सात वर्षाच्या प्रणबने जेव्हा ब्रिटीश पोलीसांची झडती घेतली होती

भारताच्या स्वातंत्र्यसंग्राम चा तो काळ होता. महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा दिला होता. देशभरातले कॉंग्रेसी नेते व कार्यकर्ते ब्रिटीशांना पळवून लावण्याची अंतीम योजना करत होते. 

याच काळात बंगालच्या वीरभूम जिल्ह्याची जबाबदारी होती ती स्थानिक कॉंग्रेस नेते कामदा किंकर मुखर्जी यांच्याकडे. कामदा किंकर मुखर्जींची आजची ओळख म्हणजे स्वातंत्र्य सैनिक.

त्या काळात कामदा मुखर्जी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. 

वीरभूम जिल्ह्यात त्यांच वर्चस्व होतं. फक्त स्वातंत्रसैनिक किंवा कॉंग्रेस कार्यकर्तेच नाहीत तर ब्रिटीश देखील त्यांचा सन्मान करत असतं.

पण हा काळ चले जाव चळवळीचा होता.. 

सर्व कॉंग्रेसी नेत्यांप्रमाणेच कामदा मुखर्जी यांना देखील भूमीगत व्हावं लागलं. भूमीगत होण्याची वेळ आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला जवळ केलं आणि काही कागदपत्रे दाखवली. ही कागदपत्रे स्वातंत्रचळवळीशी संबधित होती. कोणत्याही स्वरूपात ही कागदपत्रे ब्रिटीशांच्या हाती लागायला नकोत अस सांगून त्यांनी ती घरात लपवून ठेवली. मी गेल्यानंतर घराची झडती घेतली जाईल, अत्याचार होतील पण कागदपत्रांची माहिती पडली तर स्वातंत्र्ययुद्धाता खिळ बसेल. सर्वजण पकडले जातील अस त्यांनी सांगितलं. 

कामदा मुखर्जी भूमीगत झाल्यानंतर त्यांच्या घरी दोन ब्रिटीश अधिकारी आले. 

तेव्हा घरात सात वर्षांचा पोल्टू होता. कामदा मुखर्जी यांचा हा मुलगा घरात पोल्टू नावानेच ओळखला जायचा. 

ब्रिटीश पोलीस घरात शिरत असताना सात वर्षाच्या पोल्टूने उलटपक्षी पोलिसाची झडती घेण्यास सुरवात केली. लहान पोराचं हे कृत्य बघुन तो ब्रिटीश अधिकारी म्हणाला, 

“Only a tiger could be born to a tiger.”

घराची झडती करण्यात आली. तपासात काहीच सापडलं नाही म्हणल्यानंतर पोलीस निघायला लागले तेव्हा पोल्टू म्हणाला, 

वडिलांनी सांगितलय, घरात आलेला कोणीही व्यक्ती जेवण न करता जावू नये. तुम्ही जेवण करूनच जा. 

पोल्टूच्या या आग्रहावर पोलीस थांबले. तपास करायला आलेले ब्रिटीश अधिकारी लहान मुलाच्या आग्रहाखातर जेवण करु लागले. हाच पोल्टू पुढे जावून भारताचा राष्ट्रपती झाला. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी म्हणजेच तो लहानपणीचा पोल्टू…. 

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.