शिवसेनेच्या नेत्यानं मुख्यमंत्र्यांना वेषांतर करायला लाऊन राज्यातले गैरप्रकार उघड केलेले

सध्या सोशल मीडियावर एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे वेषांतर. झालं असं की, राज्यात नवं सरकार स्थापन झालं आणि ते कसं झालं? याची उत्सुकता लोकांमध्ये वाढली. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या विधानसभेतल्या भाषणात, “मी आणि देवेंद्र फडणवीस मध्यरात्रीनंतर भेटायचो.” असं विधान केलं.

राज्याच्या विरोधी पक्षनेता राज्याच्या मंत्र्याला रात्री अपरात्री भेटतो आणि याची भनक कुणालाच कशी लागत नाही ? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. माध्यमातल्या काही लोकांना हा प्रश्न पडला आणि त्यांनी उत्तर मागितलं, थेट देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे.

तेव्हा त्यांनी सांगितलं की, “देवेंद्र रात्रीच्या वेळी हुडी आणि चष्मे घालून बाहेर पडायचे. मलाही त्यांना ओळखता यायचं नाही.”

आता फडणवीसांचं वेषांतर होतं, एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठीचं. पण याआधी आपल्या राज्यातल्या दोन नेत्यांची वेषांतरंही चांगलीच गाजली आहेत, त्यातले एक म्हणजे छगन भुजबळ. आता भुजबळांच्या वेषांतराविषयी बोल भिडूनं आधीच लिहून ठेवलेलं आहे. खालच्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही त्याबद्दल वाचू शकताय.

छगन भुजबळ की दुबईचा व्यापारी इक्बाल शेख…?

भुजबळ वेषांतर करुन बेळगावात गेलेले, पण एक मंत्री असे होते जे आपल्याच राज्यातले गैरप्रकार थांबवण्यासाठी वेषांतर करायचे.

हे मंत्री म्हणजे शिवसेना नेते प्रमोद नवलकर. नवलकर म्हणजे राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व. शिवसेना वाढवणाऱ्या नेत्यांचा विषय निघतो, तेव्हा नवलकरांचं नाव अग्रस्थानी असतं. शांत स्वभावाचे नवलकर विधानसभेत भाषणाला उभे राहिले, की सगळं सभागृह स्तब्ध व्हायचं.

दुसऱ्या बाजूला लावलकर हे नावाजलेले स्तंभलेखकही. त्यांचं ‘नवशक्ती’ मधलं ‘भटक्याची भ्रमंती’ हे सदर प्रचंड प्रसिद्ध होतं. सोबतच त्यांनी भ्रमंती नावाचा दिवाळी अंक तब्बल २५ वर्ष प्रकाशित केला.

पण नवलकरांचं नाव चर्चेत असायचं, ते वेषांतरामुळंच. त्यांच्या वेषांतराचे गाजलेले तीन किस्से बघुयात…

भ्रमंतीच्या एका अंकात नवलकरांना ‘ही मुंबई की दुबई’ असा एक लेख लिहायचा होता.एका मध्यरात्री ते फोटोग्राफर घनश्याम भडेकर यांना घेऊन गेट वे ऑफ इंडियाजवळ गेले. गाडीतच त्यांनी पांढरा कुर्ता आणि डोक्यावर गोल टोपी घातली. ते गाडीतून बाहेर पडले आणि तिथले भिकारी त्यांच्याजवळ आले. त्यांनी नवलकरांकडे पैसे मागितले आणि नवलकरांनी चक्क कुर्ता वर करुन पॅन्टच्या खिशात हात घातला. 

त्यांच्या हे लक्षातच आलं नाही, की अरब लोक पायघोळ झगा घालतात. पण सुदैवानं त्यांची ही चूक कुणाच्याच लक्षात आली नाही.

त्यानंतर ते बॉम्बे हॉस्पिटलजवळच्या एका हॉटेलमध्ये गेले, तिथल्या वेटरनं त्यांची प्रचंड आपुलकीनं चौकशी केली. भडेकरांनी फोटो काढले, पण त्यांना नेमकं कारण कळेना.

