तुरुंगात असतानाच प्रत्येकाला कळालं होतं प्रमोद देशपातळीवरचा मोठा नेता होणार आहे.

आणीबाणीचा काळ. नाशिक रोड केंद्रीय कारागृहातली तिसऱ्या क्रमांकाची बराक. एका बराकीत वीस पंचवीस कैदी. हे सगळे साधे कैदी नव्हते तर राजकीय कैदी होते.  यात पंचांगकर्ते धुंडिराजशास्त्री दाते यांचा देखील समावेश होता.

एका अशाच दुपारी शास्त्रीबुवांच्या कॉटभोवती आठदहा स्थानबद्ध गोळा झाले होते. त्यांतल्या एका तरुणाच्या उजव्या हाताचा तळवा शास्त्रीबुवा जवळच्या जाड भिंगातून पाहात होते. तो तरुण त्यांना म्हणत होता,

‘तुम्ही म्हणता म्हणून मी हात दाखवतो. एरव्ही माझा या गोष्टीवर काडीचाही विश्वास नाही.’ 

दाते शास्त्री त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाले,

‘… शिक्षण पदवीपुरते. पण राजकारणात भविष्य आहे. सत्तेची मोठी पदे वाट्याला येतील एवढी उंची तुम्ही गाठणार आहात.’

यावर तो तरुण म्हणाला,

‘एवढे सांगितले तर हेही सांगा, मी या देशाचा पंतप्रधान कधी होईन?’

यावर मात्र शास्त्रीबुवा अडखळले. ते त्याचा हात सोडत म्हणाले,

‘ते मला सांगता यायचे नाही, पण तुमचे त्या क्षेत्रातले योग उच्चीचे आहेत.’

गंमत म्हणून भविष्य पाहणाऱ्या त्या तरुणाच्या हातावरच्या सगळ्या गोष्टी खऱ्या ठरल्या. एकेकाळी भारताच्या राजकारणाच्या नाड्या त्याच्या हातात होत्या. अगदी संरक्षण मंत्रीपद देखील भूषवलं. देशाचे पंतपधान त्याला लक्ष्मण म्हणायचे.

विरोधी पक्षावर देखील आपल्या राजकारणाची वक्तृत्वाची मिठास वागण्याची छाप सोडणारे प्रमोद महाजन.

आंबेजोगाई सारख्या मराठवाड्यातील छोट्याशा गावचा, तिथल्या खोलेश्वर महाविद्यालयात इंग्रजी विषय शिकवणारा हा शिक्षक राजकारणाच्या एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहचेल, असं त्याच्या आधी तर कोणाला वाटलं नव्हतं पण आणीबाणीच्या काळानंतर मात्र प्रत्येकाची खात्री पटली.

आणीबाणीचा कालच मोठा धामधुमीचा होता. इंदिरा गांधींनी अनुशासन पर्व असं म्हणत ही हुकूमशाही लादली आणि जनतेतील असंतोष बाहेर आला. आपल्या विरुद्धची मते बाहेर येऊ नयेत म्हणून सरकारने माध्यमांवर बंधने टाकली होती. विरोधी भूमिका घेणाऱ्या प्रत्येकाला जेलमध्ये टाकले.मोहन धारिया, अनंतराव भालेराव, बापू काळदाते, गोपीनाथ मुंडे असे वेगवेगळ्या पक्षाचे विचारसरणीचे कार्यकर्ते सत्याग्रही जेलमध्ये बंद झाले होते.

यांच्याबरोबरच कारावासात बंदी झालेले जेष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनी साधना मासिकात आपल्या प्रमोद महाजन यांच्या विषयीच्या आठवणी सांगितल्या आहेत.

गोपीनाथराव मुंडे वेगळ्या बराकीत बंद होते. प्रमोद महाजन इतरांच्या पेक्षा थोड्या उशिराच जेलमध्ये आले. त्याकाळी ते भूमिगत असल्याचे सांगितले जात होते. तेव्हा ते फारसे प्रसिद्धही नव्हते. फक्त संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र त्यांची चर्चा होती.

त्यांनी संघ स्वयंसेवक म्हणून उपसलेल्या कष्टाच्या, विद्यार्थी परिषदेचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर सभोवती उभ्या राहिलेल्या वलयाच्या, वक्तृत्त्वाच्या बळावर संघटनेतील साऱ्या जुन्यांना मागे टाकण्याच्या, माणसे जोडत जाण्याच्या हातोटीच्या कथा दंतकथा ते जेलमध्ये येण्यापूर्वीच तिथपर्यंत पोहचल्या होत्या.

द्वादशीवार सांगतात,

त्याला तुरुंगात प्रथम पाहिले तेच मुळी सळसळत्या चैतन्यासारखे. उंच, सडपातळ पण उत्साहाने भरलेली देहयष्टी. डोळ्यांत ज्ञानाचे तेज, अध्ययन व आकलनाचा अधिकार सांगणारी जाणीव. चेहऱ्यावर देखणा आर्जवी भाव. हालचालीत ऐट आणि प्रत्येक आविर्भाव आत्मविश्वासानं भारलेला.

