फक्त १३ दिवसांच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत देखील महाजनांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले.
प्रमोद महाजन. भारतीय जनता पक्षातील एक वादळी व्यक्तीमत्व. महाराष्ट्राचे जे काही मोजके पंतप्रधान पदाला धडक देऊ शकत होते असं म्हणतात यात प्रमुख नाव येत प्रमोद महाजनांचं. संघाच्या मुशीत तळागाळातून तयार झालेलं त्यांचं नेतृत्व होतं. आपलं अफाट वक्तृत्व, संघटन शक्ती, करिष्माई व्यक्तिमत्व यामुळे महाजन अगदी कमी वयात भाजपच्या मोठ्या पदावर जाऊन पोहचले.
फक्त दोन खासदारांचा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहचवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.
भाजपमध्ये सरसंघचालकापासून ते मराठवाड्यातील एखाद्या साध्या कार्यकर्त्यापर्यंत आणि अडवाणींपासून ते अटलजींपर्यंत सगळ्यांशी त्यांचे चांगले नाते होते. भाजपच्या दुसऱ्या फळीचे सर्वात आघाडीचे नेते म्हणून त्यांना ओळख मिळाली होती.
महाजनांचा धडाका जेवढा मोठा होता त्यात धडाक्यात त्यांनी मित्रांबरोबर अनेक शत्रू देखील बनवले.
कित्येकदा त्यांना वेगवेगळ्या वादात अडकवण्यात आलं. कित्येकदा महाजन स्वतःच्या कृतीतून वादात सापडले याला गणना नाही. अंबानींसारख्या उद्योगपतींसोबत त्यांची असलेली मैत्री देखील लालकृष्ण अडवाणींच्या सारख्या मोठ्या नेत्याला आवडत नव्हती.
प्रमोद महाजनांनी पक्षासाठी अफाट कार्य केलं पण वादग्रस्त नेता ही इमेज शेवटच्या क्षणापर्यंत बदलू शकले नाहीत. असाच एक वाद वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान बनले तेव्हा देखील झाला होता.
साल होत १९९६. काँग्रेसचे पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांची कारकीर्द प्रचंड वादळी ठरली. त्यांनी जागतिकीकरण आणून भारताची अर्थव्यवस्था सुधारली पण हर्षद मेहता घोटाळा, बाबरी मशिदीचे पतन, हिंदू मुस्लिम दंगली, मुंबई बॉम्बस्फोट अशा अनेक घटनांनी त्यांच्या कारकिर्दीवर काळे डाग पडले.
काँग्रेसला याचा फटका बसला. त्यांच्या तब्बल ९२ जागा घेतल्या. कोणालाच स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं पण सर्वाधिक जागा असलेल्या भाजपला राष्ट्रपतींनी सत्तास्थापनेसाठी बोलावलं. अनेक पक्षांची आघाडी करून वाजपेयी पंतप्रधान बनले. हि राष्ट्रीय लोकशाही आघाडी चालवण्यासाठी वाजपेयींना प्रमोद महाजनांसारखा एक चाणक्य सोबतीला हवा होता.
प्रमोद महाजनांना वाजपेयींच्या पहिल्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री बनवण्यात आलं.
शपथ विधीनंतरच्या पहिल्याच तासात सेनादलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली. महाजनांनी युद्धशास्त्राचा तपशीलवार अभ्यास कधीच केला होता. त्यांच्या युद्धविषयक जाणकारीने ते अधिकारीही चपापले होते. कोणत्याही कामात उतरण्याआधी अभ्यास आणि तयारी हीच त्यांच्या कामाची ओळख होती.
प्रमोद महाजन यांनी आपल्या तडाखेबाज शैलीत संरक्षण खात्याचा कारभार सुरु केला. पहिल्यांदाच सरकारमध्ये आले असले तरी त्यांची प्रशासनावर पकड जबरदस्त होती. फायली कशा हलवायच्या याच बाळकडूच ते पिऊन आले असल्यामुळे देशाचा संरक्षण मंत्री म्हणून काम करत असताना त्यांना विशेष अडचण आली नाही.
मात्र दुर्दैवाने पुरेशा बहुमता अभावी पुढच्या तेरा दिवसातच वाजपेयीचं हे सरकार कोसळलं. भारताच्या इतिहासातले सर्वात कमी दिवसाचे पंतप्रधान म्हणून वाजपेयी यांना ओळखलं गेलं. त्यांचे पंतप्रधानपद वाचवण्यात भाजपचे चाणक्य म्हणवले जाणारे प्रमोद महाजन देखील अपयशी ठरले.
फक्त तेरा दिवसांचं हे सरकार पण याकाळात घेतलेल्या निर्णयामुळे लवकरच प्रमोद महाजन अडचणीत आले.
झालं असं कि चंद्रपूर जिल्हयात भद्रावती येथे आयुध कारखाना आहे. या संरक्षण साहित्य निर्मितीच्या कारखान्याच्या जवळपास काही किलोमीटर अंतरावर खाणी बनवण्यास परवानगी देऊ नये असा कोर्टाचा आदेश होता. खुद्द पंतप्रधानांचे विज्ञान तंत्रज्ञान विषयक सल्लागार डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या समितीने ही शिफारस केली होती. पण महाजनांनी या शिफारसीला केराची टोपली दाखवली आणि इस्पात कंपनीला भद्रावती कारखान्याजवळ खाणकामाची परवानगी दिली.
पुढे भाजपचेच खासदार बनवारीलाल पुरोहित यांनी या खाणीला जोरदार आक्षेप नोंदवला. त्यांनी हा भारताचा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे आरोप करत संरक्षण मंत्री म्हणून प्रमोद महाजन पाणी मोठा भ्रष्टाचार केला असल्याची आरोळी ठोकली. प्रचंड वाद झाले. प्रमोद महाजन , गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी हे तिघे मिळून भाजपाला भ्रष्टाचारी पक्ष बनवत असल्याची टीका त्यांनी केली. त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं.
फक्त तेरा दिवसांच्या मंत्रिपदाच्या काळात महाजनांनी २५० कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप बनवारीलाल पुरोहित यांनी केला.
प्रमोद महाजनांचे मित्र समजले जाणारे जेष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनी ‘ते तेरा दिवस’ या शीर्षकाचा अग्रलेख लोकसत्तात लिहून महाजनांच्या हडेलहप्पीवर टीका केली होती. हि आठवण सांगताना ते म्हणतात,
त्या वेळी संतापून जाऊन प्रमोद महाजनांनी लोकसत्ताच्या चालकांकडे माझी तक्रार केली होती… पुढे प्रत्यक्ष भेटीत मात्र त्याचा राग निवळलेला दिसला.
पण बनवारीलाल पुरोहित यांना त्यांनी माफ केलं नाही. बनवारीलाल पुरोहित यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. इतकंच नाही तर चॅलेंज लावून भाजप शिवसेनेचे ११ खासदार त्यांनी पाडले.
हे ही वाच भिडू.
- महाजनांशी उद्धव ठाकरेंनी बोलणं बंद केलं होतं, वाद मुख्यमंत्रीपदाचाच होता..
- मुंडे महाजनांनीच वरुण गांधीला भाजपमध्ये आणलं होतं..
- मुंडेंचा सलग चार वेळा १ मताने पराभव झाला होता, तो ही त्यांचे मित्र प्रमोद महाजन यांच्या हातून..