अगदी हट्टाने लोकसभेच तिकीट मागुन घेतलं पण शेवटी इंदिरा गांधींची भिती खरी ठरली

भारतीय राजकारणाची नस ओळखणाऱ्या काही मोजक्याच नेत्यांपैकी एक नाव म्हणजे माजी राष्ट्रपती स्व. प्रणव मुखर्जी. अर्थात आपल्या सर्वांचे लाडके प्रणब दा. तब्बल ४८ वर्ष भारताच राजकारण कोळून पिणाऱ्या प्रणबदा यांना राजकारणाचा ‘चालता फिरता’ इनसायक्लोपिडीयाच म्हणून देश त्यांना ओळखायचा.

पण या एवढ्या मोठ्या नेत्याला थेट लोकांमधून निवडून जाण्यासाठी मात्र २००४ च वर्ष उजाडण्याची वाट बघावी लागली होती. त्यापुर्वी त्यांनी दोन वेळा लोकसभा निवडणूक लढवल्या होत्या. पण दोन्हीत देखील त्यांचा पराभव झाला होता.

एकदा इंदिरा विरोधी लाटेमुळे आणि दुसऱ्यांदा इंदिरा गांधीच न ऐकल्यामुळे. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी त्यांना निवडणूक न लढण्याचा सल्ला दिला होता मात्र आपल्या हट्टाने त्यांनी तिकीट मागुन घेतले आणि इंदिरा गांधींना जी भीती वाटत होती तेच झाले. त्यावेळी ३५० पेक्षा जास्त जागा घेत कॉंग्रेस पक्ष सत्तेत आला होता. पण प्रणब मुखर्जी मात्र पडले होते.

तो नेमका किस्सा खास बोल भिडूच्या वाचकांसाठी.

प्रणब मुखर्जी यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच मुळात माजी संरक्षणमंत्री आणि व्ही. के. कृष्णमेनन यांचे इलेक्शन मॅनेजर म्हणून झाली.

त्यावेळी कृष्णमेनन जरी निवडणूक हरले असले तरी याच निवडणूकीच्या माध्यमातुन ते पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नजरेत आले होते. त्यावेळी ते बंग्ला कॉंग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांच्या हुशारीने इंदिरा गांधींना त्यांना काँग्रेसमध्ये आणले आणि राज्यसभेचे खासदार बनवले.

बांग्ला कॉंग्रेसचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर १९७४ च्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रणव मुखर्जी यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात पहिल्यांदा समावेश झाला. त्यांना जहाज आणि रस्ते वाहतुक या खात्याचे राज्यमंत्री बनवलं गेलं. पण लवकरच त्यांना अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी दिली.

यानंतर आल्या आणीबाणीनंतरच्या १९७७ च्या लोकसभा निवडणूका. या निवडणुकीवेळी संपुर्ण देशभरात इंदिरा विरोधी लाट होती. आणीबाणी मुळे काँग्रेसवर जनतेचा प्रचंड रोष होता. बंगाल मधील राजकीय परिस्थिती सांगायची तर इथे जनता पक्षाने त्यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी युती केली होती.

तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस सोबत होता

अनेक राज्यसभेच्या खासदारांना एक सुप्त इच्छा असते की आपण थेट लोकांमधून निवडून येवून खासदार बनावं. त्यात चुक देखील काहीच नसते. त्यामुळे अगदी तशीच काहीशी इच्छा प्रणबदा यांची देखील होती. १९७७ च्या निवडणुकीत त्यांना बंगालच्या मालदा लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेच्या मैदानात उतरवलं.

त्यांच्याविरोधात निवडणूक लढवत होते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दिनेश चंद्र. यात प्रणव मुखर्जींचा जवळपास ३० हजार मतांनी पराभव झाला.

सोबतच इंदिरा विरोधी विरोधकांची एकजूट म्हणून जनता पक्ष सत्तेत आला होता.

१९७८ मध्ये आणीबाणीच्या मतभेदावरून काँग्रेसचं विभाजन झालं. त्यावेळी काँग्रेसचे बहुतांश बडे नेते यात यशवंतराव चव्हाण, सी सुब्रमण्यम, कर्णसिंह, टी.ए. पै, बळीराम भगत सगळे दिग्गज काँग्रेस (अर्स) मध्ये गेले होते.

इंदिरा गांधी यांच्यासोबत काही मोजकेच नेते होते. ज्यात पी. व्ही. नरसिंहराव, ग्यानी झैलसिंग, जगन्नाथ मिश्र, जानकीवल्लभ पटनायक अशी काही प्रमुख नाव. त्यात अजून दोन नाव होती. प्रणव मुखर्जी आणि बूटा सिंह. इंदिरा गांधींनी या दोघांनाही दिल्लीतील पक्षाचे काम करण्यासाठी आणले.

यानंतर ज्या गतीने विरोधकांची एकजूट झाली होती, त्याच गतीने ही एकजूट फुटली देखील. अंतर्गत कलहाने जनता पक्षाचे सरकार पडले आणि लोकसभेच्या १९७९-८० च्या निवडणूका जाहिर झाल्या.

