त्या एका कार्यक्रमानंतर बसलेला सेटबॅक महाजनांना परत कधी भरून काढता आला नाही..

महाराष्ट्राचे जे काही मोजके पंतप्रधान पदाला धडक देऊ शकत होते असं म्हणतात यात प्रमुख नाव येत प्रमोद महाजनांचं. संघाच्या मुशीत तळागाळातून तयार झालेलं त्यांचं नेतृत्व होतं. आपलं अफाट वक्तृत्व, संघटन शक्ती, करिष्माई व्यक्तिमत्व यामुळे महाजन अगदी कमी वयात भाजपच्या मोठ्या पदावर जाऊन पोहचले.

फक्त दोन खासदारांचा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहचवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. भाजपमध्ये सरसंघचालकापासून ते मराठवाड्यातील एखाद्या साध्या कार्यकर्त्यापर्यंत आणि अडवाणींपासून ते अटलजींपर्यंत सगळ्यांशी त्यांचे चांगले नाते होते. भाजपच्या दुसऱ्या फळीचे सर्वात आघाडीचे नेते म्हणून त्यांना ओळख मिळाली होती.

मात्र एक घटना घडली ज्यामुळे पंतप्रधानपद राहिलं बाजूला पण त्यांना आपलं मंत्रिपद देखील सोडावं लागलं होतं.

२८ डिसेंबर २००२, भारताचे सुप्रसिद्ध उद्योगपती स्व.धीरूभाई अंबानी यांच्या जयंती निमित्त पोस्टातर्फे तिकीट प्रकाशित केलं जाणार होतं. धीरूभाई अंबानी यांचे याच वर्षी जुलै महिन्यात निधन झाले होते. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ मुंबईत एक मोठा समारंभ आयोजित करण्यात आला होता. मुकेश अंबानी अनिल अंबानी आपली आई कोकिलाबेन अंबानी यांच्यासह उपस्थितीत होते. मुंबईचे सर्व मोठे सेलिब्रिटी या कार्यक्रमासाठी हजर झाले होते.

माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री म्हणून प्रमोद महाजन यांच्या हस्ते तिकिटाच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. प्रमोद महाजन आणि अंबानी कुटुंबाची चांगली मैत्री होती. त्यामुळे महाजन यांनी भावनाच्या आवेगात भाषण केलं. त्यावेळी बोलताना त्यांनी अंबानींचं कर्तृत्व, भारतीय अर्थव्यवस्थेसाठीच योगदान याबद्दल अनेक प्रशंसोद्गार काढले.

त्यावेळी महाजनांनी स्व.धीरूभाई अंबानी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी केली. बोलता बोलता मात्र भावनेच्या भरात त्यांचा तोल सुटला आणि ते म्हणाले,

“नाचने गाने वालोंको अगर ये पुरस्कार मिल सकता है तो धीरूभाई अंबानी को ये पुरस्कार जरूर मिलना चाहिये.”

त्यांचा इशारा नुकताच पुरस्कार मिळालेल्या लता मंगेशकर, शेहनाई वादक बिस्मिल्ला खान यांच्याकडे होता कि काय असा अर्थ मीडियाने काढला. प्रचंड टीका झाली. आधीच महाजनांचे रिलायन्सशी असलेले व्यवहार हे संश्यास्पद असल्याची चर्चा होती त्यात त्यांनी बोलले हे वाक्य आत्मविघातक ठरले.

ज्या अमोघ वाणीसाठी महाजन ओळखले जायचे त्याच वक्तृत्वाने त्यांना अडचणीत आणलं.

महाजनांचे पक्षातील आणि पक्षाबाहेरचे विरोधक याच संधीची वाट बघत होते. विशेषतः उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांचा काही काळापासून प्रमोद महाजनांवर रोष होता. आपल्या टीकाकारांकडे व असूयाकारांकडे महाजन करत असलेल्या तुच्छतापूर्ण दुर्लक्षामुळे संघ परिवारात त्यांचे विरोधक उभे झाले होते. त्यांचा आत्मविश्वास अनेकांना अहंकार वाटू लागला होता. यामुळेच त्यांचे पंख ठेचायचे असे पक्ष नेतृत्वाने मनावर घेतले होते.

प्रमोद महाजनांना घायाळ करण्यासाठी बाण हातात घेतले अरुण शौरी यांनी व्हीएसएनलचे लायसन्स देताना रिलायन्सला माहिती प्रसारण मंत्री म्हणून महाजनांनी झुकत माप दिल आहे अशी टीका सुरु केली.

करलो दुनिया मुठ्ठी में अशी घोषणा करत रिलायन्स मोबाईलचा उधळलेला वारू अनेकांच्या डोळ्यात खुपत होता.

जे प्रमोद महाजन पक्षनिधी गोळा करण्यासाठी पक्षाचे लाडके बनले होते  घेतले तेच महाजन मोठे होऊ लागल्यावर पक्षाला डोईजड वाटू लागले. अशातच शिवानी भटनागर खून खटल्यात देखील महाजनांच्या चारित्र्यावर राळ उठवली जात होती. सगळ्याच गोष्टी महाजनांच्या विरुद्ध गेल्या.

त्यात त्यांनी खुलेआम केलेली अंबानींसाठी भारतरत्नची मागणी हा शेवटचा दगड ठरली.

वाजपेयींना त्यांच्या इच्छेविरुद्ध प्रमोद महाजन यांना मंत्रिमंडळ विस्तारात नारळ द्यावा लागला. प्रमोद महाजनांविरुद्ध आघाडी उघडणारे अरुण शौरी हेच माहिती व प्रसारण विभागाचे मंत्री झाले. महाजन यांना पक्ष संघटनेत पाठवण्यात आलं. मात्र ते डगमगले नाहीत. पत्रकार परिषदेत त्यांनी आपले मंत्रिपद गेले हि एकप्रकारची बढतीच असल्याचं सांगितलं.

त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आलेल्या चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये तीन ठिकाणी भाजपला विजय मिळाला. वाजपेयींना आपल्या लक्ष्मणावरचा विश्वास पुन्हा उफाळून आला. महाजन यांच्या आग्रहाखातरच मुदतपूर्व लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. महाजन यांनीच शायनिंग इंडियाचे कॅम्पेनिंग डिझाईन केलं. याच कॉन्फिडन्सला जनतेकडून साथ मिळाली नाही.

वाजपेयींना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. या सगळ्याच खापर पुन्हा प्रमोद महाजनांवर फुटलं. एकूणच त्यांच्या नेतृत्वाला तडा बसला. भावी नेतृत्वाच्या शर्यतीतून ते काहीसे बँक फुटला गेले. या सगळ्याला कारणीभूत ठरली होती त्या दिवशी त्यांनी केलेली धीरुभाई अंबानींना भारतरत्नची मागणी.

पण प्रमोद महाजन यांचं राजकारण एवढ्या सहजासहजी संपणारं नव्हतं. पक्षातले विरोधक त्यांच्याविरुद्ध मोर्चेबांधणी केली होती मात्र महाजन पुन्हा कमबॅक करतील अशीच शक्यता दिसत होती. पण अशातच त्यांच्या भावाने त्यांची हत्या केली आणि सगळ्याला पूर्णविराम मिळाला.

हे हि वाच भिडू.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.