कोणालाच विश्वास नव्हता, तेव्हा प्रमोद महाजनांनी चॅलेंज देऊन भाजपची सत्ता आणली..

भाजपची आज देशभर घोडदौड सुरु आहे. कधी नव्हे ते पक्षाचे लोकसभेत ३०० हुन अधिक खासदार आहेत. सलग दुसरी टर्म पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आहेत. त्यांची लोकप्रियता पाहता अजून बराच काळ ते देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहतील हे निश्चित आहे,

काल पश्चिम बंगालच्या लागलेल्या निवडणुकीत त्यांनी ० पासून ७८ आमदारापर्यंत मारलेली घोडदौड निश्चितच कौतुकास्पद आहे. संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तळागाळात पोचलेत. एकेकाळी फक्त शेठजी व भटजींचा पक्ष म्हणून चेष्टा केली जात होती पण सध्या तरी ते चित्र बदलून गेलंय.

मात्र आज दिसणारे भाजपचे यश हे एका रात्रीत निर्माण झालेले नाही. त्या पाठीमागे अनेक नेत्यांनी केलेले कष्ट आहेत. यातच प्रमुख नाव येते कै. प्रमोद महाजन यांचं.

मुंबई मधल्या सुप्रसिद्ध हॉटेल प्रीतमचे मालक कुलवंतसिंग कोहली यांनी एकेठिकाणी सांगितलेला हा किस्सा. ते मुंबईच्या पंजाब असोशिएशनचे अध्यक्ष होते. या निमित्ताने राजकीय वर्तुळात त्यांचा वावर होता. भारतीय जनता पक्षाचे बराच काळ खजिनदार असणारे माजी केंद्रीय मंत्री वेदप्रकाश गोयल यांच्या घरी एकदा ते एका तरुणाला भेटले.

वेदप्रकाश गोयल यांनी त्यांची ओळख करून दिली,

हा आहे प्रमोद महाजन, मराठवाड्यातला एक अतिशय उत्साही स्वयंसेवक आहे.

प्रमोद महाजन तेव्हा जेमतेम २५-३० वर्षांचे असतील. पण चेहऱ्यावरचं तेज आणि उत्साह लपत नव्हता. दोघांचे स्वभाव मोकळेढाकळे होते. त्याच दिवशी त्यांच्या चांगल्या गप्पा झाल्या.

पुढे काही वर्षांनी वेदप्रकाश गोयल यांच्या घरीच त्यांची दुसऱ्यांदा भेट झाली. ते आपणहून गोयल यांच्याजवळ आले. हसून नमस्कार केला व म्हणाले,

‘‘ओळखलंत का मला? मी प्रमोद महाजन.’’

तोवर ते भारतीय जनता पक्षाचे एक उदयोन्मुख नेतृत्व म्हणून नावाजलं जाऊ लागले होते.

आणीबाणीच्या काळात त्यांना कारावास झाला होता. तिथून बाहेर आल्यावर गोपीनाथ मुंडे यांना सोबत घेऊन त्यांनी राज्यभर कार्यकर्ते जोडण्याचा धडाका लावून दिला होता. त्यांचं वक्तृत्व अमोघ होतं, समोरच्याच्या काळजाला हात घालण्याचं टेक्निक त्यांना अचूक साधलं होतं.

कुलवंतसिंग कोहली यांच्या सोबत त्यांची गाढ मैत्री झाली. महाजन मुंबईला असले की नेहमी त्यांच्या प्रीतम हॉटेलवर जेवायला जाऊ लागले. पुढे या मैत्रीचं कौटुंबिक जिव्हाळ्यात रूपांतर झालं.

एकदा गप्पांच्या ओघात महाजनांना कळालं की कुलवंतसिंग यांना बहिण नाही म्हणून त्यांनी थेट आपल्या बहिणीला त्यांना राखी बांधायला लावली. प्रज्ञा मुंडे यांनी देखील आपल्याला एक नवीन भाऊ मिळाला म्हणत तेव्हा पासून दरवर्षी त्यांना रक्षाबंधनाला राखी बांधायला सुरवात केली.

नाती जपण्यात प्रमोदजी अव्वल होते. संघाचे स्वयंसेवक असणाऱ्या प्रमोदजींना भारतीय जनता पक्षाचं कार्य करण्यास सांगण्यात आलं. त्यावेळी भाजपचे फक्त दोन खासदार निवडून आले होते. कुलवंतसिंग कोहली त्यांना गमतीत म्हणाले,

‘‘यार, सिर्फ दो आ गये! ऐसे कैसे चलेगा?’’

