जेव्हा चहा पिताना प्रणब मुखर्जींना सांगितले गेले, ‘दादा तुम्हाला पक्षातून काढून टाकलयं’

माजी राष्ट्रपती स्व. प्रणव मुखर्जी म्हणजे काँग्रेस पक्षातील अँग्री यंग व्यक्तिमत्व. बंगालच्या मातीत असणारी बंडखोरी त्यांच्या देखील रक्तात वाहत होती. वेळ पडली तर आपल्याच पक्षातल्या नेत्यांशी पंगा घ्यायला देखील ते पुढे मागे पाहायचे नाहीत. त्यांच्या याच वादळी स्वभावामुळे काँग्रेसने त्यांना पंतप्रधान बनू दिलं नाही. तरीही ते पक्षाचे संकटमोचक म्हणूनच कार्यरत राहिले.

मात्र आपल्या राजकीय कारकिर्दीनंतरच्या आयुष्याच्या संध्याकाळी मात्र The Turbulent Years: 1980-1996 या चरित्रात आपल्या वैयक्तिक आयुष्याबरोबर राजकीय किस्सेसुद्धा सांगितले आहे. यात काँग्रेसने त्यांच्यावर केलेल्या अन्यायाबद्दल तपशिलवार लिहिलेलं आहे.

३१ ऑक्टोबर १९८४ रोजी जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा राजीव गांधी दिल्लीत हजर नव्हते. ते एका प्रचाराच्या निमित्ताने पश्चिम बंगाल येथे गेले होते. पंतप्रधानांच्या हत्येची बातमी कळताच त्यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेण्यात आले.

राजीव गांधी जेव्हा फ्लाइटने परत निघाले तेव्हा त्यांच्या सोबत देशाचे तत्कालीन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी देखील होते. त्यांचे स्थान मंत्रिमंडळात इंदिरा गांधींच्या खालोखाल होते. कोणताही मोठा राजकीय वारसा नसताना अत्यंत कमी वयात या पदापर्यंत पोहचण्यासाठी प्रणब मुखर्जी यांनी मोठी मेहनत घेतली होती.

इंदिरा गांधीजींच्या मृत्यूनंतर पुढचा पंतप्रधान कोण होणार याची देशभरात उत्सुकता सुरु होती. राजीव गांधींना घेऊन येणाऱ्या विमानात देखील हा प्रश्नावर चर्चा सुरु झाली. तेव्हा राजीव गांधींनी प्रणब मुखर्जीना जेव्हा जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या पंतप्रधानपदावर असताना झालेल्या मृत्यूनंतरच्या परिस्थितीबद्दल विचारले.

तेव्हा प्रणब मुखर्जी यांनी नेहरू आणि शास्त्री यांच्या निधनानंतर ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री गुलझारी लाल नंदा यांनी कार्यवाहक पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती हे सांगितलं.

प्रणब मुखर्जी यांनी आपलं प्रांजळ मत व्यक्त केलं पण त्यांना स्वतःला देखील माहित नव्हतं कि पुढे जाऊन याच चर्चेचा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा सेटबॅक बसेल एवढा मोठा परिणाम होणार आहे.

विमानात उपस्थित सर्व नेत्यांशी बोलल्यानंतर राजीव गांधींनी पंतप्रधान व्हावे, असा निर्णय घेण्यात आला. जेव्हा प्रणब मुखर्जी यांनी स्वत: राजीव यांना पंतप्रधान होण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी विचारले, “तुम्हाला असे वाटते की मी हे मॅनेज करू शकेन?” यावर प्रणब त्यांना म्हणाले,

“हो, आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत.”

यानंतर प्रणब मुखर्जींनी राजीव यांना तातडीने दिल्लीला अधिसूचना पाठवण्यास सांगितले की, इंदिरा गांधी यांच्या निधनाची बातमी जाहीर होऊ नये. त्यावेळी सर्वांनी ठरवले की, इंदिराजींच्या निधनाच्या बातमी सोबतच राजीव गांधी पंतप्रधान होण्याची बातमीही दिली जाईल. “

राजीव यांनी प्रणब मुखर्जींसोबत घेतली शपथ

संध्याकाळी दिल्लीत पोहोचल्यानंतर कॉंग्रेसच्या संसदीय मंडळाच्या 5 पैकी 2 सभासद जे दिल्लीत होते नरसिंहराव आणि प्रणब मुखर्जी यांनी राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंह यांना शिफारस केली की, राजीव गांधी यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली जावी. यानंतर सायंकाळी 6 वाजता राजीव गांधी यांनी त्यांच्या चार मंत्रिमंडळातील सहकारी प्रणब मुखर्जी, नरसिंहराव, पी. शिवशंकर आणि बूटा सिंग यांच्यासमवेत शपथ घेतली.

