो किवा नात्यांची गंमत सांगणारे गीत असो, लोकगीतांचे सामने असो किवा पहिल्याच गाण्याची झालेली रेकॉर्डब्रेक कॅसेट विक्री असो.
वरच्या पट्टीत गाताना जिथ इतर गायकांचा श्वास संपतो तिथून प्रल्हाद शिंदेंची तान सुरु होते, असा आवाज जो लहानग्यांपासून ते घरातील सगळ्यात वयोवृद्ध व्यक्तीलाही अगदीच जवळचा वाटतो तो म्हणजे स्वरसम्राट, मराठी लोकसंगीतातील कोहिनूर हिरा प्रल्हादजी शिंदे.
ह्या आवाजाचं गारुड गेली कैक वर्ष अजूनही महाराष्ट्र अनुभवतोय. महाराष्ट्रातील असं एकही गावं नसेल जिथली सकाळ ही प्रल्हाद शिंदेंच्या भक्तिगीताने होत असेल. बाबासाहेब आंबेडकरांची भीम गीते बुद्ध गीते यांना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवणारे सुद्धा प्रल्हाद शिंदेच होते.
लोकसंगीतातले सगळेच प्रकार प्रल्हाद शिंदेनी गायले पण महाराष्ट्रात पहिल्यांदाच कव्वाली हा प्रकार घेऊन येणारे सुद्धा तेच आहेत. भारतातील त्या काळी सगळ्यात जास्त चालणारी कव्वाली “ चढता सुरज धीरे धीरे ढलता हे ढल जायेगा,,,,’’ ला जोरदार टक्कर ही “ उड जायेगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली,,,,’’ या महागायक प्रल्हाद शिंदेंच्या कव्वालीने दिली.
लोकगीते, भक्तिगीते गाणारे प्रल्हाद शिंदे कव्वाली प्रकाराकडे कसे वळाले ह्याबद्दल जरा जाणून घेऊया.
सुरवातीच्या संघर्षाच्या काळात प्रल्हाद शिंदे यांचं गाणं रिलीज करायलाचं एच एम व्ही कंपनी धजावत नव्हती. एच एम व्ही कंपनीत मराठी संगीत विभागात सगळ्या दिग्गज लोकांचा भरणा होता. प्रल्हाद शिंदे हा त्यात नवखा, कुठल्याही गायकी घराण्याशी लागेबांधे नसलेला आणि शास्रीय गायनाशी दूरवर संबंध नसलेला तरुण होता.
कंपनीच्या बड्या अधिकार्यांनी प्रल्हाद शिंदेंचा आवाज पुढे पास केला खरा पण प्रल्हाद शिंदेंच्या नावाने कॅसेट खपतील की नाही ह्याबद्दल ते साशंक होते त्यामुळे त्यांचा अल्बम तसाच पडून होता. एकूण तेवीसशे रुपये डीपोजीट म्हणून ठेवावे लागतील तरच अल्बम रिलीज केला जाईल अशी अट कंपनीकडून ठेवण्यात आली.
प्रल्हाद शिंदेंचे थोरले बंधू हे कंपनीत तबला वादक म्हणून नोकरी करत होते त्यांना हा प्रकार कळताच आपल्या धाकल्या भावाच्या आवाजासाठी त्यांनी ती नोकरी सोडली आणि मिळालेल्या फंडाच्या पैशातून त्यांनी तेवीसशे रुपये कंपनीत भरले.
पैसे भरल्या बरोबर प्रल्हाद शिंदेंची चार गाणी ध्वनिमुद्रित झाली. गीतकार संजय पवार ह्यांनी ही गीते लिहिली आणि संगीत मधुकर पाठक यांनी दिलं. त्यातील पहिलं गाणं म्हणजे,
रुतला पायी काटा
या आडवाटा
तो नंदाचा कारटा होता जोडीला,,,,,
ह्या गाण्यांच्या कॅसेटने अनपेक्षितपणे मार्केटमध्ये इतिहास रचला. ताबडतोब सगळ्या कॅसेट विकल्या जाऊ लागल्या. प्रल्हाद शिंदेंच नाव सगळीकडे गाजू लागलं. एका पहाडी आणि सुमधुर आवाजाची ओळख महाराष्ट्राला झाली. महाराष्ट्रातील वारकरी लोकांच्या गळ्यातील ताईत ते झाले. त्यांतर मात्र एच एम व्ही कंपनीने प्रल्हाद शिंदेना सोडलं नाही. तिथून पुढची सगळी गाणी त्यांनी प्रल्हाद शिंदेंकडून गावून घेतली.
