कार्यकर्ते महाजनांना सांगत होते,” हा काँग्रेसचा सभा उधळण्याचा डाव आहे !!”

गोष्ट आहे १९९१ सालची. सहा महिन्यांचं चंद्रशेखर यांचं सरकार गडगडल्यामुळे लोकसभेच्या  मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागणार होत्या. सत्तेत जनता पक्ष असला तरी मुख्य लढत काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच होती.

रामजन्मभूमीचे आंदोलन पेट घेत होते, भाजपची धुरा लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे होती. त्यांनी सुरु केलेल्या राम रथ यात्रेने संपूर्ण देश हलवून सोडला होता. प्रत्येकाच्या मुखी राम होता आणि याचे कारण लालकृष्ण अडवाणी यांची रथ यात्रा.

बरोबर पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपचे फक्त २ च खासदार निवडून आले होते. पण यावेळी भाजप सत्तेपर्यंत धडक मारते की  काय असेच वाटत होते. याचे प्रमुख कारण होते लालकृष्ण अडवाणी यांचे चाणक्य प्रमोद महाजन.

प्रमोद महाजन यांनीच आग्रह करून भाजपला रामजन्मभूमी आंदोलन हाती घ्यायला लावले होते , रथ यात्रेची आयडिया देखील त्यांचीच होती.

फार कमी वयात भाजपच्या राष्ट्रीय राजकारणाची पकड कमावलेला हा नेता आत्मविश्वासाने भारलेला होता. अटलबिहारी वाजपेयी यांची झलक त्यांच्या वक्तृत्वात दिसते असं म्हटलं जायचं. शेरो शायरी, कविता, हिंदी, इंग्रजी, संस्कृत,मराठी सर्व भाषांवर पकड असणारे प्रमोद महाजन याना भावी पंतप्रधान म्हणून देखील भाजपचे कार्यकर्ते ओळखायचे.

महाराष्ट्रातल्या प्रचारात त्यांची भाषणे गाजत होती. विदर्भ -मराठवाड्यात फिरून त्यांनी भाजपचे स्थान निर्माण केले होते, हजारो कार्यकर्ते जोडले होते. तिथल्या सभांमध्ये खास प्रमोद महाजन यांना पाहण्यासाठी लोक गर्दी करायचे. 

निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा सुरु होत होता. मे महिन्याचे दिवस होते, उन्हा प्रमाणे प्रचार देखील तापला होता.

नाशिकच्या शिवाजी उद्यान येथे प्रमोद महाजन यांची रात्रीची सभा सुरु होती. प्रमोदजी हातवारे करून काँग्रेसच्या अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणापासून भ्रष्टाचारापर्यंत सगळ्या काँग्रेसचे वाभाडे काढत होते, श्रोते तल्लीन होऊन ते ऐकत होते.

सभा ऐन रंगात आली होती आणि अचानक सभेच्या शेवटी श्रोत्यांमधून गडबड-गोंधळ सुरू झाला. प्रमोदजी बोलायचे थांबले. काँग्रेसचे कार्यकर्ते सभेत आले आहेत आणि सभा थांबवा म्हणून आरडाओरडा करत आहेत असं कोणी तरी सांगितलं.

भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते अनेकांना हा काँग्रेसचा सभा उधळण्याचा डाव असावा, अशी शंका आली. काहीच कळायला मार्ग नव्हता. 

तेवढ्यात प्रमोद महाजनांना काँग्रेसचे नाशिकमधले नेते शांतारामबापू वावरे दिसले. ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत व्यासपीठाकडे सरकत होते. भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या आडवे येत होते. शांतारामबापू  ओरडून महाजनांना म्हणाले,

”राजीवजी गांधी यांची हत्या झाली आहे, सभा बंद करा.”

नुकतीच राजीव गांधी यांची महाराष्ट्रात प्रचारफेरी होऊन गेली होती. अचानक त्यांची हत्या झालीय यावर कोणाचाही विश्वास बसण्याचे कारण नव्हते. त्याकाळी मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅप नव्हते. बातमी खरी खोटी करण्याचं कोणतेही साधन नव्हते.

एवढ्या मोठ्या गर्दीची सभा आटोपती घ्यायची आणि तेही प्रतिपक्षाचे एक नेते सांगतात म्हणून. प्रसंग विलक्षण कसोटीचा होता. प्रचंड संख्येने जमलेले कार्यकर्ते नाराज झाले असते. नेमके खरे काय ते कोणालाच कळेनासे झाले होते. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने येऊन हातापायीची वेळ येईल असे वाटत होते. 

यावेळी प्रमोदजींनी दाखवलेली समयसूचकता आणि सभानियंत्रणाचे कौशल्य त्यांच्यातील संसदीय सभ्यतेची, असामान्य नेतृत्वशैलीची आणि नाशिककरांवरील प्रेमाची साक्ष आहे.

”शांतारामबापू वावरे हे माझे जवळचे मित्र आहेत. ते सांगत असलेली माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या हत्येची बातमी खोटी ठरावी, अशी माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे. पण, हा सभा रद्द करण्याचा प्रयत्न असेल तर मित्रहो, उद्या याच ठिकाणी याचवेळी मी माझे उर्वरित भाषण पूर्ण करायला तुमच्या भेटीसाठी हजर आहे. कृपया सर्वांनी अत्यंत शांतपणे, कोणताही गोंधळ न करता आपापल्या घरी परतावे,”

अतिशय अवघड परिस्थिती प्रमोद महाजनांनी डोके शांत ठेवून हाताळली. गर्दी पांगली. गावातल्या वर्तमान पत्राच्या कार्यालयासमोर लोक जमले. पीटीआय, युएनआयच्या टेलिप्रिंटरवर राजीवजींच्या हत्येच्या बातमीचा ‘न्यूज फ्लॅश’ आलेला होता.

संदर्भ- प्रमोदजींना आठवताना निलेश मदाने 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.