या निवडणुकीत प्रणवदा यांनी पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक लढवण्याचं ठरवलं. तसं त्यांनी पक्षाध्यक्ष इंदिरा गांधी यांना बोलून देखील दाखवलं. ते म्हणाले,

‘मॅडम, मी पण यावेळी निवडणूक लढवणार आणि यावेळी बोलपुर मधून लढवणार.

त्यावेळी इंदिरा गांधी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी सुर्वा मुखर्जी यांच्याशी बोलून प्रणवदांना समजवण्याचा प्रयत्न केला.

‘प्रणब, तुला मैदानावरच्या राजकारणातील छक्के – पंजे लक्षात येत नाहीत. त्यामुळे तु निवडणूक लढवण्याचा विचार करू नकोस. आणि तसंही तु जो मतदार संघ सांगत आहेस तो डाव्यांचा गड आहे. त्यामुळे तुझ्या बायकोची पण मत आहे की निवडणुकीच्या मैदानात नको उतरायला.

पण यानंतर देखील प्रणवदा ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. ते इंदिरा गांधींना कन्व्हेन्स करतच राहिले. म्हणाले,

‘मॅडम, मी तिथल्याच गावातून म्हणजे अगदी तळातून इथपर्यंत आलो आहे. मी तिथली नसं न् नस ओळखतो. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी कसलीच अडचण येणार नाही. मी यावेळी निवडणूक लढवणारच.

पण इंदिरा गांधींना हवेचा अंदाज आला होता. ९७७ पासून बंगालमध्ये डाव्यांचं पर्व चालू झालं होत. त्यामुळे प्रणबदांच्या हट्टानंतर देखील इंदिरा गांधींनी प्रणवदांना समजावण्याचा आटोकाट खूप प्रयत्न केला. पण शांत बसतील ते प्रणबदा कसले.

अखेरीस इंदिरा गांधींना त्यांचा हट्ट पूर्वावाच लागला.

प्रणवदा बोलपुरला पोहोचले. अर्ज भरला. दिवस-रात्र मेहनत करुन प्रचार केला. पण जेव्हा निकाल आला तेव्हा मात्र इंदिरा गांधींची अटकळ खरी ठरली होती.

प्रणवदांना कम्युनिस्ट पक्षाच्या सारादीश राय यांच्या हातून पराभव स्वीकारावा लागला.

यानंतर प्रणव मुखर्जींनी निराश होत तडक कोलकत्ता मधीलं आपलं घर गाठलं. इकडे संपूर्ण देशात इंदिरा गांधींच्या कॉंग्रेसला यश मिळालं होतं. जवळपास ३५३ जागा इंदिरा गांधींच्या कॉंग्रेसला मिळाल्या होत्या. पण यात प्रणव मुखर्जी मात्र निवडणूक हरले होते.

ते कोलकात्यामध्ये आपल्या घरीच बसले असतानाच इंदिरा गांधींचा दिल्लीत येण्यासाठी त्यांना फोन आला.

खट्टू मनाने प्रणवदांनी दिल्लीच विमान पकडलं. पण तिथं विमानतळावर पोहोचल्यावर त्यांना खुद्द संजय गांधी रिसीव्स करण्यासाठी आले होते. हे दृश्य पाहून पहिल्यांदा जरा गडबडले. पण त्यानंतर संजय गांधी त्यांना घेऊन सरळ ‘१२ विलिंग्डन क्रिसेंट’ या इंदिरा गांधींच्या निवासस्थानी दाखल झाले.

आपला हट्टापायी निवडणूक हरलेल्या प्रणवदांनी कसा तरी इंदिरा गांधी यांचा सामना केला. पण प्रणवदा जसं समजत होते, त्याच्या अगदी विरुद्ध वर्तन इंदिरा गांधी यांनी त्यांच्याशी केलं. प्रणवदांना वाटलेलं इंदिराजी चिडल्या असतील.

पण इंदिराजींनी मात्र अत्यंत उत्साहात त्यांचे स्वागत केले आणि म्हणाले,

प्रणव, मी तुला सांगितलं होतं निवडणूक लढवण्याचा हट्ट करू नको म्हणून. पण आता असो. जे झालं ते झालं. काही हरकत नाही. पण तु लगेच घरी जा आणि कॅबिनेट सचिवांच्या फोनची वाट बघ.

(नवे सरकार बनवताना शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना कॅबिनेट सचिवांद्वारे औपचारिक माहिती दिली जाते.)

यानंतर १४ जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी इंदिरा गांधी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने शपथ घेतली. यात निवडणूक हरल्यानंतर देखील प्रणव मुखर्जींचा देखील समावेश होता. इंदिरा गांधींना प्रणब दा वर एवढा विश्वास होता की त्या कायम म्हणायच्या,

“प्रणब के मुंह से कभी कोई बात नहीं निकलवाई जा सकती. उनके मुंह से सिर्फ धुआं ही निकलता है.”

(प्रणब मुखर्जी डनहिलचा पाइप पिण्याचे शौकीन होते. त्यामुळेच इंदिरा गांधी त्यांच्या बाबतीत हे वाक्य नेहमीच म्हणायच्या)

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.