खरंच चिदंबरम यांनी प्रणबदा यांच्या टेबलखाली च्युइंगम चिकटवलं होतं..?

दिल्लीचं राजकारण सोपं नाही म्हणतात. इथली गणिते आपल्या सारख्या सर्वसामान्यांना तर सोडाच पण आयुष्य राजकारणात काढलेल्या गडयांना पण सुटत नाहीत. तुमचे सगळ्यात मोठे शत्रू विरोधी पक्षातले नाही तर तुमच्या स्वतःच्या पक्षातले असतात.

हे सगळं होतं खुर्चीच्या भांडणापायी.

हेच पाहायला मिळालं होतं चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी यांच्या भांडणात.

प्रणव मुखर्जी आणि चिदंबरम ही दोन टोकाची व्यक्तिमत्व. एकजण बंगालचा तडकफडक स्पष्टवक्ता थोडासा रागीट तर दुसरा मोजके शब्द बोलणारा शांत. दोघांच्या वयात देखील एका पिढीचं अंतर तर होतं. पण दोघेही अर्थक्षेत्रातले दिग्गज.

प्रणबदा तर इंदिरा गांधींच्या काळातले अर्थमंत्री. इंदिराजींच्या मंत्रमंडळात दोन नंबरच स्थान त्यांनी भूषवलेल. पुढे राजीव गांधींच्या ऐवजी पंतप्रधानपदी त्यांची चर्चा झाली आणि ते राजकारणात थोडेसे बाजूला पडले.

चिदंबरम यांनी देखील काही काळ काँग्रेस पक्ष सोडला होता. १९९७ साली गुजराल यांच्या मंत्रिमंडळात असताना त्यांनी सादर केलेले बजेट तर भारताचे ड्रीम बजेट म्हणून ओळखले गेले.

२००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत बाजी मारून अनपेक्षितरित्या काँग्रेस सत्तेत आली. या दोघांपेक्षाही मोठे अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहनसिंग पंतप्रधान बनले.

खरं तर प्रणबदा मनमोहनसिंग यांच्या पेक्षाही सिनियर पण सोनिया गांधींनी त्यांना पंतप्रधान केले नाही. त्यांना त्यांचं हक्काचं अर्थ मंत्रालय सुद्धा दिले नाही पण तेवढ्याच तोलामोलाच संरक्षण खात्याचे मंत्री झाले. अर्थखातं आलं मनमोहनसिंग यांच्या लाडक्या चिदंबरम यांच्या कडे.

मनमोहनसिंग यांनी १९९१ साली सुरू केलेलं आर्थिक उदारीकरण पुढं नेण्याचं काम चिदंबरम यांनी केलं तर राजकीय जटिल प्रश्न सोडवणे, आघाडीतल्या पक्षांची मोट बांधणे ही संकटमोचकाची कामे प्रणबदा यांनी केली.

पण २६/११ च्या हल्ल्यानंतर सगळी गणिते बिघडली.

तेव्हाचे गृहमंत्री शिवराज पाटील यांना राजीनामा द्यावा लागला. अतिशय अवघड परिस्थितीमध्ये चिदंबरम यांना गृहमंत्रालय सांभाळायची जबाबदारी पडली.

आणि २००८ साली तब्बल ३३ वर्षांनी प्रणबदा स्वगृही म्हणजेच अर्थमंत्रालयात परतले.

प्रणव मुखर्जी आणि चिदंबरम यांच्या व्यक्तिमत्वात असलेला फरक त्यांच्या कामात देखील दिसायचा. प्रणबदा यांची मते ओल्डस्कुल अर्थशास्त्रावर आधारित होती तर चिदंबरम नव्या विचारसरणीचे.

प्रणब मुखर्जी यांनी उदारीकरणाच्या धडाक्याला थोडासा ब्रेक लावला.

इकडे चिदंबरम गृहखात्यासारखं सर्वोच्च महत्वाचं खातं सांभाळत होते आणि तरी त्यांचाही जीव अर्थखात्यात अडकून पडला होता.

चिदंबरम यांच्या राजकीय कारकिर्दीचा तो सुवर्णकाळ मानला पाहिजे.

वेगाने ते भारतातले सर्वात मोठे नेते म्हणून उदयास येत होते. त्यांचं अभ्यासू व्यक्तिमत्व,कामाचा झपाटा, साधी राहणी ही मीडियामध्ये चर्चेचा विषय होती,।

डॉ.मनमोहनसिंग हे वार्धक्यामुळे परत पंतप्रधान होणार नाहीत हे तोपर्यंत निश्चित झाले होते. पुढे जर राहुल गांधींनी आईप्रमाणे खुर्ची नाकारलीच तर पंतप्रधानपदाचा सर्वात मोठा दावा चिदंबरम यांचाच असणार होता.

