भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या IAS अधिकाऱ्याचं महाजनांनी तिकीट कापलं याला एक कारण होतं..
साल १९९८. देशाचं राजकारण बदलत होतं. काँग्रेस नेतृत्वहीन झाली होती, तिसरी आघाडी सत्तेत होती पण त्यांचा सुद्धा जोर नव्हता. त्याकाळात फॉर्ममध्ये होती भारतीय जनता पार्टी.
अडवाणींनी दहावर्षांपूर्वी केलेल्या राम मंदिराच्या आंदोलनाला चांगली फळे आली होती. देशाच्या कानाकोपऱ्यात पक्ष पसरत होता. वाजपेयींसारखं अमोघ वक्तृव असणारं सर्वसमावेशक नेतृत्व दिल्यामुळे नव्वदच्या दशकात तरुणाई भाजपकडे आकर्षित होऊ लागली होती.
यावेळी वाजपेयी सत्तेत येणार हे ओळखून अनेक नेते भाजपच्या ऑफिस बाहेर तिकिटासाठी रांग लावत होते. यातच एक नाव होतं, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी.
अविनाश धर्माधिकारी म्हणजे पुण्यातल्या कसबा पेठेत जन्मलेले वाढलेले अस्सल पुणेकर. लहान असल्यापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव त्यांच्यावर होता. जवळपास दहा वर्ष विविध संघटनाचा कार्यकर्ता म्हणून भारतभर काम केलं होत. पंजाबच्या खलिस्तानवादी आंदोलनापासून ते ईशान्य भारतातील फुटीरतावादी चळवळ यात प्रत्यक्ष जाऊन तिथला अनुभव घेतला होता.
१९८६ साली त्यांनी सर्वात अवघड अशी यूपीएससी परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात आयएसएस बनले.
महाराष्ट्रातून ते पहिले आले होते. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र केडर मिळाले होते. रायगड जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सनदी अधिकाऱ्यांना आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात कधी पोस्टिंग मिळत नाही. पण तरीही त्यांची पात्रता पाहून शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर पुण्याचा अतिरिक्त कलेक्टर ही जबाबदारी दिली गेली.
मनोहर जोशी मुख्यमंत्री बनल्यावर त्यांची नियुक्ती डेप्युटी सेक्रेटरी म्हणून करण्यात आली. अतिशय कमी वयात या महत्वाच्या पदावर जाण्याचा एकप्रकारचा विक्रम त्यांनी केला होता. पण १९९६ साली काही कारणास्तव त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. महाराष्ट्रातून सनदी अधिकारी घडावेत यासाठी पूर्णवेळ द्यायचं ठरवलं. यातूनच चाणक्य मंडल या क्लासची सुरवात केली.
अविनाश धर्माधिकारी हे संघ विचाराना जवळचे होते. त्यांची इमेज प्रशासनात स्वच्छ काम केलेला अधिकारी अशी होती. पुणेकरांसाठी तर ते हिरो होते. त्यांना राजकारणात उतरण्याची इच्छा होणे साहजिक होते. धर्माधिकारी यांनी पुण्यातून खासदारकीची तयारी सुरू केली. भाजप आपल्या उमेदवारीला पाठींबा देईल अशी त्यांना अपेक्षा होती. पण झाले उलटेच.
पार्टी हायकमांडकडून संदेश आला,
“पुण्यातील कार्यकर्त्यांना त्यागाची संधी आहे”
भाजपाने पुण्याहून उमेदवार तर दिलाच नाही वरून अटलबिहारी वाजपेयी यांनी निवडून येण्याचे मेरीट तपासून कलमाडी यांना पाठींबा जाहीर केला. धर्माधिकारी यांच्यासाठी हा धक्काच होता. वाजपेयी हे फक्त पाठींबा जाहीर करून थांबले नाहीत तर त्यांनी कलमाडी विजयी व्हावेत यासाठी पुण्यात त्यांनी जंगी सभादेखील घेतली.
अविनाश धर्माधिकारी यांनी तरीही अपक्ष उमेदवार म्हणून आपला फॉर्म भरला. ते जेव्हा प्रचाराला पुण्यात बाहेर पडले तेव्हा त्यांच्या अगदी जवळच्या माणसांनी त्यांना सांगितलं,
“तुमचे आमचे चांगले संबंध आहेत पण आम्हाला वरून आदेश आहेत की कलमाडींना मतदान करा.”