मग नवलकरांनी सगळं झाल्यावर त्यांना सांगितलं की, “माझ्या ओळखीच्या एका माणसाला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये लिव्हरचं ऑपरेशन करून घ्यायचं होतं. मी त्याला शिफारसपत्रही दिलं, कारण त्याला स्पेशल रुम हवी होती. पण व्यवस्थापनानं रुम रिकामी नसल्याचं सांगून त्याला परत पाठवलं, मात्र त्याचवेळी एक अरबी माणूस बॉम्बे हॉस्पिटलच्या स्पेशल रुममध्ये फक्त तपासणीसाठी लोळत पडलेला होता.”

त्यांचा लेख प्रकाशित झाला आणि साहजिकच हॉस्पिटलचे धाबे दणाणले. नवलकरांच्या वेषांतरामुळं हॉस्पिटलचे धाबे दणाणले होते. हा किस्सा दीपक भडेकर यांनी मार्मिकमध्ये लिहिला आहे. 

दुसरा किस्सा आहे नवलकर परिवहन मंत्री असतानाचा

नेव्ही ब्लू कलरचा साधा टीशर्ट आणि एक पिवळसर रंगाची पँट घालून, साध्या गाडीत बसून नवलकर एकदा पुण्याच्या एसटी स्टॅन्डवर गेले. सोबत बॉडीगार्डही नव्हता. त्यांनी आधी एसटी स्टॅन्डवर फेरफटका मारला, मुद्दाम तिथल्याच कँटीनला जाऊन चहा पितात. जुनं वापरलेलं पाकीट काढून चहाचे पैसे देतात. लोकांच्या नकळत त्यांच्या तक्रारी जाणून घेतात. पण त्यांचे अत्यंत साधे कपडे बघून कुणालाच संशय येत नाही.

काही वेळानं मात्र पोलिसांकडून बातमी पसरते आणि स्टॅन्डवरचे अधिकारी नवलकरांभोवती जमतात. लोकांच्या तक्रारीचा पाढा वाचून ते अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढतात. हा किस्सा ज्येष्ठ पत्रकार ह. मो. मराठे यांनी आपल्या ‘एक माणूस, एक दिवस’ या पुस्तकात लिहिला आहे.

तिसरा किस्सा नवलकर आणि मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचा…

नवलकर तेव्हा शिवसेनेचे नेते होते, तर राज्याचे मुख्यमंत्री होते ए आर अंतुले. राज्यात वेश्याव्यवसाय आणि हातभट्टीच्या दारूच्या अड्ड्यांबद्दलच्या तक्रारी वाढत होत्या. अंतुलेंना हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी बघून त्यावर तोडगा काढायचा होता.

त्यांनी त्यासाठी अशा अचानक धाडी टाकण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रमोद नवलकरांची मदत घेतली. नवलकर आणि अंतुले वेष बदलून धारावी, कामाठीपुरा इथली परिस्थिती बघितली. एवढ्यावर न थांबता ते वेष बदलूनच पोलिस स्टेशनमध्ये गेले आणि तिथल्या अधिकाऱ्यांचीही कानउघडणी केली.

स्वतः मुख्यमंत्र्यांनीच अशी अचानक भेट दिल्यानं, कित्येकांची पाचावर धारण बसलेली. अंतुलेंना तिथं पाहिल्यावर लोकांना आश्चर्य वाटत होतं खरं, पण तिथं नवलकरांना पाहून अंतुले इथे कसे काय आले, याचं गूढ कित्येकांना उलगडलं.

विरोधी पक्षातला नेता आणि मुख्यमंत्री वेषांतर करुन फिरतात, तेव्हा राज्यातले गैरप्रकार थांबतात याचा धडा या जोडगोळीनं तेव्हा साऱ्या महाराष्ट्राला दिला होता.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.