प्रणबदा नसले कि अंबानी वाढदिवसाचा केक देखील कापायचे नाहीत.

ऐंशीच्या दशकातला काळ. आणीबाणीचा फटका खाऊन पाय उतार झालेल्या इंदिरा गांधी सत्तेत परतल्या होत्या. अनेक सहकारी नेते पक्ष सोडून गेले होते. पण इंदिरा गांधींनी नव्या जिद्दीने नव्या टीम सह उभारी घेतली होती. गेल्या वेळी झालेल्या चुका सुधारल्या होत्या. जनता सरकारच्या कारभाराला वैतागलेल्या जनतेने इंदिरा गांधींवरच भरवसा दाखवला होता.

त्यांच्या मंत्रिमंडळात दुसऱ्या स्थानावर होते एक तरुण मंत्री, नाव होत प्रणब मुखर्जी.

पश्चिम बंगालमध्ये एकेकाळी पॉलिटिकल मॅनेजर म्हणून काम सुरु केलेल्या प्रणबदा यांनी अगदी काही काळातच इंदिरा गांधी यांची मर्जी जिंकली आणि अर्थमंत्री पद पटकावलं. संजय गांधी यांच्या अकाली मृत्यूनंतर तर इंदिरा गांधी या छोट्या मोठ्या निर्णयासाठी प्रणब मुखर्जी यांच्यावरच अवलंबून राहताना दिसत होत्या.

हा लायसन्स राजचा काळ होता. अर्थमंत्रालयाच्या हातात अनेक निर्णय असायचे. देशातील पंतप्रधानपदाच्या खालोखाल महत्वाचं खात म्हणून अर्थमंत्रालय ओळखलं जायचं. प्रणबदा अत्यंत कौशल्याने ते सांभाळायचे. पण मीडियामधून त्यांच्यावर एक टीका केली जायची.

प्रणब मुखर्जी भारताचे अर्थमंत्री नाहीत तर रिलायन्सचे अर्थमंत्री आहेत.

या काळात इंदिरा गांधींच्या सरकारने रिलायन्सला फायदेशीर होतील असे अनेक निर्णय घेतले असं सांगितलं जातं. अनेक लायसन्स सहजपणे त्यांच्या नावावर होत होते. रिलायन्सची खरी भरभराट याच काळात झाली. धीरूभाई अंबानी आणि प्रणब मुखर्जी यांच्या मैत्रीवरून वर्तमानपत्रात जोरदार निशाणा साधला जायचा. अंबानींच्या माध्यमातून प्रणब मुखर्जी यांनी पक्षाला मोठा निधी मिळवून दिला असल्याचं बोललं जात होतं.

प्रणब मुखर्जी यांचा एकच नारा, “ओन्ली विमल !” अशा अग्रलेखांचे टायटल असायचे.

हे राजकीय आरोप बाजूला ठेवले तर प्रणब मुखर्जी आणि धीरूभाई अंबानी यांची खरंच गाढ मैत्री होती. धीरूभाई अंबानी यांच्या मृत्यूनंतर झालेल्या शोकसभेत अनिल अंबानी यांनी त्याकाळची एक आठवण सांगितली आहे.

जब से मैंने होश संभाला है, मुझे अपने बाबूजी का कोई ऐसा जन्मदिन याद नहीं है जिसमें प्रणव बाबू के शामिल हुए बगैर पिताजी ने केक काटा हो।

एकदा तर असं झालं होत कि संसदेत अधिवेशन सुरु होतं आणि अर्थमंत्री असल्यामुळे प्रणब मुखर्जी यांना त्या अधिवेशनात सहभागी होणे अत्यावश्यक होते. नेमका तेव्हाच धीरूभाई अंबानी यांचा वाढदिवस होता. मुंबईत त्यांनी आपल्या घरात मोठ्या पार्टीचं आयोजन केलं होतं. अनेक दिग्गज सेलिब्रिटी, मोठे नेते, अगदी विदेशातून देखील पाहून या पार्टीसाठी आले होते. मुलांनी आग्रह धरला मात्र  धीरूभाई काही केल्या केक कापण्यास तयार नव्हते.

मध्यरात्रीचे बारा वाजून गेले, कॅलेंडरची तारीख बदलली. कंटाळून काही पाहुणे घरी परत देखील गेले पण धीरूभाईंनी केकला हात देखील लावला नाही.

अखेर रात्री उशिरा दीड वाजता प्रणबदांचं आगमन झालं. त्यानंतरच धीरूभाईंनी केक कापला. या प्रसंगावरून दोघांच्या सच्च्या मैत्रीचा दाखला अनिल अंबानी यांनी दिला.

मध्यंतरी इंदिरा गांधींची हत्या झाल्यावर पंतप्रधान पदावरून प्रणब मुखर्जी व्रजीव गांधी यांच्यात गैरसमज झाले. प्रणबदा यांना काँग्रेसच्या राजकारणातून बाहेर फेकलं गेलं. राजीव गांधी हे अंबानींसारख्या उद्योगपतींच्यापासून अंतर राखण्याच्या मताचे होते. प्रणबदा सत्तेतून बाहेर गेले पण तरीही राजीव गांधींच्या पर्यंत धीरूभाईंना पोहचवण्याचे प्रयत्न त्यांनीच केले.

पुढे मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यावर प्रणब मुखर्जी यांचे सत्तेच्या पॉवर सर्कलमध्ये पुनरागमन झालं. या काळात त्यांनी संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, अर्थमंत्रालय अशी मोठमोठी मंत्रालये त्यांनी सांभाळली. मनमोहन सिंग यांच्या अनुपस्थितीत मंत्रिमंडळ बैठकीचं नेतृत्व त्यांच्याकडेच असायचं. याकाळात देखील प्रणब मुखर्जींवर रिलायन्सला मदत केल्याचे आरोप झाले.

धीरूभाईंच्या मृत्यूनंतर जेव्हा मुकेश अंबानी व अनिल अंबानी यांच्यात संपत्तीवरून वाद सुरु झाले तेव्हा मध्यस्तीसाठी प्रकरण प्रणबदा यांच्याकडेच गेले होते. दोन्ही भावांचा आणि कोकिलाबेन यांचा धीरूभाईंच्या नंतर प्रणबदावरच विश्वास होता. 

त्यावेळी प्रणबदा म्हणाले होते,

“भारतीय कारपोरेट जगत में वे (मुकेश-अनिल) इतने बड़े नाम है कि उनके बीच का विवाद कैपिटल मार्केट्स पर प्रभाव डाल सकता है। मैंने उन्हें बड़े होते देखा है। वे धीरूभाई की संतानें हैं, लिहाजा मेरे लिए उनके बीच में फर्क करना कठिन है। उन्हें अपने मसले खुद हल करने की कोशिश करनी चाहिए।”

पण तरीही असं म्हंटल जातं की अंबानी बंधूंमधील तोडगा अखेर प्रणबदांनीच शोधून काढला.

२०१२ साली काँग्रेस मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदावरून हटवणार असल्याचं बोललं जात होतं तेव्हा प्रणब मुखर्जी यांच्यासाठी मुकेश अंबानी यांनी लॉबीयिंग केलं. मनमोहन सिंग पायउतार झाले नाहीत मात्र प्रणब मुखर्जी राष्ट्रपती झाले. आपल्या राष्ट्रपतीपदाच्या काळात प्रणबदांनी धीरूभाई अंबानी यांना जाहीर झालेला मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार कोकिलाबेन यांच्याकडे प्रदान केला होता.

 हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.