फक्त त्यांना आव्हान देऊ शकणारी एकच व्यक्ती होती, ते म्हणजे प्रणव मुखर्जी.

वर म्हटल्याप्रमाणे चिदंबरम गृहमंत्री झाले तरी त्यांचा जीव अर्थमंत्रालयात अडकून पडला होता. प्रणबदा यांच्या निर्णयांवर पत्रकारपरिषदेमध्ये अप्रत्यक्षरित्या टीका करणे, विरोधकांना बळ देणे वगैरे प्रकार ते करत होते. अनुभवी प्रणव मुखर्जी यांच्या नजरेतून हे सुटलं नव्हतं.

२२ जून २०११ च्या इंडियन एक्स्प्रेसच्या एका बातमीने देशभरात खळबळ उडाली.

देशाच्या अर्थमंत्र्याच्या ऑफिसमध्ये गुप्तहेरांचे यंत्र सापडल्याची ही बातमी होती.

बातमी प्रसिद्ध होण्याच्या जवळपास एक वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. प्रणव मुखर्जी यांनी या बद्दल पंतप्रधानांना पत्र लिहून कळवले होते. अर्थमंत्र्याच्या ऑफिसमध्ये मोठमोठे अधिकारी बसतात तिथे व कॉन्फरन्स हॉल मध्ये तब्बल १६ ठिकाणी काहीतरी संशयास्पद चिकट पदार्थ सापडला होता.

इतकेच नाही तर खुद्द अर्थमंत्र्याच्या टेबलला ३ ठिकाणी तो चिकट पदार्थ सापडला होता.

या सगळ्या घटनेमागे संशयाची सुई गृहमंत्री चिदंबरम यांच्याकडे वळली होती.

पंतप्रधानांनी तत्परतेने सीबीआयच्या हवाली चौकशीचे आदेश दिले. तो चिकट पदार्थ म्हणजे च्युइंगम होता ते सामोरे आले. या च्युइंगमच्या आधारे हेरगिरी करणारे मायक्रोफोन वा इतर वस्तू चिटकवण्यात आल्या होत्या हे कळत होतं.

चिदंबरम आणि मुखर्जी यांच्या भांडणाची चर्चा नॅशनल न्यूज झाली होती. सरकारचे सर्वात महत्वाचे दोन मंत्री एकमेकांच्या उरावर बसत आहेत हे देशाच्या दृष्टीने देखील नाचक्कीची गोष्ट होती.

पण दरम्यानच्या काळात बरच महाभारत घडून गेलं होतं.

पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी दोघांचीही कशी समजूत काढली होती माहीत नाही, पण खुद्द प्रणब मुखर्जी यांनी लोकसभेत स्पष्टीकरण दिल की,

तो सापडलेला पदार्थ च्युइंगम होता व सर्व चौकशीनंतर कोणत्याही हेरगिरीचे पुरावे मिळाले नाहीत व माझा कोणावरही आरोप नाही.

विरोधी पक्षांनी मात्र यावरून गदारोळ केला. तेव्हाच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज म्हणाल्या,

“वित्त मंत्री इस मुद्दे पर जो चाहें कहें लेकिन ‘चूइंगम थ्योरी’ आसानी से गले नहीं उतरती. यह मामला चाहे कुछ भी हो लेकिन इसकी जांच होनी ज़रूरी है..”

मध्यंतरी बरच काय काय घडलं.

चिदंबरम यांनी गृहमंत्री म्हणून कारकीर्द त्यांची प्रतिमा डागाळणारी ठरली. भ्रष्टाचाराची उघड झालेली अनेक प्रकरणे, अण्णा हजारे यांच आंदोलन त्यांना हाताळता आले नाही.

त्यांच्या जागी सुशीलकुमार शिंदे यांना नेमण्यात आलं. चिदंबरम पुन्हा आपल्या लाडक्या अर्थमंत्रालयात गेले.

मनमोहनसिंग यांना हटवून प्रणब मुखर्जी पंतप्रधान होतील अस वाटू लागलं होतं. मात्र सोनिया गांधी यांनी त्यांना पुन्हा धक्का दिला व त्यांना पंतप्रधानपदाऐवजी राष्ट्रपतीपदी पाठवले.

भारताच्या दोन मंत्र्यांच्या मधील सर्वात गूढ भांडणे इतिहासाच्या पानात दबून गेली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.