महाजनांना पत्रकार सांगत होते, ” सेनेशी युती करणे तुमची सगळ्यात मोठी चूक ठरेल”

साल १९८९. भारतीय जनता पक्षाची हिमाचल प्रदेशच्या पालमपूर येथे महाअधिवेशन भरलं होतं. देशभरातून कार्यकर्ते या अधिवेशनासाठी गोळा झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारांना मानणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष या अधिवेशनाकडे लागलं होतं.

असं बोललं जात होतं कि पक्षाचा चेहरा मोहरा बदलणारे निर्णय या अधिवेशनात घेतले जाणार आहेत.

भाजप म्हणजे मूळचा जनसंघ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांवर या पक्षाची स्थापना झाली होती. पण मधल्या काळात इंदिरा गांधींच्या आणिबाणीविरुद्ध देशभरातले विरोधी पक्ष एकत्र आले आणि जनता पार्टीची स्थापना झाली. जनसंघ सुद्धा या नव्या सेक्युलर विचारांच्या पक्षात विलीन झाला होता.   पुढे जनता सरकार कोसळले, अंतर्गत कलह वाढला तेव्हा पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या नेत्यांनी बाहेर पडून नवीन पक्ष स्थापन करायचं ठरवलं. तो म्हणजे भारतीय जनता पक्ष उर्फ भाजप.

सुरवातीला अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची वाटचाल गांधीवादी समाजवादाच्या दिशेने सुरू होती. हिंदुत्वापेक्षा वेगळं धोरण वाजपेयींनी स्वीकारलं होतं. पण याचा त्याना निवडणुकीला फायदा झाला नाही. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसबद्दल आलेल्या सहानुभूतीच्या लाटेत सगळे विरोधी पक्ष वाहून गेले.

भाजपचे तर फक्त दोनच खासदार निवडून आले होते. इतकी दयनीय अवस्था झाल्यामुळे पुढच्या म्हणजेच १९८९ सालच्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना पक्षात मूळाग्र बदल केले जावेत असच सगळ्यांचं म्हणणं होतं.

वाजपेयींची नरमाईची भूमिका सोडून भाजपने कट्टर हिंदुत्व स्वीकारावं अशी मागणी पालमपूरच्या अधिवेशनात करण्यात आली. आणि या मागणीमागे होते पक्षाचे तरुण तेजतर्रार कार्यकर्ते प्रमोद महाजन.

त्याकाळात प्रमोद महाजन लालकृष्ण अडवाणी यांचा उजवा हात म्हणून ओळखले जायचे. पक्ष निवडणूक जिंकत नसतानाही खेडोपाडी फिरून त्यांनी संघटना बांधली होती. आपलं प्रचंड व्यवहार चातुर्य, अमोघ वक्तृत्व, संघटनशक्ती यामुळे अत्यंत कमी वयात ते पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ पोहचले होते.

प्रमोद महाजनांनी या पालमपूरच्या अधिवेशनात दोन मागण्या मांडल्या. एक होती विश्वहिंदू परिषदेच्या रामजन्मभूमी आंदोलनात सहभाग आणि त्यासाठी देशाच्या चारही कोपऱ्यातून सुरु होणारी रामरथ यात्रा. दुसरी मागणी होती शिवसेनेशी युती.

शिवसेना म्हणजे मुंबईत मराठी माणसाचा आवाज म्हणून स्थापन झालेला पक्ष. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वैयक्तिक करिष्म्यावर या पक्षाची वाटचाल सुरु होती. सत्तरच्या दशकात मुंबईत अनेक मराठी तरुण शिवसेनेकडे आकर्षित झाले. पण बाळासाहेब ठाकरे यांची जितकी लोकप्रियता होती तितका निवडणुकीत शिवसेनेचा म्हणावा तेवढा प्रभाव पडत नव्हता.

कम्युनिस्ट पक्षाला विरोध या समान धाग्यामुळे सुरवातीच्या काळात जनसंघ आणि शिवसेना एकत्र आले होते पण त्यांची युती फारकाळ टिकली नाही.

त्यात शिवसेनेला काँग्रेसची वसंतसेना म्हणून ओळखलं जायचं. बाळासाहेबांची  वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई, बॅरिस्टर अंतुले यांसारख्या काँग्रेस नेत्यांशी जवळीक होती.

काँग्रेसचे नेते शिवसेनेला आपल्या फायद्यासाठी वापरून घेत होते. सेनेने इंदिरा गांधींच्या आणीबाणीला देखील पाठिंबा दिला होता. त्यामुळेच भाजपचे नेते बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून काही अंतर राखूनच असायचे. मधल्या काळात फक्त मराठी भाषेच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकता येत नाहीत हे ओळखल्यावर शिवसेनेने १९८७ च्या पोटनिवडणुकीपासून  हिंदुत्वाची कास पकडली आणि त्याचा त्यांना फायदा देखील झाला.

