संघाच्या अण्णा जोशींना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडून आणलं होतं.

पुण्याच्या सामाजिक आणि राजकीय कार्यांत अनेक बड्या नेत्यांचं योगदान आहेत. ज्यांनी इथल्या विकासात सुद्धा हातभार लावला. पुण्याने अनेक नेते पहिले, त्यांच्या निवडणूक, लढाया आणि विरोधही पहिला. आपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ उतरणारी नेतेमंडळी सुद्धा पहिली. यात एक नेते असे होते, ज्यांना निवडून द्यायला विरोधकांनी सुद्धा समर्थन दिल होत.

ते नेते म्हणजे अण्णा जोशी. त्यांचा जन्म पुण्यातला. अण्णांवर लहानपणापासून संघाच्या शाखेचे संस्कार झाले. पुणे विद्यापीठात त्यांच एमएस्सी पर्यंत शिक्षण झालं होतं. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली आणि त्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यां तरुणांमध्ये अण्णा जोशी आघाडीवर होते. त्यांना अठरा महिन्यांची शिक्षा झाली. या कारावासातुन ते बाहेर आले ते हिरो बनूनच.

अण्णा जोशी नगरसेवक म्हणून महापालिकेच्या राजकारणात सक्रिय होतेच पण त्यांना १९८० साली पुण्याच्या शिवाजीनगर येथून भाजपच्या आमदारकीचं तिकीट देण्यात आलं. अण्णांच्या विरोधात काँग्रेसच्या जयंत टिळक यांनी सुप्रसिद्ध लेखक ग.दि.माडगूळकर यांचे चिरंजीव श्रीधर माडगूळकर यांना तिकीट दिल होतं.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत अण्णा जोशींनी माडगुळकरांचा ६०० मतांनी पराभव केला. पुन्हा १९८५ साली अण्णांनी या मतदारसंघावर आपली पकड घट्ट केली. अण्णांची वाढती लोकप्रियता पाहून त्यांना १९८९ साली पुणे लोकसभेचे तिकीट देण्यात आले.

तो पर्यंत पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. मोहन धारिया, विठ्ठलराव गाडगीळ असे दिग्गज नेते येथे निवडून आले होते. यावेळी काँग्रेसने पुन्हा विठ्ठलराव गाडगीळ यांना तिकीट दिलं होतं. नरहर गाडगीळ यांच्या काळापासून शहर काँग्रेसवर गाडगीळ घराण्याची मजबूत पकड होती. विठ्ठलराव म्हणजे इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात मोठ्या पदावर राहिलेले अनुभवी नेते.  

विठ्ठलराव गाडगीळ यांच्या विरुद्ध डिपॉजिट जरी वाचलं तर भरपूर झालं अशी भाजप उमेदवाराची धारणा असायची.

पण यावेळच्या निवडणुकीत रंग वेगळा होता. अण्णा जोशींनी आमदार म्हणून केलेलं काम तिथल्या नागरिकांना माहित होतं. त्यांचा जनसंपर्क प्रचंड होता, याकाळात त्यांची लोकप्रियता शिखरावर होती या उलट विठ्ठलराव गाडगीळ यांच्या रामजन्म भूमी बद्दलच्या भूमिकेबद्दल पुण्याच्या जनतेत रोष होता. याचा परिणाम मतपत्रिकेवर दिसून आला.

विठ्ठलराव गाडगीळ १९८९ ची लोकसभा निवडणूक जिंकले मात्र फक्त अवघ्या ९ हजार मतांनी. पहाटे पाच वाजेपर्यंत मत मोजणी सुरु होती.

अनुभवाच्या जोरावर गाडगीळांनी अण्णा जोशींना हरवलं मात्र त्यांनी निकालानंतर जोशींची भेट घेऊन खास कौतुक केलं.

त्याकाळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शरद पवार. ते तेव्हा काँग्रेसमध्ये असले तरी पक्षातच वेगवेगळे गट सक्रिय होते. विठ्ठलराव गाडगीळ यांचं काँग्रेसमध्ये दिल्लीमध्ये देखील वजन होत. गडगीळांच्या विरोधात पवार गट आक्रमक होता. गाडगीळांना पाडण्यासाठी पवारांनी अण्णा जोशींना आतून मदत देण्यास सुरुवात केली.

नागपूरच्या अधिवेशनात तो शेवटचा दिवस होता. त्या दिवशी मुख्यमंत्री शरद पवार यांनी प्रमोद महाजन यांना अण्णा जोशींना उपाध्यक्षपदाची  जागा देतो असे जाहीर केले. त्यांनतर शरद पवार, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे त्यावेळचे अध्यक्ष मधुकरराव चौधरी अशी सगळीजण दालनात गेली.

आत गेल्यावर अण्णा जोशी यांचा फॉर्म भरून घेतला आणि सभागृहात आल्यावरअण्णा जोशी यांची उपाध्यक्ष म्हणून बहुमताने निवड केली. 

त्यावेळचा एक किस्सा आजही चर्चित आहे. शरद पवारांनी प्रमोद महाजनांना विचारले, ‘अण्णा, आमच्यासाठी  काय करणार ‘, तेव्हा  प्रमोद महाजनांनी खणखणीत उत्तर दिलं, ‘शासकीय यंत्रणेत कर्तव्य म्हणून जे काम करायचे ते अण्णा निश्चितपणे करतील, पण सत्तारूढ पक्षाची सोय म्हणून मी अण्णांना काहीही करायला सांगणार नाही.

१९८० ते १९९१ या काळात  अण्णा जोशी तीनदा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले, त्यापैकी १९९० मध्ये अण्णांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यावेळचे असलेले अध्यक्ष मधुकरराव चौधरी हे बराच काळ आजारी असल्यामुळे अण्णांनाच अधिकृत कामे करावी लागली.

त्यांनतर, पुढे १९९१ साली मात्र अण्णा जोशी संपूर्ण तयारीने उतरले. असं म्हणतात की काँग्रेसच्या शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांच्या कार्यकर्त्यांनी गाडगीळ नको म्हणून जोशींचा प्रचार केला. कारण काहीही असो अण्णा जोशी यांनी विठ्ठल गाडगीळ यांच्या सारख्या दिग्गज नेत्याला चारी मुंड्या चीत केले. अण्णा जोशींच्या रूपाने भाजपला पुण्यात पहिला खासदार मिळाला.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.