भक्तिगीते,लोकगीते आणि गवळणीसाठी प्रल्हाद शिंदेंची वर्णी लागू लागली. लोकांचं अमाप प्रेम प्रल्हाद शिंदेंना मिळत गेलं आणि मोठमोठ्या मातब्बर लोकांचा सहवासही मिळत गेला.
एका चाकोरीबद्ध गायनप्रकारात अडकून न राहता त्यांनी वेगळं काहीतरी गाऊन पाहण्याचा प्रयत्न केला. त्यातल्या त्यात महाराष्ट्राबाहेर कव्वाली हा प्रकार आवडीने ऐकला जातो ह्याची त्यांना जाण होती. हा गायन प्रकार मराठीत आणावा अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यासाठीचे सगळे प्रयत्न त्यांनी सुरु केले.
त्या नंतरच्या काळात प्रल्हाद शिंदे हे ख्यातकीर्त कव्वाल, उर्दू शायरीचे शहेनशाह समजले जाणारे इस्माईल आजाद यांच्या पार्टीत कोरसमध्ये गात होते. आणि ह्या पार्टीतच ते तबला वादक म्हणून इस्माईल आजाद ह्यांना साथ करत होते. तबल्यावर चालणारी त्यांची बोटे सामन्यांमध्ये आकर्षणाचा विषय ठरत होती. पण प्रल्हाद शिंदेंना वाजवण्यात तितकं स्वारस्य नव्हतं त्यांना त्यांच्या गाण्याच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास होता.
कव्वालीला कोरस देता देता एका दिवशी त्यांना कव्वाली मुख्य गायक म्हणून न मिळता सेकंड लीड म्हणून मिळाली आणि तेव्हा मात्र ती कव्वाली गाताना प्रल्हाद शिंदेंचा आवाज टिपेला पोहचला. ती कव्वाली होती
“ चमकी हैदर की तलवार ‘’.
ह्या कव्वालीतील पहिलीच तान ऐकणार्यांची मने जिंकून गेली. यातला पहिला शेर हा प्रल्हाद शिंदेंनी गायला आणि उर्वरित कव्वाली इस्मैल आजाद यांनी गायली. ती कव्वाली भारतभर चालली पण सुरवातीचा आवाज प्रल्हाद शिंदेंचा आहे हे कुणाला माहिती नव्हतं. सगळ्यांना तो आवाज इस्माईल आजाद यांचाच वाटत राहिला.
पुढे कव्वाली गायन प्रकारचं कसब प्रल्हाद शिंदेंनी अवगत केलं.
कॅसेटच्या जमान्यातसुद्धा गाण्यांची स्पर्धा किती उदात्त आणि उच्च कोटीची असू शकते ह्याचं दर्शन सुद्धा याचं काळात झालं. त्यावेळी संपूर्ण भारतात कव्वाली प्रकारचं मोसम होता ,पाकिस्तानात सुद्धा तुफ्फान कव्वाल्या चालायच्या. त्यावेळी अझीज नाजान ह्यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली एक कव्वाली बाजारात आली
“ चढता सुरज धीरे धीरे ढलता हे ढल जायेगा”
ह्या कव्वालीचे शब्द लिहिले होते कैसर रत्नागिरवी ह्यांनी.
ह्या गाण्याने संगीत क्षेत्रात प्रचंड उलथापालथ घडवून आणली. ह्या कव्वालीमुळे लोकांचा ओढा चित्रपट गीतांवरून इकडे वळला. विक्रमी कॅसेट विक्री झाली. गायक आणि त्यांच्या कव्वाल पार्टीच बरच नाव झालं.