तेव्हाच प्रमोद महाजनांनी सेनेचं महत्व ओळखलं व पालमपुरच्या अधिवेशनात त्यांच्याशी युतीचा प्रस्ताव पक्षापुढे मांडला.

पक्षातील सर्वात जेष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा रामजन्मभूमी आंदोलन आणि शिवसेनेशी  युती या दोन्ही मागण्यांबद्दल विशेष आग्रही नव्हते. कट्टर हिंदुत्व स्वीकारण्याबद्दल तर त्यांचा विरोधच होता. पण लालकृष्ण अडवाणी यांनी जोर लावून या दोन्ही मागण्या मान्य करवून आणल्या.

याच अधिवेशनात भाजपने लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे पुढच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली. पक्षात वाजपेयींपेक्षा त्यांचं महत्व वाढलं आणि याला कारणीभूत ठरले प्रमोद महाजन.

सेनेशी युती करण्याचा भाजपने तर निर्णय घेतला पण अजून बाळासाहेब ठाकरेंची संमती मिळायची होती. त्यासाठी प्रमोद महाजनांना मोहिमेवर पाठवण्यात आलं. महाजन लालकृष्ण अडवाणी यांचा संदेश घेऊन मुंबईत मातोश्रीवर आले. असं म्हणतात कि फक्त अर्धा तास बैठक चालली.

बाळासाहेबांनी एका साध्या कागदावर काही तरी आकडा लिहून दिला आणि महाजनांना तो कोणतीही खळखळ न करता मान्य करावा लागला. प्रमोद महाजन त्या दिवशी युती करूनच मातोश्रीमधून बाहेर पडले.

भावाभावाचा हा संसार सुरु झाला.

पण या निर्णयावर संपूर्ण देशभरातून उलटसुलट चर्चा सुरु झाली. खुद्द वाजपेयी यांची इच्छा नसताना हा निर्णय घेतला गेला होता. महाराष्ट्रात देखील अनेक पत्रकार शिवसेना भाजप युतीवर टीका करत होते. जेष्ठ पत्रकार रामबहादूर राय हे त्यावेळची आठवण सांगताना म्हणतात,

“पहिल्यांदा शिवसेना भाजप युती झाली तेव्हा माझ्या जवळ काही मराठी पत्रकार आले आणि त्यांनी सांगितलं कि या युतीमुळे भाजपचं मोठं नुकसान होणार आहे. शिवसेनेच्या इमेजची काळी छाया भाजपच्या स्वच्छ प्रतिमेवर परिणाम करेल.”

शिवसेनेची प्रतिमा रस्त्यावर उतरून लढणारा पक्ष अशी होती. वेळप्रसंगी शिवसैनिक राडा करण्यास देखील मागे पुढे पाहत नसत. कित्येक दंगलींमध्ये शिवसैनिकांचं नाव झळकत होतं. शिवाय मराठीच्या मुद्द्यामुळे देशाच्या इतर भागातून मुंबईत येणाऱ्या परप्रांतीयांना शिवसेनेबद्दल रागच होता.

रामबहादूर राय हे प्रमोद महाजनांचे मित्र होते. त्यांनी काळजीपोटी महाजनांना भेटून सांगितलं की तुम्ही आता जो निर्णय घेतलाय तो अत्यंत खराब आहे. पण प्रमोद महाजन हसले आणि त्यांनी शिवसेनेशी युतीच महत्व राय यांना पटवून दिलं.

महाजनांचं म्हणणं होतं कि रामजन्मभूमी आंदोलनात शिवसेना भाजपबरोबर उभी आहे. त्यांच्याशी युती आपल्याला भविष्यकाळात फायदेशीरच ठरणार आहे.

झालंही तसंच. १९९५ साली  महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा झेंडा फडकला याच श्रेय शिवसेना भाजप युतीला आणि त्याचे शिल्पकार असणाऱ्या प्रमोद महाजन यांनाच गेलं. पुढे भाजपची केंद्रात सत्ता आली, वाजपेयी पंतप्रधान बनले या सगळ्यात महाजन यांचा महत्वाचा रोल होता. त्यांनी प्रसांगी पडती बाजू घेऊन सेनेशी युती टिकवली. पण महाजनांच्या मृत्यूनंतर मात्र सेने भाजप नेत्यांमध्ये खटके उडू लागले. आणि आज हे दोन्ही पक्ष एकमेकांचे सर्वात मोठे विरोधक म्हणून ओळखले जातात.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.