माजी खासदार अण्णा जोशींचा विरोध होता मात्र तो मोडून काढण्यात आला. आमदार गिरीष बापटांपासून ते संघाच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यापर्यंत कोणीही धर्माधिकारी यांना मतदान केलं नाही तर उलट कलमाडींना आपली मते दिली. इतकं करूनही भाजप पुरस्कृत सुरेश कलमाडी पडले, अपक्ष उभे राहिलेले माजी आयएएस अधिकारी धर्माधिकारी पडले आणि निवडून आले काँग्रेसचे विठ्ठलराव तुपे.
अविनाश धर्माधिकारी यांना उमेदवारी दिली असती तर कदाचित चित्र वेगळं असतं. पण याची कल्पना असूनही भाजपने त्यांना तिकीट का दिल नाही याच कोडं खुद्द धर्माधिकारींसकट अनेकांना पडलं होतं.
या प्रश्नाचे उत्तर होते भाजपचे चाणक्य म्हणवले जाणारे प्रमोद महाजन.
खरं तर धर्माधिकारी यांच्याप्रमाणे प्रमोद महाजन हे देखील संघाशी जवळचं नातं असणारे नेते होते. भाजपच्या राष्ट्रीय राजकारणावर त्यांची मजबूत पकड होती. अटलजींच्या पासून ते अडवाणींपर्यंत सर्व मोठे नेते त्यांच्या शब्दाबाहेर नव्हते. भाजपचे मुख्य रणनीतीकर असणाऱ्या महाजनांना वाजपेयींचे लक्ष्मण म्हटलं जायचं.
भाजपचे भविष्यकाळातील पंतप्रधान अशी महाजनांची ओळख होती.
प्रमोद महाजनांचे अविनाश धर्माधिकारी यांच्याशी कोणतेही वैयक्तिक वाद नव्हते. संघाची भली मोठी ताकद असलेल्या पुण्यात भाजपकडे उमेदवार देखील नव्हता तरी महाजनांनी धर्माधिकारी यांना तिकीट का दिलं नाही हा प्रश्न एकदा एका जेष्ठ संपादकांना पडला.
एकदा दिल्लीत त्यांची प्रमोद महाजनांशी भेट झाली. त्यांच्या निवासस्थानी दोघांच्या अनौपचारीक गप्पा सुरु होत्या. त्यावेळी संपादकांनी थेट महाजनांच विचारलं,
“तूच त्या ख्यातनाम अधिकाऱ्याचं तिकीट कापलंस बरोबर ना?”
त्यावेळी प्रमोद महाजनांनी शांतपणे होकार दिला. संपादकांना कळेना, त्यांनी का म्हणून विचारलं. महाजन यावर उत्तरले,
“कारण उघड आहे. त्याने आपल्या गोपीनाथच्या मार्गात अडसर उभा केला असता. गोपीनाथचा मार्ग आपल्याला प्रशस्त व खुलाच असायला हवा.”
गोपीनाथ मुंडे लोकनेते होते. फक्त दोन खासदार असणाऱ्या पक्षाला त्यांनी आणि महाजनांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवलं होतं. दोघांची मैत्री गाढ होती. अगदी तळागाळातून त्यांनी कार्यकर्ते घडवले.
शेठजी आणि भटजींचा पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या पक्षाला बहुजन समाजापर्यंत नेण्यात गोपिनाथ मुंडे यांची मेहनत होती. आयुष्यभर त्यांनी घेतलेल्या कष्टाचा अचानक नव्याने पक्षात आलेल्या नेत्याने फायदा उठवणे महाजनांना पटणारे नव्हते. म्हणूनच पुढे गोपीनाथ मुंडे यांना आव्हान ठरेल असे वाटणाऱ्या अविनाश धर्माधिकारी यांचा त्यांनी आधीच पत्ता कट केला.
हे ही वाच भिडू.
- मोरारजी देसाईंना चप्पल मारून कलमाडींनी राजकारणात धडाक्यात एन्ट्री केली होती.
- पक्ष कोणताही असो उदयनराजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे गोपीनाथ मुंडेच होते.
- बाळासाहेबांनी मुंडेंना टिळा लावला आणि बजावलं, भगवा आयुष्यभर सोडू नको