प्रमोद महाजन तेव्हा आत्मविश्वासाने म्हणाले, ‘

‘कुलवंतजी, देखिये- बीस साल के अंदर हम अपनी सरकार बनायेंगे.’’

आणि तसंच घडलं!

प्रमोद महाजन यांनी लालकृष्ण अडवाणींना रथयात्रा काढायला लावली. शिवसेनेबरोबर युती करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीची पायाभरणी देखील त्यांनीच केली. त्यांनी व गोपीनाथ मुंडेंनी केलेल्या प्रयत्नांमुळे बहुजन समाजातील तरुण मोठ्या प्रमाणात पक्षाशी जोडले गेले.

यशात ते हुरळून गेले नाहीत आणि अपयशात खचले नाहीत. त्यांच्यावर राजकारणात काही वेळा आडवाटेने जाण्याच्या त्यांच्या निर्णयावर कित्येकदा टीका व्हायची. उद्योगपतींशी असलेल्या मैत्रीवरून अनेक आरोप व्हायचे. विरोधकांबरोबर स्वतःच्या पक्षातील नेते टीका करू लागले तरी महाजन डगमगायचे नाहीत.

१९९५ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वीची गोष्ट. कुलवंतसिंग कोहली आणि प्रमोद महाजन आपल्या हॉटेलमध्ये गप्पा मारत बसले होते. साहजिकच निवडणुकांचा विषय निघाला. महाजन सहजच बोलतांना म्हणाले,

‘‘यावेळी आमची सत्ता येणार.’’

कुलवंतसिंग कोहली यांना गंमत वाटली. ते हसत हसत म्हणाले,

‘‘प्रमोद, दिवास्वप्न पाहू नका. हे खूप अवघड आहे.’’

त्यावेळी राज्यात शरद पवारांचे काँग्रेस सरकार सत्तेत होते. पवारांसारख्या दिग्गज नेत्याला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचणे एवढे सोपे नव्हते.

पण तरी प्रमोद महाजन ठामपणे म्हणाले, ‘

‘बघालच तुम्ही. बाळासाहेब आणि आम्ही सारे जशी योजना करतो आहोत, त्याप्रमाणे माझी गणितं सांगताहेत की आम्ही सरकार बनवणार!’

कुलवंतसिंग कोहली पुन्हा हसले. आता मात्र प्रमोद महाजन थोडेसे उखडले आणि  गुश्श्यात म्हणाले, ‘

‘सत्ता आली तर काय द्याल?’’

कोहली म्हणालो, ‘‘मी पैजा लावणारा जुगारी नाही. मी आहे साधा हॉटेलवाला. सर्वाना जेवण देईन!’’

नंतर कामाच्या ओघात ते हे विसरून गेले. १९९५च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्या दिवशी संध्याकाळी नवनिर्वाचित सेना-भाजप आमदारांची सेनाभवनमध्ये बैठक होती. बैठक सुरू होण्यापूर्वी सहा वाजता प्रीतम हॉटेल मध्ये प्रमोदजींचा फोन आला,

‘‘कुलवंतजी, लक्षात आहे ना?’’

कुलवंतसिंग कोहली थोडासे गडबडले.

‘‘काय लक्षात आहे ना?’’

त्यांना कळेचना प्रमोद महाजन काय मागत आहेत. यावर हसत हसत महाजन म्हणाले,

‘‘अच्छा? पार्टी द्यायची वेळ आली तर आता विसरलात काय? आपली पैज लागली होती, आमची सत्ता आल्यावर तुम्ही आमच्या सर्व मंडळींना जेवण देणार होता! आज संध्याकाळी आम्ही येतोय.’’

कोहली यांना एकदम आठवलं. ते लगेच उद्गारले, ‘‘अच्छा, ते होय. हो, हो. या. मी तयारी करतो.’’

प्रमोदजींचा शब्द होता तो! खाली कसा पडू द्यायचा? असं म्हणत कुलवंतसिंग कोहली यांनी त्या संध्याकाळी निवडून आलेल्या सर्व आमदारांसाठी आणि नेत्यांसाठी प्रीतमच्या टेरेसवर जोरदार पार्टी दिली. त्याप्रसंगी बोलताना प्रमोद महाजन म्हणाले,

‘‘माझी आणि कुलवंतजींची पैज लागली होती, की आमचं सरकार आलं की त्यांनी सर्वाना पार्टी द्यायची. आणि मी ती पैज  जिंकलोय!’’

यावर कुलवंत सिंग कोहली म्हणाले,

‘‘प्रमोद, तुम्ही अशाच पैजा जिंकत राहा. मला त्या कायम हरत राहायला आवडेल!’’

संदर्भ- कुलवंतसिंह कोहली मुंबई मेरी जान लोकसत्ता 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.