इकडे प्रल्हाद शिंदे हे पहिल्यांदाच कव्वाली हा गायन प्रकार हाताळत होते. अख्तर वारसी\कुरेशी ह्या उर्दू शायराने ही कव्वाली लिहिली तिला संगीत साज प्रल्हाद शिंदेंनी चढवला. ह्या कव्वालीचे शब्द होते
“ उड जायेगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली”
प्रल्हाद शिंदेंचा पहाडी आवाज ह्या कव्वालीला एकदमच चपखल बसला. संगीत कारकिर्दीतील प्रल्हाद शिंदेंचं हे पहिलच उर्दू रेकॉर्ड गीत. महाराष्ट्रात ह्या कव्वालीला लोकांनी प्रचंड डोक्यावर घेतलं. रेडीओवर सुद्धा हे गाण वाजलं जाऊ लागलं. जेव्हा चढता सुरज फॉर्म मध्ये होत तेव्हा उड जायेगा ही कव्वाली बाजारात आली तेव्हा तिने चढता सूरजच मार्केट स्वतकडे ओढून घेतलं.
ह्या कव्वालीची क्रेझ इतकी वाढली की मोठमोठ्या हॉटेलांमध्ये बूथवरती एक रुपया टाकला की हे गाणं वाजायचं.
असंही म्हटलं जातं की प्रल्हाद शिंदेंना एका सामन्यात त्यांच्या मित्राने हिणवल होतं की हीमत असेल तर कव्वाली गावून दाखवा तेव्हा ह्या कव्वालीची निर्मिती झाली. ह्या दोन्ही कव्वाल्या जीवनाच सार सांगणाऱ्या होत्या त्यामुळे लोकांनी चांगल्याच उचलून धरल्या.
खरतर या दोन्ही कव्वाल्यांची एकमेकांत स्पर्धा नव्हत्या पण प्रेक्षकांच्या मागणीनुसार कोणती कव्वाली भारी ह्याचे निकष लावले जाऊ लागले.
महाराष्ट्रात तर ही कव्वाली लोकप्रिय होतीच पण महाराष्ट्राबाहेरील कव्वाली रसिक लोकांनी सुद्धा ह्या कव्वालीच तोंडभरून कौतुक केलं. पुढे हिंदी गायन क्षेत्रात प्रल्हाद शिंदेंची ही कव्वाली वेगवेगळ्या गायकांनी सादर केली मात्र प्रल्हाद शिंदेंच्या आवाजासारखा जिवंतपणा कुठल्या गायकाच्या गळ्यात आढळला नाही.
अनेक रियालिटी शोमध्येसुद्धा ही कव्वाली सादर केली गेली खुद्द त्यांचे पुत्र गायक आनंद शिंदेसुद्धा सांगतात की
त्यांचे वडील म्हणजे आवाजाचा कारखाना होते. पुन्हा प्रल्हाद शिंदे होणे नाही.
प्रल्हाद शिंदेंची गाण्याप्रतीची श्रद्धा आणि निष्ठा त्यांच्या आवाजाने आपल्यापर्यंत पोहचते. एक पैशाचा गर्व न बाळगणारा हा खूप मोठा कलावंत होता. दुर्दैवाने त्यांचा गाणं गातानाचा एकही व्हिडिओ समाज माध्यमांवर उपलब्ध नाही, पण त्यांच्या आवाजारुपाने ते आजही आपल्यात आहेत अस वाटत राह्त.
त्या आवाजाचा गंधर्व सुद्धा दिवाना
प्रल्हादाविना सुना सुना शिंदेशाही बाणा..
- दुर्गेश काळे
हे ही वाच भिडू.
- छगनराव कधीही थांबले नाहीत. कुठल्याच संकटात.
- कमाल करणारा ढोलकीपटू महाराष्ट्रात होऊन गेला आहे, त्यांचं नाव राम जामगावकर.
- असं बनलं महाराष्ट्राला वेड लावणारं ‘नवीन पोपट हा’ हे गाणं !!
- महाराष्ट्राच्या लोकगीताला त्यावेळी जगात पहिलं पारितोषिक मिळालं..