शपथविधीनंतर राजीव गांधी यांनी दूरदर्शन आणि अखिल भारतीय रेडिओवर राष्ट्राला संबोधित केले. या संबोधनात इंदिरा गांधी यांच्या मृत्यूची अधिकृत माहिती लोकांना देण्यात आली. जरी माहिती आधीच लोकांपर्यंत पोहोचली होती. भारत-पाकिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना फैसलाबाद येथे थांबविण्यात आला तेव्हा रेडिओ पाकिस्तानच्याकॉमेंट्री टीमने इंदिरा गांधी यांच्या हत्येविषयी सांगितले. त्यानंतर लवकरच, बीबीसीने देखील घोषणा केली.

इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा सातव्या लोकसभेची चार वर्षे आणि नऊ महिने पूर्ण झाले होते. लोकसभा निवडणूक डोक्यावर होती. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या (आय) च्या बाजूने तीव्र सहानुभूतीची लाट आली आणि पक्षाली 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या.

परंतु जानेवारी 1985 मध्ये निवडणुकीच्या निकालानंतर राजीव गांधींनी जेव्हा आपल्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली, तेव्हा प्रणब मुखर्जी यांना त्यात सामील केले गेले नव्हते. अनेक राजकीय टीकाकारांचे मत आहे की, राजीव यांचे मित्र आणि नातेवाईक अरुण नेहरू जे त्या काळी खूप प्रभावी होते, त्यांनी राजीव गांधी यांना प्रणबदा यांच्या विरोधात भडकवले होते.

अरुण नेहरूंनी राजीव यांना सांगितले की, प्रणब मुखर्जी खूप महत्वाकांक्षी व्यक्ती आहेत आणि इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांना पंतप्रधान व्हायचे होते.

असे म्हणतात की, यानंतर राजीव गांधी आणि प्रणब मुखर्जी यांच्यातले अंतर वाढू लागले. 27 एप्रिल 1986 प्रणब मुखर्जी कॉंग्रेसचे (आय) कार्यकारी अध्यक्ष कमलापती त्रिपाठी यांच्या बंगल्यावर त्यांच्याबरोबर बसून चहा पीत होते. तेव्हाच त्रिपाठीची सून चंदा बाहेर येऊन त्यांना सांगते,

“प्रणब तुम्हाला आत्ताच पक्षातून काढून टाकण्यात आलयं.”

हे ऐकून प्रणबदा चकित झाले. पण ते काहीच करू शकत नव्हते. 1987 मध्ये त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळही संपुष्टात येत होता. पण त्याआधी त्यांनी आपला नवा पक्ष स्थापन केला, ज्याचे नाव होते- राष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेस (इंदिरा). त्यांच्या या पक्षाने बंगाल विधानसभेची निवडणूकदेखील लढविली परंतु त्यांचा पराभव झाला. दरम्यान, राज्यसभेतील प्रणव दा यांचा कार्यकाळ 1987 मध्ये संपला. त्यानंतर त्यांनी लुटियन्स दिल्लीचा सरकारी बंगला सोडला आणि ग्रेटर कैलाश -2 मधील त्यांच्या खासगी घरात राहू लागले.

जवळपास अडीच वर्षांनंतर जेव्हा राजीव गांधी बोफोर्स प्रकरणात वाईटरित्या अडकले होते. त्यांना जुन्या व अनुभवी कॉंग्रेसवाल्यांची गरज भासू लागली. या वातावरणातच जवळच्या लोकांनी राजीव गांधी आणि प्रणब मुखर्जी यांच्यातील नात्यावर गोठवलेला बर्फ वितळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. राजीव गांधींना हे समजलं होतं की ‘अरुण नेहरूंनी मुद्दामहून भडकवल्या मुळे ते प्रणब मुखर्जींना मंत्रिमंडळातून आणि पक्षातून घालवून बसले होते. पण आज तेच अरुण नेहरू स्वत: व्ही. पी. सिंह यांच्यासोबत राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबावर बोफोर्सवरून निशाणा साधत होते.

पण दुर्दैवाने वेळ निघून गेली होती. प्रणब मुखर्जींना पक्षात परत आणण्यात आलं. इंदिरा गांधींच्या काळातले सर्व जुने शिलेदार एकत्र आणण्यासाठी प्रयत्न चालले होते पण तोवर राजीव गांधींची हत्या झाली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.