मोजून-मापून बोलणाऱ्या प्रमोद महाजनांचे PA मात्र घसरत घसरत गेले…

प्रमोद महाजन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेतृत्व होते. ते महाराष्ट्रातील काही निवडक नेत्यांपैकी एक होते ज्यांचा मागे प्रसिद्धीचं एक वलय होतं. जनतेचा त्यांना पाठिंबा होता. ते अत्यंत धडाडीचे नेते तर होतेच सोबतच ते एक उत्कृष्ट मुत्सद्दि राजकारणी पण होते.

प्रमोद महाजन यांच्या ह्या मोठ्या प्रतिमे मागे त्यांचा मदतीसाठी सदैव तत्पर अशा कार्यकर्त्यांची फौज होती. त्यात त्यांचा स्वीय सहाय्यकांचा चा मोठा वाटा होता.

प्रमोद महाजनांना त्यांचा उभ्या राजकीय कारकिर्दीत “दोन” स्वीय सहाय्यक होते. काळाच्या ओघात त्यांचीच चर्चा जास्त झाली.

पाहिले स्वीय सहाय्यक होते आजचे भाजपाचे आमदार राम कदम, जे सध्या त्यांचा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. दुसरे होते बिबेक मित्रा ज्यांनी 2006 साली ड्रग्स घेऊन आत्महत्या केली. दोन्ही स्वीय सहायक्कांचा महाजन यांच्या आयुष्यात महत्वाचा रोल राहिला होता.

राम कदम

राम कदम हे एका गरीब कुटुंबातील. शाळेत प्रवेश घेतल्यावर त्यांची प्रमोद महाजनांचा मुलाशी म्हणजेच राहुलशी मैत्री झाली. त्यानंतर त्यांचा संबंध भाजपाशी आला. महाजन यांनी त्यांना स्वीय सहाय्यक म्हणून नेमले. या दरम्यान राम कदमांनी आलेल्या संधीचा फायदा घेत मुंबईच्या राजकारणात प्रस्थ निर्माण केलं. खासकरून भाजपामध्ये त्यांचं जोरदार वर्चस्व निर्माण झालं.

प्रमोद महाजनांचा स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी सण १९९९ पर्यंत काम पाहिलं. त्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.

परंतु प्रमोद महाजनांच्या मुलीने देखील तेव्हाच राजकारणात प्रवेश केला त्यामुळे प्रमोद महाजन ज्यांच्या छत्रछायेखाली राम कदम मोठे झाले, त्यांच्याच विरोधात जाणे कदम यांना अशक्य होते. अश्यावेळी भाजपात निर्माण झालेल्या अंतर्गत राजकारणामुळे कदम यांनी भाजपला सोडचिट्ठी दिली. पुढे जाऊन ते मनसेत गेले. 2009 ला आमदार झाले. 2014 ला त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि आज ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. सोबत वादग्रस्त व्यक्ती म्हणून देखील प्रसिद्ध आहेत.

कधी मनसेत असताना मराठीच्या मुद्यावरुन झालेलं निलंबन असो की महिलांविषयी वादग्रस्त विधान असो आणि त्याच्याही पुढे जावून अभिनेत्री सोनाली बेंद्रेला वाहिलेली श्रद्धांजली असो.

नुकताच राम कदम हे पुन्हा ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आले आहेत.

काही दिवसांपूर्वी पवई पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर भाजप आमदार राम कदम यांनी या आरोपींना सोडा, अशी विनंती करणारा फोन मारहाण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याला केला.

दोन थोबाडीत मारा, पण आपसात ही केस सोडवण्याचा प्रयत्न करा असं सांगणारी राम कदम यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. वादग्रस्त विधानांच्या आरोपांचे शुक्लकाष्ट राम कदम यांची पाठ सोडताना दिसत नाही.

प्रमोद महाजनांचे दुसरे सहाय्यक होते “बिबेक मित्रा”, हे अत्यंत हुशार असं व्यक्तिमत्व होतं.

बिबेक यांनी महाजनांचा लोकसंपर्क जपण्यापासून महाजनांच्या आयुष्यातील अनेक वादग्रस्त पेच प्रसंगात त्यांना मोलाची साथ दिली. महाजनांच्या आर्थिक बाबीवर बिबेक यांच पूर्णपणे नियंत्रण होतं. प्रमोद महाजन यांचे अनेक उद्योगपती सोबतचे संबंध देखील मित्रा यांनी जपले होते. महाजन यांच राजकीय आयुष्य संपुष्टात आणण्याचा उंबरठ्यावर नेऊन सोडणाऱ्या शिवानी भटनागर प्रकरणात महाजन यांच्या मागे मित्रा खंबीरपणे उभे राहिले होते.

महाजन यांच्या प्रत्येक मिटिंग, हालचालींची माहिती मित्रा यांना राहायची. यातून मित्रा यांनी भारतीय जनता पक्षात एक वेगळं स्थान देखील निर्माण केलं होतं.

परंतु महाजनांच्या मृत्यूनंतर बिबेक मित्रा यांच्या आयुष्याला उतरती काळ लागला होता. त्यांनी तब्बल 22 वर्ष आधी गोपीनाथ मुंढे नंतर प्रमोद महाजन यांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम केलं होतं. महाजनांच्या हत्येनंतर मी सर्वस्व गमावल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. त्यानंतर मात्र त्यांना व्यसन लागलं.

ड्रग्जचा ओव्हरडोस होऊन नवी मुंबई येथील त्यांच्या घरात मित्रा यांचा मृत्यू झाला. मित्रा यांच्या अंत्यविधीला भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

प्रमोद महाजन यांच आयुष्य दैदिप्यमान राहिलं पण कधीकधी ते हि सोनिया गांधींवर टिका करताना घसरले. जितकं महाजनांच आयुष्य गुढ होतं तितकचं त्यांच्या स्वीय सहाय्यकांचे आयुष्य गुढ राहिले. त्यातल्या त्यात मित्रा यांचा अंत खूप वाईट झाला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.