आपण इथले नाहीत, इथं थांबण्यासाठी आलो नाही, आपला खरा मुक्काम आणखी पुढे आहे आणि तिथवर मी लीलया पोहोचणारही आहे असा सर्वांगावर विश्वास..

प्रमोद महाजन यांच्याहून वरचढ असलेली, संघ परिवारात दीर्घकाळ काम केलेली वडीलधारी माणसेही त्यांना वचकून असायची. त्यांच्या जवळ असलेली प्रचंड महत्त्वाकांक्षा, जिद्द आणि भविष्याविषयीची स्पष्टता, त्याला लागणारे नियोजन व वाटेल ती किंमत मोजून ते अमलात आणण्याची तयारी असे सारे त्यांच्यात होते.

आणीबाणीच्या वेळी तुरुंगात संघाची नियमित शाखा भरे.

अगदी त्यांच्याप्रमाणेच समांतरपणे राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्तेही दरदिवशी सायंकाळी एकत्र जमत. त्यात त्यांच्या नेत्यांची बौद्धिके व व्याख्याने होत. संघाच्या शाखेत प्रल्हादजी अभ्यंकरांपासून बाबासाहेब भिड्यांपर्यंत अनेकजण बोलत. सेवादलाच्या शाखेत बापू काळदाते, अनंतराव यांची व्याख्याने होत.

मात्र त्यांतली नाव घेण्याजोगी भाषणे बापू काळदाते आणि प्रमोद महाजन यांचीच असत.

वैचारिकदृष्ट्या विरोधात असलेल्या बापूंना महाजन यांनी आपला व्याख्यानगुरू मानले होते. तेव्हा आणि नंतरही त्यांच्या गुरुमाहात्म्याची जाहीर व गौरवाने कबुली द्यायला त्यांना कमीपणा वाटायचा नाही.

एखादेवेळी सारेच जेलकर एकत्र येत. त्यात वैचारिक अभ्यास वर्गापासून वादविवाद, परिसंवादासारखे कार्यक्रम होत. अशा एका वर्गात सुरेश द्वादशीवार फ्रान्सच्या राज्यक्रांतीवर आणि प्रमोद महाजन हे कम्युनिस्ट नेते तत्वज्ञ मानवेंद्रनाथ रॉय यांच्या तत्त्वचिंतनावर बोलले होते.

अफाट वाचन, एकपाठी स्मरणशक्ती, डोक्यात विश्लेषक यंत्र असावे असे कोणत्याही विषयाचे त्याच्या सर्व बाजूंसह स्वतंत्र आकलन आणि त्याच्या गुणदोषांची स्वतः निश्चित केलेली मांडणी, तर्कशुद्धता, भाषाप्रभुत्व आणि खेचून नेणारे वक्तृत्त्व असे सारेच प्रमोद महाजनांजवळ होते. तुरुंगातल्या व्याख्यानांनाही त्यांचा एक प्रचारकी थाट होता. स्पर्धा जिंकण्याची जिद्द होती. आपण साऱ्यांहून चांगली मांडणी करतो याची जाण त्यांच्या वाक्यावाक्यांतील ओजात दिसायची.

एका सायंकाळी ‘मी आणि माझा पक्ष’ असा परिसंवाद रंगला.

काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीमुळे सारे तुरुंगात आले असल्याने त्या पक्षाची विश्वसनीय वाटावी अशी दमदार बाजू मांडायला कुणी तयार नव्हते. ती जबाबदारी साऱ्यांनीसुरेश द्वादशीवार यांच्यावर टाकली. प्रमोद महाजनांनी जनसंघाचा तर एका समाजवादी तरुणाने त्या पक्षाचा किल्ला लढविला. संघटन काँग्रेस, लोकदल असे बारके पक्षही त्यात होते. परिसंवाद रंगला आणि तुरुंगातली बडी माणसे श्रोत्यांत होती.

शेवटी निकाल लागून सुरेश द्वादशीवार पहिले तर प्रमोद महाजन यांना दुसरे पारितोषिक मिळाले.

जेष्ठ नेते प्रल्हादजी अभ्यंकर यांच्या हस्ते तुरुंगात पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. द्वादशीवार यांना प्लास्टिकची एक थाळी तर महाजनांना एक कप बक्षीस म्हणून देण्यात आला. त्या दिवसापासून त्या दोघांची गट्टी जमली व ती त्यांच्या निधनापर्यंत कायम राहिली.

महाजनांनी तो प्लास्टिकचा कप जेल मधली आठवण म्हणून जपून ठेवला होता.

तुरुंगातले ते दिवस प्रमोद महाजनांचे आयुष्य पालटून देणारे ठरले. नाशिक कारागृहात जाताना ते एक शिक्षक,संघाचे स्वयंसेवक होते मात्र ते बाहेर पडले ते देशाचा मोठा नेता व्हायचं स्वप्न घेऊनच.

संदर्भ – weekly sadhna 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.